शुक्रवार, 23 अगस्त 2013

आबांना बांगड्यांचा आहेर द्या - राज ठाकरे

शनिवार, 24 ऑगस्ट 2013 - 01:00 AM IST 


मुंबई - मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व महिलांनी गृहमंत्र्यांना बांगड्याचा आहेर पोस्टाने पाठवून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. किमान मनाची चाड बाळगून आर. आर. पाटील यांनी आता राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि बलात्काराच्या घटनेवरून गृहमंत्र्यांवर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, ""2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटाच्या घटनेनंतर पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. ही संधी का दिली गेली, हे आपल्याला कळले नाही. त्यानंतर आझाद मैदानात पोलिसांना आणि पत्रकारांना मारहाण करण्यात आली. त्या वेळीही आपण पाटील आणि तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण पाटील आपल्या खुर्चीला चिकटून राहिले आहेत.'' राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्रातील माहिती पुरविण्याचे काम करत असल्यानेच पाटील यांची वर्णी गृहमंत्रिपदावर लागल्याची टीका राज यांनी केली. ते म्हणाले, ""पवार यांच्यासाठी "कुरिअर सर्व्हिस'चे काम गृहमंत्री करत आहेत. यापूर्वी राज्यात रात्री-अपरात्री महिला सुरक्षित फिरत होत्या. पण या घटनेनंतर सर्व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. महिलांनी घटनेचा निषेध म्हणून मलबार हिल येथील त्यांच्या बंगल्यावर अथवा सांगलीतील घरी पोस्टाने बांगड्या पाठवाव्यात.'' दरम्यान, एप्रिलपासून पोलिसांच्या बदल्यांची फाईल अडकून पडली आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या पोलिसांना आपण आहे त्या ठिकाणी राहणार की जाणार याबद्दल शंका आहे.
पोलिसांच्या या संभ्रमावस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्‍न राज यांनी उपस्थित केला. "टग्यां'नी गृहमंत्रिपद घ्यावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे, असे थेट आव्हान राज यांनी पवार यांना दिले. अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आपण "टगे' असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे या टग्यांनी आता गृहमंत्रिपद घेऊन आपली कार्यक्षमता दाखवून द्यावी, असे आव्हान राज यांनी दिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें