मनसेच्या तिकिटासाठी परप्रांतीयही इच्छुक
मंगेश फदाले ः सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 23, 2011 AT 03:00 AM (IST)
मुंबई - महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून सर्वच राजकीय पक्षांमधील हौशे, नवशे आणि गवशे कार्यकर्त्यांमध्ये तिकीट मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचे सत्र काही पक्षांनी सुरू केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही नुकत्याच कुलाब्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्याचे जाहीर केल्यानंतर या मुलाखतींसाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे इच्छुकांमध्ये आठ अमराठी होते.
मुंबईच्या विकासाची ब्लूप्रिंट घेऊन मनसे मैदानात उतरेल यात शंकाच नाही; परंतु मराठी भाषक आणि परप्रांतीयांचा मुद्दाही त्यांच्या अजेंड्यावर असेल यात शंका नाही. मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे नागरी सुविधांवर पडणारा ताण आणि निर्माण होणाऱ्या समस्या यावर मनसेच्या प्रचाराचा जोर असेल. मनसेची परप्रांतीयांविषयीची भूमिका माहीत असतानाही कुलाब्यातून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या आठ आहे. म्हणजे कुलाबा विधानसभा मतदारसंघातील पालिकेच्या सात प्रभागांपैकी जवळपास प्रत्येक प्रभागातून एका परप्रांतीयाला मनसेचे तिकीट हवे आहे. अर्थात यापैकी किती जणांना उमेदवारीची लॉटरी लागेल, याविषयी आताच काही भाष्य करणे अवघड आहे.
कुलाबा विधानसभा मतदारसंघात मनसेच्या एकूण 34 इच्छुक उमेदवारांमध्ये परप्रांतीय असलेल्या आठ जणांमध्ये गिरगावातील चारपैकी तीन जण गुजराती भाषक आणि एक जण राजस्थानी आहे. तर नेव्हीनगर ते क्रॉफर्ड मार्केट या परिसरात चार जण उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील मूळ रहिवासी आहेत.
कुलाब्यातील एकूण मतदार संख्या दोन लाख 10 हजार असून त्यापैकी 54 हजार मराठी भाषक मतदार आहेत. "मनसे हा केवळ मराठी भाषकांचा पक्ष आहे, असा परप्रांतीयांचा समज आहे; परंतु राज यांच्या प्रभावामुळे बहुभाषक नागरिकही मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून पुढे आले आहेत, ही बाब पक्षाच्या दृष्टीने चांगली आहे,' असे मनसेचे कुलाबा तालुका अध्यक्ष अरविंद गावडे यांनी "सकाळ'ला सांगितले.
राज यांचा विरोध परप्रांतीयांना नाही
"मनसेचा विरोध उत्तर भारतीय किंवा बिहारींना नाही तर त्यांच्यात असलेल्या प्रवृत्तीला आहे. त्याचबरोबर मुंबई शहरात येऊन थडकणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांना आहे. उत्तर भारतीयांच्या मनात राज ठाकरेंबद्दल रोष असण्याचे कारण नाही. त्यांचा अभ्यास आणि एखाद्या समस्येसंदर्भातील मुद्देसूद मांडणी यामुळे आम्हीही प्रभावित आहोत, असे एक उमेदवार रूपाली सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें