बुधवार, 20 नवंबर 2013

विचारांची भाषा समजत नसल्याने मी ठोकतो


गुरुवार, 21 नोव्हेंबर 2013 - 03:00 AM IST

नागपूर - प्रत्येक राज्याची स्वतःची अस्मिता असते. ती प्रत्येकाने जपलीच पाहिजे. याकरिता माझा आग्रह असून विचारांची भाषा समजत नसल्याने मी ठोकतो, असे रोखठोक मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात येऊन परप्रांतीयांनी स्वतःचे मतदारसंघ निर्माण केल्यास मी आडवा येईनच, असा इशारही त्यांनी यावेळी दिला.

मारवाडी फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार ग्रामगीताचार्य तुकारामदादा बेलूरकर यांना आज, बुधवारी राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज ठाकरे म्हणाले, "आजोबांनी एका लेखाला "दगलबाज शिवाजी' असे शीर्षक दिले. दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी त्यांचे व्याख्यान होते. आयोजकांनी त्यांना विरोध केला. प्रबोधनकार म्हणाले, "मला बोलू द्या, मग ठरवा.' ते व्यासपीठावर गेले आणि "मी दगाबाज नाही दगलबाज म्हणालो. दगलबाजचा अर्थ हुशार किंवा शूर असा होतो.' त्यावेळी शब्दसंपदा होती. वसंत कानेटकरांसारखे लेखन होत नाही आज. "हिंदू धर्मातील चुका परखडपणे मांडल्यामुळे पुण्यात प्रबोधनकारांची खोटी प्रेतयात्रा काढण्यात आली होती. तो प्रतीकात्मक निषेध होता; मात्र तोच विचार मांडणाऱ्या नरेंद्र दाभोलकरांना पुण्यात खरोखर मारण्यात आले आणि खरीच प्रेतयात्रा निघाली. यावरून कोणता समाज खरा पुरोगामी होता हे लक्षात येतं,' असेही ते म्हणाले.

रामकृष्णदादा बेलूरकर यांचा सत्कार करताना राज ठाकरेंनी त्यांना वाकून नमस्कार केला. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "माझ्या हस्ते सत्कार करू नका, कुणीतरी मोठा माणूस बोलवा असे आयोजकांना सांगितले होते; पण ऐकतील ते नागपूरकर कसले? पण बेलूरकर यांचा सत्कार करायला मिळणे, हा माझा सन्मान समजतो. "या जगात पाया पडावे असे पायच उरलेले नाहीत,' असे पु. ल. देशपांडे कुसुमाग्रजांच्या पाया पडताना म्हणाले होते. मला आज तसेच वाटले.' खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर खा. अजय संचेती, आमदार उल्हास पवार, गिरीश गांधी, रमेश बंग, सत्यनारायण नुवाल, मितेश भांगडिया, श्रीकृष्ण चांडक, अनिल राठी, विजय मुरारका यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.

सर्व भाषणे मराठीत...
गिरीश गांधी आणि उल्हास पवार अशा कार्यक्रमांमध्ये मराठीतच भाषण करतात, याचा सर्वांना अनुभव आहे; पण राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविल्यानंतर नितीन गडकरी अलीकडे जाहीर सभेत हिंदीत बोलतात. अजय संचेती यांच्या भाषणांना मोठ्या प्रमाणात हिंदीचा स्पर्श असतो. राज ठाकरे यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीमुळे मात्र एकाही वक्‍त्याच्या भाषणात हिंदी वाक्‍ये आली नाहीत. सर्व भाषणे मराठीतच झाली. याला "राज ठाकरे इफेक्‍ट'च म्हणावा लागेल.

"राजलीला'
* प्रत्येक वक्ता व्यासपीठावरील पाहुण्यांची नावे का घेतो? (शांतता)
* ही "नाव' घ्यायची जागा आहे का? (हशा)
* विचारांची भाषा समजत नाही, म्हणून मी ठोकतो (टाळ्या)
* मी मारले तर "का मारलं?'; सचिनने मारले तर "काय मारलं !' (हशा)
* "मारवाडी फाउंडेशन'चे "मराठी फाउंडेशन' करा (टाळ्या)
* परप्रांतीय मतदारसंघ तयार करतील, तर मी आडवा येणारच
* मराठीबद्दल मी बोललो तर संकीर्ण, दुसरे बोलले तर व्यापक?
* मराठवाड्यापेक्षा भुजमधील भूकंपग्रस्तांना महाराष्ट्रातून जास्त मदत (खंत)
* परखड बोला आणि माझ्यावरील केसेस तुम्ही घ्या

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें