शनिवार, 26 नवंबर 2011

उमेदवारीच्या "इंजिन'ला परीक्षेचा सिग्नल

उमेदवारीच्या "इंजिन'ला परीक्षेचा सिग्नल
मृणालिनी नानिवडेकर
Saturday, November 26, 2011 AT 02:00 AM (IST)

मुंबई वार्तापत्र



नवनव्या कल्पना मांडून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची शैली आहे. परीक्षा घेऊन उमेदवारी देण्याची त्यांची घोषणा त्या शैलीला साजेशीच आहे; पण मनसेच्या कार्यकर्त्यांच्या गळी ती उतरवण्यात राज ठाकरे यशस्वी होणार का, हा खरा प्रश्‍न आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मतपेटीने दिलेल्या नेत्रदीपक यशापूर्वी राज ठाकरे यांची ओळख होती ती अत्युत्कृष्ट दर्जाचे इव्हेन्ट मॅनेजर अशी. घटना, कार्यक्रम, विषय कोणताही असो, राज ठाकरे त्यांच्या कल्पक, कलात्मक आयोजनाने तो प्रसंग एका उंचीवर नेऊन ठेवतात. एखाद्या विषयाची पार्श्‍वभूमी तयार करण्यासाठी ते जे नेपथ्य उभे करतात, ते अजोड असते, हा आजवरचा अनुभव. निवडणूक अगदी तोंडावर आली असताना त्यांनी या पोतडीतून परीक्षा बाहेर काढल्या आहेत. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, अशी घोषणा करून राज यांनी तमाम पब्लिकला खूष करून टाकले आहे. किमान पात्रता असलेला नेताच आपला प्रतिनिधी असावा, हा फंडा जनतेला भलताच भावल्याने, मनसेची पूर्वप्रसिद्धी काहीही न करता झाली आहे.

राजकारणात अशा परीक्षांना स्थान असू शकते काय, या प्रश्‍नाने राजकारण्यांना घेरले असतानाच आपला प्रतिनिधी किमान पात्रतेचा तर असेल, या भावनेने मतदार सुखावले आहेत. संभाव्य महाआघाडीला आणि मजबूत महायुतीला जी प्रसिद्धी महत्प्रयासाने मिळणार नाही, ती परीक्षेच्या एका छोट्याशा निर्णयाने मनसने मिळवली आहे. काही वॉर्डांपुरती मर्यादित शक्‍ती असलेली राज ठाकरेंची नवनिर्माण सेना मुंबई महापलिका निवडणुकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे...निदान सध्या तरी.

पदार्पणातच मिळालेल्या लोकप्रियतेची कमान अधिकाधिक वर नेणे राज ठाकरे यांच्यासमोरचे आव्हान आहे. त्यातच हा संपूर्ण पक्ष त्यांच्या व्यक्‍तिगत करिष्म्याभोवती विणला गेला असल्याने, यशापयश कमालीचे व्यक्‍तिगत ठरणारे आहे. शिवसेनेला आव्हान देत बाहेर पडलेले बंडखोर राज ठाकरे एकीकडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उत्तम संघटनात्मक बांधणी अशी दुहेरी ताकद असलेले उद्धव दुसरीकडे, असा हा सामना आहे. तो मुळातच विषम आहे. मात्र घराबाहेर पडणाऱ्याला संघर्ष करावा लागतो. अवतीभवतीचे लोक त्याच्या बंडाकडे फार अपेक्षेने बघतात. बंडखोराची सरशी झालीच तर बाजू बदलायची काय, याचे अंदाज आडाखे कार्यकर्ते मनातल्या मनात बांधत असतात. त्यातच प्रस्थापित राजकीय पक्षांना कंटाळलेल्या जनतेने राज यांना लगेचच उचलून धरले. महिला- तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने, या नव्या पक्षाला मतपेढीच मिळाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशा चार कोनांत विभागलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाचवा भिडू समोर आला. आंबेडकरी जनतेनेही या नव्या भिडूला कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वीकारले. मनसेचा टीआरपी एकदम वाढला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसमोर मनसेने पेच उभा केला. मात्र मुंबई- ठाणे राखत मोठ्या भावाने खिंड लढवली. कल्याण- डोंबिवली महापालिकेत दोन्ही बंधूंचे पक्ष जनतेच्या पसंतीस उतरल्याने भाजपचा धुरळा उडाला. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस दोघेही गोंधळले. मुळात कल्याण- डोंबिवलीत आघाडीला फारसे गमावण्यासारखे काही नव्हतेच. पण ठाकरे बंधूंच्या कामगिरीची पुनरावृत्ती अन्यत्र घडली तर कठीण पडेल, हे कॉंग्रेस- राष्ट्रवादीने ताडले आहे. भाउबंदकीच्या या खेळात राज्य राखता आले; पण महापालिकेत हाती काहीच न लागल्याने सत्ताधारी आघाडी अस्वस्थ झाली. या धड्यामुळेच ठाणे-मुंबईत ते एक होऊ पाहत आहेत.

दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या तर ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी सत्ता राखण्याची कसोटी ठरेल, तर राज यांची शक्‍ती जोखणारे आव्हान. महाआघाडीचे आव्हान पेलण्यासाठी शिवसेनेने संघटनात्मक तयारीचे शस्त्र परजले आहे. शाखा गेल्या महापालिका निवडणुकांपासूनच सक्रिय आहेत. रामदास आठवले यांच्यामुळे वॉर्डगणिक दोनशे ते पाच हजारांपर्यंत जाणाऱ्या मतांची नवी कुमकही उद्धव ठाकरेंच्या दिमतीला आहे. आघाडीच्या छत्राखाली अमराठी उत्तर भारतीय, बिहारी, दलित, मुसलमान एकत्र आलेच तर त्यावर मात करण्यासाठी मराठी माणसाच्या घरात थेट चुलीपर्यंत पोहोच असलेल्या संघटनात्मक ताकदीचे उत्तर शिवसेनकडे आहे. मनसेकडे ही ताकद पूर्णत: वळलेली नाही. त्यांचे बहुतांश आमदार अद्याप चाचपडताहेत. शाखाप्रमुख कमालीचे नवखे आहेत. महापलिकेच्या महाभारतात ही कुमक पुरेशी नाही, याची जाणीव असल्याने राज यांनी त्यांचे बुद्धिकौशल्य पणाला लावलेले दिसते. आज बोरीवली, शिवडी, दादर आणि भांडूप या भागांत मर्यादित असलेली ताकद वाढवण्यासाठी राज यांनी कल्पकतेचा आसरा घेतलेला आहे. बदललेल्या राजकीय वातावरणावर स्वार होत उच्च आणि मध्यमवर्गीय मतदारांची ते मोट बांधू बघतात. शिकल्या-सवरलेल्या लोकप्रतिनिधींचे मतदाराला आकर्षण असते. निवडणूक जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या निष्ठूर कसरतींची कल्पना नसलेली जनता अशा प्रतिकात्मकतेने खूष होते. लोकलमधील गर्दी, ऑटोरिक्षांचा मनमानी कारभार अशा कित्येक गोष्टींमुळे मुंबईकर दररोज वैतागतो. सगळ्या ताणाचे मूळ अकार्यक्षम नेतृत्वात असल्याचे तो दररोज स्वत:लाच पटवून देतो. परीक्षा उत्तीर्ण करणारे अशा रूढ चेहऱ्यांपेक्षा वेगळे असतील, ही अपेक्षा जागवण्यासाठी राज सरसावले आहेत. परीक्षा पास झालेल्यांनाच उमेदवारी दिली काय, याच्या कहाण्या यथावकाश समोर येतीलच. राज "खळ्‌ळ खटाक...'ची भाषा जाणणाऱ्या त्यांच्या अनुयायांना अशा निर्णयासाठी राजी करू शकतात का? परीक्षेत तावूनसुलाखून बाहेर पडलेला किमान क्षमतेचा उमेदवार स्वीकारणे मतदाराला आवडेल. पण हा वर्ग मराठी-अमराठी वादावर होणाऱ्या राड्यांना मान्यता देईल काय, हे राज यांनी स्वत:लाच विचारावे. क्‍लास आणि मास यांना एकाच वेळी बरोबर ठेवण्याचे कसब राज यांना साधावे लागणार आहे. दगड मारणारी सेना चर्चेच्या टेबलपर्यंत नेण्याचे काम कार्याध्यक्ष उद्धव यांनी केले. मनसे त्याच मार्गावर जाणार असेल तर ते दिलासादायक ठरेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें