'कोहिनूर'ची जमीन राज ठाकरेंनी विकली
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 15, 2009 AT 02:27 PM (IST)
मुंबई - घसघशीत ४२१ कोटी रुपये मोजून खरेदी करण्यात आलेली दादर येथील "कोहिनूर' मिलची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पार्टनरनी विकली आहे. आर्थिक मंदीमुळे ही जमीन विकत असल्याचे कारण राज यांच्या "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर'ने सांगितले आहे. तरीही मंदीच्या काळात या जागेला ६२९ कोटी रुपये इतका भाव आला आहे. जमिनीच्या व्यवहारात संबंधितांचे उखळ पांढरे झाले असले, तरी या जागेवर उभ्या राहणाऱ्या मॉलमध्ये रोजगार मिळण्याचे मराठी तरुणांचे स्वप्न तूर्तास तरी भंगले आहे. येत्या काळात या जागेवर व्यावसायिक संकुल उभे राहणार असून त्यामध्ये तरी मराठी तरुणांना रोजगार मिळेल काय, असा सवाल आता केला जात आहे.
राज ठाकरे हे "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर'चे संचालक असून त्यांचे व्यावसायिक भागीदार राजन शिरोडकर हे या कंपनीचे चेअरमन आहेत. "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर'ने २००५ मध्ये कोहिनूर मिलची दादर येथील जागा खरेदी केली होती. या व्यवहारात शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा "कोहिनूर ग्रुप' आणि "इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग ऍण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस' ही कंपनी राज यांचे भागीदार होते. शिवसेना भवनसमोरच असलेली कोहिनूर मिल क्रमांक तीनची ही सुमारे पाच एकर जागा तेव्हा ४२१ कोटींना विकत घेण्यात आली होती. एकापाठोपाठ एक गिरण्या बंद पडत असताना धनदांडगे या जागा विकत घेऊन गिरणी कामगारांना रस्त्यावर आणत असल्याची टीका सुरू असतानाच्या काळात या जागेचे व्यवहार झाले होते.
राज ठाकरे हे तेव्हा शिवसेनेत होते. या जागेसाठी राज यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा सवाल केला जात होता. त्या वेळी राज व त्यांच्या पार्टनरनी बॅंकेतून कर्ज काढल्याचा दाखला दिला होता. दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी राज यांच्या उद्यमशीलतेचे कौतुक करून पाठराखण केली होती. राज यांनीही तेव्हा या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या उद्योगांत मराठी तरुणांनाच प्राधान्य मिळेल असे वक्तव्य केले होते.
शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी मोक्याच्या जागेवर असलेल्या या जमिनीवर "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनी मॉल बांधणार होती. त्यादृष्टीने मॉलच्या तळघराचे बांधकाम पूर्ण झाले होते; मात्र आर्थिक मंदीमुळे मॉलमधील दुकानांना मिळणारा ६०० रुपये प्रति चौरस फुटांचा भाव २०० रुपयांपर्यंत खाली उतरला. मंदीत होणाऱ्या या आर्थिक नुकसानीमुळे कंपनीने ही जागा तेथील बांधकामासह सहा महिन्यांपूर्वी विकल्याचे "मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर'चे राजन शिरोडकर यांनी सांगितले.
चार वर्षांपूर्वी ४२१ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या या जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे १०५० कोटींवर पोचते; मात्र मंदीमुळे ६२९ कोटी रुपयांना ती विकण्यात आली आहे. जमीनविक्रीनंतर तिन्ही पार्टनरना प्रत्येकी ६२ कोटी रुपयांचा लाभ झाल्याचे राजन शिरोडकर यांनी सांगितले. आर्थिक मंदीमुळे जमिनीला ६२९ कोटी रुपये भाव आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात हा व्यवहार त्यापेक्षाही जास्त रकमेने झाला असावा, अशी शक्यता रिअल मार्केटमध्ये व्यक्त केली जात आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें