मुंबई : शेतकऱ्यांचा राग समजू शकतो. जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये. त्या संपातही मालकांना त्रास झाला नाही, कामगारांना झाला, तसं शेतकऱ्यांसोबत होऊ नये, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संपाविषयी मनसेची भूमिका मांडली. शेतकरी संपाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारकडे पैसे नाहीत, आता म्हणतात कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का? सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
”शेतकरी आंदोलनाचा आणि पक्षाचा काय संबंध?”
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षाशी जोडून मोकळं होऊ नका, ते मांडतात तो विषय योग्य की अयोग्य एवढं फक्त सांगा, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. शेतकरी संपात काही पक्षांचा सहभाग असून ते हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
शेतकरी संपात पक्षाचा सहभाग असला तरी त्यांचा प्रश्न योग्य की अयोग्य ते ठरवून त्यावर निर्णय घ्या. आपल्याकडे फक्त प्रश्न तयार होतात. त्याचं उत्तर मिळत नाही. मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले, त्याचं पुढे काय झालं? असंही राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेवर हल्लाबोल
शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रश्नाविषयी राग किंवा चिड दिसत नाही. ते सध्या कुठे आहेत, तेच दिसत नाही. त्यांना जे काही खाती दिलेली आहेत. त्यातच ते व्यस्त आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेचाही समाचार घेतला.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :
- जवान आणि किसान दोघेही मरतायेत, भाजपवाले मात्र खुशाल – राज ठाकरे
- योजनांना गोंडस नावं देऊन सरकार भुलवतंय – राज ठाकरे
- निवडणुकीआधी घोषणा, सत्तेत आल्यानंतर घोषणा, पैसे आहेत का यांच्याकडे? – राज ठाकरे
- अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील, तर करावं, पण प्रश्न सोडवावा, ते महत्त्वाचं आहे – राज ठाकरे
- शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा, शेतकऱ्यांसोबत कायमच आहे – राज ठाकरे
- मराठा आरक्षणासाठीही मोर्चे निघाले, पुढे काय झालं?, आपल्याकडे तोडगे निघत नाहीत – राज ठाकरे
- शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षाचं लेबल का लावताय? – राज ठाकरे
- सरकारकडून शेतकरी आणि जनतेची फसवणूक – राज ठाकरे
- हे सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे – राज ठाकरे
- सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का? – राज ठाकरे
- शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो, मात्र जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये – राज ठाकरे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें