शनिवार, 5 अप्रैल 2014

पैशाच्या जोरावर गृहीत धरणाऱ्यांना जागा दाखवा'

नाशिक - स्वतः मंत्री, पुतण्या खासदार, मुलगा आमदार... सगळे यांना घरामध्ये पाहिजे. महात्मा जोतिबा फुले यांची हीच का समता, असा छगन भुजबळ यांना थेट प्रश्‍न उपस्थित करीत, यांनी महाराष्ट्राला लुटले आहे. निवडणुकांमध्ये पैशाच्या जोरावर निवडून येता येते, हे गृहीत धरणाऱ्यांची मस्ती जिरवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

सिडकोत पवननगरला आज मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात श्री. ठाकरे बोलत होते. माजी खासदार राजाभाऊ गोडसे, सरचिटणीस वसंत गिते, अतुल चांडक, ऍड. उत्तमराव ढिकले, आमदार नितीन भोसले, महापौर ऍड. यतीन वाघ, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे, शहराध्यक्ष समीर शेटे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, की राज्यात टोलनाक्‍यांच्या संरक्षणासाठी पोलिस आहेत. पण नागरिकांच्या संरक्षणाला नाही. टोल म्हणजे मंत्र्यांचा पॉकेटमनी. हाच पैसा निवडणुकांत ओततील. भुजबळही पैसे ओततील. ओतलाच तर निवडणुका आहेत, तुम्हीही यांना लुटा. पुतण्या खासदार, मुलगा आमदार, स्वतः मंत्री सगळेच यांना घरात लागते, हीच महात्मा जोतिबा फुलेंची समता का, अशी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना, महात्मा फुले यांचे नाव घेता, पण त्यांच्या नखाची तरी सर आहे का, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी उभे आयुष्य खर्ची घातले. शेणफेक सहन करीत, स्त्रीशिक्षणाचा हट्ट धरला. इकडे तुमच्या शिक्षणसंस्था लोकांच्या डोनेशनवर उभ्या राहत आहेत, अशी टीका केली.

श्री. ठाकरे यांनी 2010 मध्येच गुजरातचा दौरा केल्याचे सांगून, तेव्हाच आपण नरेंद्र मोदी यांच्यासारखा माणूस देशाचा पंतप्रधान असला पाहिजे, असे म्हटल्याची आठवण करून देत, नरेंद्र मोदींच्या विकासकामांची स्तुती केली. राज्यात मनसेचे भूमिपुत्रांच्या प्रश्‍नावर आंदोलन पेटले होते. तेव्हा एक खासदार बोलला नाही, अशी टीका केली. हिमाचल प्रदेशात भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या देण्याच्या हमीशिवाय प्रकल्पांना मान्यता देत नाहीत. अनेक राज्यांत स्थानिक प्रतिनिधी त्यांच्या अस्मितेविषयी जागरूकता दाखवितात. फक्त महाराष्ट्रात मात्र नेमका संकुचित विचार म्हणून आम्हाला चिरडले जाते. कुणी यावे इथे मतदारसंघ बांधावेत, असे म्हणून दोन मतदारसंघांतून आबू आझमी निवडून येतो. त्यांचे लोक आपल्या मतदारसंघात पाठवितात, असे सांगत स्थानिक मराठीच्या मुद्द्याला स्पर्श केला.

राज्याची संपूर्ण सत्ता द्या राज्याची संपूर्ण ताकद एकदा देऊन बघा, असे नेहमीचे आवाहन करीत ते म्हणाले, की राज्य कसे हाकले जाते, हे दाखवून देतो. लोकसभेत कसे लोक पाठवायचे याचा मतदारांनी विचार केला पाहिजे. कायदेमंडळ आहे. तेथे रस्ते, गटारीची कामे करण्यासाठी लोक पाठविणार का? डॉ. प्रदीप पवार
डॉक्‍टर आहेत. संवेदनशील आहेत, असे सांगून तिरुपती येथील मंदिराचे उदाहरण देत, मंदिरांचा जिल्हा असलेल्या नाशिकमधील अव्यवस्थेवर टीका केली.

19 ला टराटरा फाडतोच
मराठीच्या अस्मितेचा मुद्दा, विकासाला वेळ लागतो, हा नाशिक महापालिकेतील साक्षात्कार, महाराष्ट्रात बदल घडविण्यासाठी राज्याच्या पूर्ण सत्तेचे आवाहन आणि सरतेशेवटी सत्ताधाऱ्यांविषयीच्या नाराजीवर कोरडे ओढीत हमखास टाळ्या मिळविणाऱ्या वाक्‍यासह पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका या मुद्द्याभोवती राज ठाकरे यांचे भाषण होते. शिवसेनेबद्दल मात्र चकार शब्दही काढला नाही. मात्र त्याच वेळी 19 एप्रिलच्या जाहीर सभेत टराटरा फाडतोच असे जाहीर आव्हानही दिले.

समीर नव्हे आमीर भुजबळ
तत्पूर्वी आमदार नितीन भोसले यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करताना, आचारसंहितेपूर्वी 15 दिवस आधीच्या विविध जाहिरातबाजीत भुजबळांनी 50 कोटी खर्च केल्याचा आरोप केला. राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या बीओटी तत्त्वावरील रस्त्याचे श्रेय काका-पुतणे घेत असल्याची टीका करीत उड्डाणपुलाच्या तांत्रिक नियोजनात त्रुटी असल्यामुळेच आतापर्यंत सहा बळी गेल्याचाही आरोप केला.

उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी, वीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेत असल्याचे सांगताना, 2009 ते 2014 या काळात 11 कंपन्यांचे संचालक असूनही कुठलेही कर न भरताच भागविक्री केल्याचा समीर भुजबळांवर आरोप केला. तसेच नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी दगडाला शेंदूर लावला तरी तोही
खासदार होईल, असा विश्‍वास असल्यामुळेच पालकमंत्री छगन भुजबळांसारख्या मोठ्या नेत्याविरोधात लढण्याची हिंमत असल्याचा दावा केला. या वेळी ऍड. ढिकले, सौ. डेरे यांच्यासह स्थानिकांची भाषणे झाली. अशोक सातभाई यांनी सूत्रसंचालन केले.

-माझी इंचभर तरी जागा दाखवा अन्‌ फुकट घेऊन जा.
-त्यांनी महाराष्ट्र लुटला, तुम्ही निवडणुकीत यांना लुटा.
-जेथे महिलांची उपस्थिती तेथे विजय असतो निश्‍चित.
-विकास करायचा तर, वेळ लागतोच.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें