मंगलवार, 4 जनवरी 2011

परप्रांतीयांना जमिनी देऊ नका

परप्रांतीयांना जमिनी देऊ नका
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 05, 2011 AT 12:00 AM (IST)


मुंबई - मुंबईसारख्या परिसरातील अधिकाधिक जागा मराठी उद्योजकांनी खरेदी केल्या पाहिजेत, असा आग्रह करतानाच या जमिनी परप्रांतीयांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले.

व्यापारी मित्र मंडळाच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे बोलत होते. या वेळी मित्र मंडळाचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, मंडळाचे उपाध्यक्ष व सारस्वत बॅंकेचे उपाध्यक्ष किशोर रांगणेकर, कार्यवाह किशोर साठे, कार्याध्यक्ष अनंत भालेकर, मुंबई व्यापारी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष दीपक बापट, सहकार्यवाह मकरंद चुरी, खजिनदार प्रभाकर शिलधनकर आदी उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी या वेळी राज्य सरकारवरही शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, की सागरी नियंत्रण कायदा (सीआरझेड) लावून येथील शासन समुद्रसपाटीजवळील जमिनी अल्प दरात खरेदी करते. सर्व जमिनी विकत घेऊन झाल्यावर सीआरझेड कायदा रद्द करते आणि त्याचा अधिकाधिक मोबदला मिळविण्याचा प्रयत्न करते. राज्य सरकारचा हा डाव विशेषत: मराठी उद्योजकांच्याही ध्यानी यायला हवा. कोकण किनारपट्टीवरील जमिनी या कोणामार्फत विकत घेतल्या जात आहेत, याचाही अभ्यास करायला पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी उपस्थित मराठी उद्योजकांना दिले.

या वेळी मित्र मंडळातर्फे यशस्वी मराठी उद्योजक म्हणून मनोहरशेठ रेडीज, देवेंद्र बापट, शंकरराव बोरकर यांचा मराठी उद्योगभूषण म्हणून सत्कार करण्यात आला. कला क्षेत्रातील मराठी कार्याबद्दल सुहास भालेकर यांचा; तर क्रीडा क्षेत्रातील नवतारका कबड्डीपटू स्नेहल साळुंखे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. "आस्वाद हॉटेल'चे मालक श्रीकृष्ण सरजोशी यांच्या व्यवसाय कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास या वेळी "केसरी टूर्स'चे केसरीनाथ पाटील, मंडळाच्या सल्लागार अचला जोशी, "समर्थ ग्रुप'चे विलास गावकर, कार्यकारिणीचे सदस्य विजय कामेरकर, सहकार्यवाह किरण शेट्ये आदीही उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें