सकाळ वृत्तसेवा
Friday, November 20, 2009 AT 02:10 PM (IST)
ठाणे - ते येणार आहेत... ते नक्की येणार आहेत, अशा कुजबुजीला अखेर नऊच्या सुमारास विराम मिळाला. सुटाबुटातील राज ठाकरे यांचे आगमन झाल्यावर ते आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकून निघून गेले, असा अनुभव उपस्थित बहुतांश लोकांना आला. "शिवसेनेच्या मांडवात मनसेचाच बोलबोला' अशी स्थिती कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांच्या भावाच्या लग्नमंडपात पाहावयास मिळाली.
आनंद परांजपे यांचे बंधू अमोल यांच्या लग्नाचा स्वागत सोहळा घोडबंदर रोड येथील सुरज वॉटर पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोहळ्यात गुरुवारी (ता. 19) सायंकाळी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनंत तरे, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार संजीव नाईक, संजय दिना पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे बाळकृष्ण पुर्णेकर, मनोज शिंदे, नारायण पवार आदींनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व नेत्यांमध्ये लग्नात सातत्याने चर्चा सुरू होती ती राज ठाकरे यांच्या आगमनाची. आनंद परांजपे यांनी त्यांची आई सुप्रिया परांजपे व भाऊ अमोल यांच्या आग्रहावरून राज ठाकरे यांना "कृष्णकुंज'वर जाऊन सोमवारी लग्नाची पत्रिका दिली. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना व मनसेमध्ये कटुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही कटुता आत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही आली आहे. अशा वातावरणात शिवसेनेच्या खासदारांनी थेट राज ठाकरे यांना लग्नाचे आमंत्रण दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता; मात्र दिवगंत खासदार प्रकाश परांजपे यांची विचारपूस शेवटपर्यंत राज ठाकरे यांनी केल्याचे स्मरण परांजपे कुटुंबीयांनी यानिमित्ताने करून दिले. अगदी शेवटच्या काळातही परांजपे यांना भेटून त्यांनी धीर दिला होता. या कौटुंबिक जिव्हाळ्यामुळेच राज यांना लग्नाला बोलाविण्यात आले. राज यांनीही हे नाते जपत शिवसेनेचे खासदार असूनही परांजपे यांच्या बंधूच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. राज ठाकरे यांचे आगमन होताच त्यांना उपस्थितांचा एकच गराडा पडला. लहान-थोर मंडळींनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.
नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊन झाल्यावर पुन्हा एकदा त्यांच्याभोवती गर्दी जमा झाली. या वेळी एकेकाळी भाविसेमध्ये राज यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे व आता ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले नेते नरेश म्हस्के यांनी राज यांना "ज्यूस' पिण्याचा आग्रह केला; पण पुढील कार्यक्रमांमुळे थोडा वेळ थांबून राज निघून गेले. शिवसेना खासदाराच्या भावाच्या लग्नातील राज यांची उपस्थिती केवळ उपस्थित शेकडो शिवसैनिकच नाही, तर सर्वपक्षीय नेत्यांसाठीही चर्चेचा विषय ठरली होती.
---------------------------------------------
राज-संजय राऊत यांची अखेर गाठ पडली
राज ठाकरे यांच्या आगमनाच्या पंधरा मिनिटे आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत मंडपात पोचले. ते व्हीव्हीआयपी दालनात भोजन घेत असतानाच राज ठाकरेंचे आगमन झाले. ते वर-वधूंना शुभेच्छा देत असतानाच एलसीडी स्क्रीनवर हा शुभेच्छा सोहळा पाहत संजय राऊतांनी भोजन आटोपते घेतले. व्हीव्हीआयपी दालनात राज ठाकरे काही वेळ थांबण्याची अपेक्षा होती; मात्र ते लगेचच निघाल्याने संजय राऊत व त्यांची गाठ पडलीच. "काय कसे काय? बरे आहे ना?' असे म्हणून दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें