मंगलवार, 17 नवंबर 2009

आझमीला येथे येऊन बोलू दे.... - शिशिर शिंदे

आझमीला येथे येऊन बोलू दे.... - शिशिर शिंदे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 17, 2009 AT 11:45 PM (IST)

मुंबई - अबू आझमी फक्त पेटवापेटवीचे धंदे करीत आहेत. लखनौमध्ये जाऊन अशा प्रकारची वक्तव्ये करून राजकारण करण्याचा हा प्रकार आहे. त्यांना जे बोलायचे ते येथे येऊन बोलू दे, मग नंतर बघू, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व आमदार शिशिर शिंदे यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदी भाषा आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची आव्हानात्मक भाषा आझमी यांनी लखनौमध्ये केली. यासंदर्भात आमदार शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आझमी दोन जागेवर निवडून आले आहेत, त्यापैकी एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे दुसरी जागा निवडून आणण्यासाठी व व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी ते ही बडबड करीत आहेत. आम्ही त्यांच्या बडबडीला महत्त्व देत नाही.

रविवार, 15 नवंबर 2009

'कोहिनूर'ची जमीन राज ठाकरेंनी विकली

'कोहिनूर'ची जमीन राज ठाकरेंनी विकली
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 15, 2009 AT 02:27 PM (IST)

मुंबई - घसघशीत ४२१ कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आलेली दादर येथील "कोहिनूर' मिलची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पार्टनरनी विकली आहे. आर्थिक मंदीमुळे ही जमीन विकत असल्याचे कारण राज यांच्या "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'ने सांगितले आहे. तरीही मंदीच्या काळात या जागेला ६२९ कोटी रुपये इतका भाव आला आहे. जमिनीच्या व्यवहारात संबंधितांचे उखळ पांढरे झाले असले, तरी या जागेवर उभ्या राहणाऱ्या मॉलमध्ये रोजगार मिळण्याचे मराठी तरुणांचे स्वप्न तूर्तास तरी भंगले आहे. येत्या काळात या जागेवर व्यावसायिक संकुल उभे राहणार असून त्यामध्ये तरी मराठी तरुणांना रोजगार मिळेल काय, असा सवाल आता केला जात आहे.

राज ठाकरे हे "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'चे संचालक असून त्यांचे व्यावसायिक भागीदार राजन शिरोडकर हे या कंपनीचे चेअरमन आहेत. "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'ने २००५ मध्ये कोहिनूर मिलची दादर येथील जागा खरेदी केली होती. या व्यवहारात शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा "कोहिनूर ग्रुप' आणि "इन्फ्रास्ट्रक्‍चर लीजिंग ऍण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस' ही कंपनी राज यांचे भागीदार होते. शिवसेना भवनसमोरच असलेली कोहिनूर मिल क्रमांक तीनची ही सुमारे पाच एकर जागा तेव्हा ४२१ कोटींना विकत घेण्यात आली होती. एकापाठोपाठ एक गिरण्या बंद पडत असताना धनदांडगे या जागा विकत घेऊन गिरणी कामगारांना रस्त्यावर आणत असल्याची टीका सुरू असतानाच्या काळात या जागेचे व्यवहार झाले होते.

राज ठाकरे हे तेव्हा शिवसेनेत होते. या जागेसाठी राज यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा सवाल केला जात होता. त्या वेळी राज व त्यांच्या पार्टनरनी बॅंकेतून कर्ज काढल्याचा दाखला दिला होता. दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी राज यांच्या उद्यमशीलतेचे कौतुक करून पाठराखण केली होती. राज यांनीही तेव्हा या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या उद्योगांत मराठी तरुणांनाच प्राधान्य मिळेल असे वक्तव्य केले होते.

शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी मोक्‍याच्या जागेवर असलेल्या या जमिनीवर "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर' कंपनी मॉल बांधणार होती. त्यादृष्टीने मॉलच्या तळघराचे बांधकाम पूर्ण झाले होते; मात्र आर्थिक मंदीमुळे मॉलमधील दुकानांना मिळणारा ६०० रुपये प्रति चौरस फुटांचा भाव २०० रुपयांपर्यंत खाली उतरला. मंदीत होणाऱ्या या आर्थिक नुकसानीमुळे कंपनीने ही जागा तेथील बांधकामासह सहा महिन्यांपूर्वी विकल्याचे "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्‍चर'चे राजन शिरोडकर यांनी सांगितले.

चार वर्षांपूर्वी ४२१ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या या जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे १०५० कोटींवर पोचते; मात्र मंदीमुळे ६२९ कोटी रुपयांना ती विकण्यात आली आहे. जमीनविक्रीनंतर तिन्ही पार्टनरना प्रत्येकी ६२ कोटी रुपयांचा लाभ झाल्याचे राजन शिरोडकर यांनी सांगितले. आर्थिक मंदीमुळे जमिनीला ६२९ कोटी रुपये भाव आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात हा व्यवहार त्यापेक्षाही जास्त रकमेने झाला असावा, अशी शक्‍यता रिअल मार्केटमध्ये व्यक्त केली जात आहे.

स्टेट बॅंक मुद्द्यावरून सेना-मनसे आमने-सामने?

स्टेट बॅंक मुद्द्यावरून सेना-मनसे आमने-सामने?
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 14, 2009 AT 11:53 PM (IST)


मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या पदांवर मराठी भाषक तरुणांनाच नोकरी देण्यात यावी, परप्रांतीयांची निवड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. 'मनसे' विरोधात आता शिवसेना उतरली असून मनसेनं गोंधळ घातल्यास शिवसेना दादर, बांद्रा, पार्ल्यात सुरक्षा देणार आहे.

आज (रविवार) होणाऱ्या बॅंकेच्या भरती परीक्षेसाठी परप्रांतीय उमेदवारही येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक पोलिस ठाण्याला दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्रांवर पोलिस तैनात करण्यात येणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस ठाण्यांना अतिरिक्त कुमकही पुरविण्यात आली आहे.

शनिवार, 14 नवंबर 2009

मराठीचा मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी नाही - भारतकुमार राऊत

मराठीचा मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी नाही - भारतकुमार राऊत
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 15, 2009 AT 12:00 AM (IST)


ठाणे - निवडणुका जिंकण्यासाठी मराठी माणसाचा प्रभाव पडत नाही, तर दुसऱ्या मराठी माणसाला पाडण्यासाठीच त्याचा प्रभाव पडतो. निवडून येण्याच्या गुणवत्तेवर मराठी माणसाचा प्रभाव नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही मराठी माणसासाठी "पाडवणूकच' ठरते. हे अगदी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून होत आले आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली.

अर्थ फाऊंडेशन आयोजित नरेंद्र बल्लाळ स्मृती व्याख्यानमालेत "निवडणुका आणि मराठी मानसिकता' या विषयावर श्री. राऊत बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राजकीय विश्‍लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी भूषविले.

या वेळी श्री. राऊत म्हणाले की, भाषावार प्रांतरचनेमुळे प्रादेशिक अस्मिता असणे स्वाभाविक आहे व आवश्‍यकही आहे; परंतु स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत मराठी माणूस "मराठी' म्हणून मतदान करीत नाही. आज मुंबईत 19 अमराठी आमदार निवडून आले आहेत. इतर भाषक आमदारांना विरोध नाही, हे सांगत दररोज सुमारे 350 कुटुंबे महाराष्ट्रात येतात, असेही त्यांनी नमूद केले; पण अशीच जर परिस्थिती राहिली तर 2014 मध्ये होणारी लोकसभा व राज्यसभा निवडणूक ही मुंबईसह महाराष्ट्राची शेवटची निवडणूक ठरण्याची शक्‍यता आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, मराठी माणसाच्या पीछेहाटीचे आणखी एक कारण म्हणजे आपली मराठी माणसाचा आर्थिक कमकुवतपणा. महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नातून मुंबई जर वेगळी केली तर ओरिसा, छत्तीसगड अशा राज्यांबरोबर आपण येतो. "आपण नोकरीत पडतो व धंद्यात पडतो' अशीच आपली मानसिकता आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर दिल्लीत मराठी माणसाला अनेक मानाची पदे मिळाली; पण नेतृत्व व मानाची पदे यात फरक आहे. आज महाराष्ट्रातून प्रत्येक स्तरावर राष्ट्रीय नेतृत्व घडविण्याची गरज आहे. समाज दुर्बल झाला की त्याचे प्रतिनिधित्व करणारी भाषाही दुर्बल होते. आज मराठी समाजाची उन्नती आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व मराठी माणसांनी मराठी म्हणून मतदान करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.