सोमवार, 19 सितंबर 2011

Raj Thackeray speaking with media persons at Sabarmati Gandhi Ashram, Ahmedabad, Gujarat

'जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा खड्ड्यांचे काढा'

'जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा खड्ड्यांचे काढा' सकाळ वृत्तसेवा Tuesday, September 20, 2011 AT 01:00 AM (IST) मुंबई - अन्य राज्यांत जाऊन जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढले असते, तर आपण किती "माती' केली ते कळले असते. फोटोग्राफीची हौस फिटली असती आणि जनतेचेही भले झाले असते, असा सणसणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीवरून लगावला. राज यांनी उद्धव यांचे थेट नाव घेतले नसले तरी मुंबई महापालिकेतील आगामी आरोप प्रत्यारोपांची धुळवड यानिमित्ताने सुरू झाली, असे मानले जाते. राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. त्यानंतर आज सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अन्य राज्यात जाऊन महाराष्ट्रावर टीका करणाऱ्यांचा शिवसेनेच्या मुखपत्रात आज समाचार घेण्यात आला होता. त्याबाबत विचारणा केली असता, राज्यावर कोणीही टीका करत नसून नाकर्त्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. महाराष्ट्राची बदनामी कोणी करू शकत नाही. त्याची बलस्थानेही कोणी नाकारू शकत नाही, असे राज यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तसेच अडवानी यांनी मोदी भावी पंतप्रधान म्हणून योग्य असल्याचे सांगितल्यावर आपल्याला बरे वाटले. राज्याचा विकास करणारा माणूस पंतप्रधान झाल्यास देशासाठी ती चांगलीच गोष्ट आहे. अमेरिकेनेही त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. ही भाजपची अंतर्गत बाब असली, तरी विकासाच्या मुद्द्यावर मोदींना पंतप्रधान झालेले पाहण्यास आपल्याला निश्‍चित आवडेल, असे राज यांनी सांगितले. गुजरातमध्ये 24 तास वीज आहे. संपन्न महाराष्ट्राची येथील सत्ताधाऱ्यांनी वाट लावली आहे. राज्यातील भारनियमन, आत्महत्या, रस्त्यांवरील खड्डे, नागरिकांच्या विरोधातील कंत्राटे या मुद्द्यांवर बोलायचे नाही, तर कशावर बोलायचे, असा प्रश्‍न त्यांनी केला. आम्ही राज्यावर टीका करीत नसून येथील राज्यकर्त्यांबद्दल बोलतोय. चांगले काम करणाऱ्या राज्याबद्दल बोलायचे नाही तर काय करायचे. बाळासाहेब 1982 मध्ये अमेरिकेत जाऊन आल्यावर तेथील विकासकामांचीही त्यांनी स्तुती केली होती. गुजरातमधील महापालिका नफ्यात आहेत. आमच्या मात्र संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. 72 टक्के खर्च वेतनावर होतोय. उरलेले उत्पन्न खाबुगिरीमध्ये जातेय. माझा कोणत्याही राज्यावर रोष नाही. उद्या बिहारने बोलावले, नितीशकुमारांचे आमंत्रण आले, तर तिकडेही जाईन. नितीशकुमार काम करतात, ही चांगली बाब आहे. परप्रांतीय भूमिपुत्रांना आणि त्यांच्या भाषेला नाकारतात. त्यामुळे मी त्यांना विरोध करतो. अण्णांना मी दूरध्वनीवरून पाठिंबा दिला होता; पण त्यांच्या बाजूला असलेल्या बेदी आदी चौकडीला भेदून जाण्यासाठी मी काही अभिमन्यू नाही; मात्र अण्णांची भेट लवकरच घेणार असल्याचे राज यांनी सांगितले. भाजपला लाथा खाण्याची सवय नरेंद्र मोदींच्या मैत्रीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या आपण जवळ जात आहात का, असा प्रश्‍न राज यांना विचारण्यात आला. त्या वेळी आपण कोणाबरोबरही जाण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे ते म्हणाले. भाजपला एवढी वर्षे शिवसेनेच्या लाथा खाण्याची सवय लागली असल्याची कडवट टीकाही राज यांनी या वेळी केली

मोदींप्रती सदभावनेसाठी राज ठाकरे गुजरातेत

मोदींप्रती सदभावनेसाठी राज ठाकरे गुजरातेत वृत्तसंस्था Monday, September 19, 2011 AT 12:29 PM (IST) अहमदाबाद - सदभावना मिशन अंतर्गत तीन दिवसांचे उपोषण करीत असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार) उपोषणाच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पाहणे आपल्याला आवडेल असे म्हटले आहे. अहमदाबाद येथे सुरु असलेल्या मोदींच्या उपोषणस्थळी राज ठाकरे यांनी आज सकाळी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मॉडेलला अमेरिकेने देखील प्रमाणपत्र दिलेले आहे. मोदींवर असलेले दंगलीचे आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले असल्याने त्यांनी समर्थन करण्यात काहीच गैर नाही. अमेरिकन काँग्रेसच्या एका अहवालात मोदींचे देशाच्या विकासात असलेल्या योगदानाबद्दल दखल घेणे उल्लेखनीय आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातच्या विकासाचा दर हा ११ टक्के राहिला आहे. त्यावरून गुजरात हे प्रगतीप्रथावर असल्याचे दिसून येते. गुजरातच्या शांतीसाठी सदभावना मिशन अंतर्गत नरेंद्र मोदी शनिवारपासून तीन दिवसांचे उपोषण करीत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा शेवटचा दिवस असून, एनडीएमधील नेत्यांनी त्यांची या दरम्यान भेट घेतली आहे. मात्र, नितीश कुमार यांनी मोदींच्या या उपोषणावर टीका केली आहे.

शुक्रवार, 16 सितंबर 2011

मुंबई वार्तापत्र - मराठी मतांसाठी पुन्हा फिल्मी "राज'कारण

मुंबई वार्तापत्र - मराठी मतांसाठी पुन्हा फिल्मी "राज'कारण मृणालिनी नानिवडेकर (सकाळ न्यूज नेटवर्क) Saturday, September 17, 2011 AT 12:15 AM (IST) मराठी मतांवर दावा सांगण्यासाठी राज ठाकरे पुढे आले आहेत. एका जाहिरातीत मराठी महिलेचा झालेला वापर म्हणूनच त्यांना खटकला की काय, अशी शंका येते. असे भावनिक राजकारण करून मतपेटी मजबूत होते का हे आता पाहायचे. निवडणुका आल्या की कारभाराचे ऑडिट देण्यापासून खड्डे मोजण्यापर्यंतची सारी आन्हिके नव्या उत्साहात सुरू होतात. मराठीचा विषयही तसाच समोर आला आहे. जाहिरातीत मराठी माणसाला मिळणाऱ्या दुय्यम स्थानाचा विषय घेऊन राज ठाकरे महापालिकेच्या फडात उतरण्यास सज्ज झालेले दिसतात. कुणाचे मराठीपण अधिक प्रखर हे दाखवण्यासाठी जुन्या आणि नव्या सेनेतला सामना नेहमीप्रमाणे रंगत जाईल. यात मराठी माणसाच्या, मराठी अस्मितेच्या आणि महाराष्ट्राच्या प्रश्‍नांना खरोखरच न्याय मिळेल का? छोटे ठाकरे गुजरातेतून नुकतेच परतले आहेत. त्यामुळे या वेळचे मराठीपुराण क्रियाशीलतेवर भर देणारे असेल, अशी आशा बाळगायला हरकत नसावी. मुंबई-पुणे-नाशिकचा सुवर्णत्रिकोण ओलांडू न शकलेली प्रगती, संपन्न म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील अर्धी जनता दारिद्य्ररेषेच्या खाली, नागरी भागातील झोपड्यांत होणारी वाढ, दाक्षिणात्य राज्यांनी औद्योगीकरणात मारलेली बाजी, मराठी भाषेची सातत्याने होत असलेली पीछेहाट, असे अनेक प्रश्‍न महाराष्ट्रासमोर आ वासून उभे आहेत. प्रत्यक्षात या प्रश्‍नांना हात घालण्याऐवजी प्रतीकात्मक मुद्‌द्‌यांनाच राज ठाकरे धरून बसणार का, या उत्तरात जनतेला रस आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष साटेलोटे करून आपल्याला लुटतात, अशी जनभावना आहे. त्यामुळेच राजकीय क्षितिजावर नव्यानेच उगवलेल्या मनसेकडे जनता फार अपेक्षेने पाहते. त्यातच गुजरातचा दौरा करून आपल्याला प्रगतीत रस आहे, असे चित्र निर्माण करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले आहेत. "ठाकरे ब्रॅंड'चे यश मराठी माणसाच्या प्रश्‍नांना त्यांनी हात लावताच मध्यमवर्गीय उत्साहाने कान टवकारतात, तर आता नक्‍कीच काही तरी बदल होईल, ही वेडी आशा निम्नमध्यमवर्गींयात जागी होते. हे "ठाकरे ब्रॅंड'चे यश आहे. दशदिशांतून येणाऱ्या कुशल-अकुशल कामगारांच्या जोरावरच कुठलेही महानगर विकसित होत असते. प्रादेशिकतेची कुंपणे घालून प्रगती होत नसते हे सत्य. पण त्या त्या शहरातल्या मूळ रहिवाशांचे अस्तित्व या प्रक्रियेत हरवू लागले, की गोंधळ सुरू होतो. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतल्या मराठी माणसाला आवाज कुणाचा हे ठणकावून सांगण्याचे धैर्य दिले. दाक्षिणात्यांकडे गेलेल्या नोकऱ्या लोकाधिकाराने मराठी माणसाकडे परत पोचवल्या. त्यांचा शत्रूही हे वास्तव नाकारू शकणार नाही. पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत समोर येण्याचे परिश्रम करण्याची साहसी वृत्ती मराठी माणसांत निर्माण झाली नाही. दहा ते पाच काम करून घरी परतण्यात धन्यता मानणारा मराठी माणूस जीवनाच्या नवनव्या क्षेत्रांना कवटाळण्यासाठी फारसा उत्सुक नसतो, हा समज सर्वमान्य होत गेला. महाराष्ट्रातल्या मुंबईत बॉलिवूड वाढले; पण मराठी सिनेइंडस्ट्री मात्र कोल्हापुरातच रमली. अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठी माणसाची पीछेहाट पानिपतच्या पराजयाने झाली की मनोवृत्तीने ते सांगता येणार नाही; पण आपण मर्यादित राहिलो हे मात्र खरे. पांडू हवालदार, गंगूबाई अशा स्वरूपात चित्रपटसृष्टी मराठी माणसाचे चित्र रेखाटू लागली. "सारांश'सारख्या अद्वितीय चित्रपटात सदाचाराचा आग्रह धरणारा निवृत्त मुख्याध्यापक मराठी दाखवला. पण अशी उदाहरणे विरळा. एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत हॅंडसेट चोरणारी बाई मराठी दाखवल्याने राज ठाकरे संतापले आणि त्यांनी ही जाहिरात मागे घ्यायला लावली. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी देऊन टाकला. "खळळ खटाक'च्या भीतीने या पुढे कुणीही अशी कृती करणार नाही. पण खरे प्रश्‍न पुढेच आहेत. मुळात अशी प्रतीकात्मक कृती निवडणुकीमुळे केली काय हा जनतेच्या मनात येणारा पहिला प्रश्‍न. येती महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंमधील संघर्षाचा नवा सामना ठरणार आहे. भाऊबंदकीच्या कथा आपल्याला महाभारत काळापासून आवडत असल्याने चॅनेलवाले टीआरपीसाठी दोघांमधले कलगीतुरे रंगवण्यास प्राधान्य देतील. अंतर्गत वादामुळे मुंबई पालिकेतला प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस निवडणूक लढण्यापूर्वीच हरल्यात जमा आहे. आघाडी होईल काय याबाबतची धूसरता कायम आहे. पालिकेचा कारभार फारसा समाधानकारक नाही; मात्र त्याविरोधात औषधालाही कॉंग्रसने आवाज केलेला नाही. मुंबईची सत्ता मराठी माणसाच्या हातात राहावी, या उदात्त हेतूने कॉंग्रेसने नेहमीच शिवसेनेला मोकळीक दिल्याचे राजकीय अभ्यासक नमूद करतात. मात्र या मराठी मतांवर दावा सांगण्यासाठी राज ठाकरे पुढे आले आहेत. शिवसेनाप्रमुख ठाकरेंचे नेतृत्व, शिस्तबद्ध शाखांची उत्तम बांधणी, रिपब्लिकन मतांची संभाव्य बेरीज अशी रसद घेऊन उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत, तर प्रतिमा हे राज यांच्याजवळचे एकमेव भांडवल आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकही अशीच झाली होती. मुंबईत नेमके काय घडेल याचा अंदाज यायला अद्याप वेळ आहे. मात्र मराठी माणसांचे प्रश्‍न केवळ मतांसाठी हाती घेतले जातील काय, हा प्रश्‍न मात्र आजच निर्माण झाला आहे. मासेमारीपासून तर कॉर्पोरेट पदापर्यंतचे सारे व्यवहार परप्रांतीयांच्या हाती आहेत. मोदींनी गुजराती माणसातल्या उद्यमशीलतेला आवाहन करीत ते राज्य समोर आणले. बाळासाहेब आणि राज या दोघांचे राजकारणही त्याच पठडीतले आहे. संकुचित दृष्टिकोनाचा स्वीकार ठाकरेंनी केला; पण प्रगतीचा अजेंडा देण्याचे काय? १९९५ नंतर महाराष्ट्राची पीछेहाट का होत गेली, याची उत्तरे राज्यकर्त्यांना सेनेने विचारली नाहीत. आज राज ठाकरेंचे मराठीपणाचे कढ हे केवळ भावनिक राजकारण पेटवण्याचा प्रयत्न वाटतो आहे एवढेच

सत्ता शिवसेनेची, कंट्रोल राज ठाकरेंचा!

सत्ता शिवसेनेची, कंट्रोल राज ठाकरेंचा! सुनील जावडेकर ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत सारी मोट बांधून शिवसेनेने मनसेकडे जाणारी सत्ता खेचून आणली असताना प्रत्यक्षात पालिका कारभारावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाच कंट्रोल जाणवतो. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह ठाण्यातील शिवसैनिकही संभ्रमात पडले आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरेच कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांमध्ये अधिक स्वारस्य दाखवू लागल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि कॉंग्रेस आघाडीतील भांडणापेक्षा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईमुळे गाजली होती. शिवसेनेचे 32; तर मनसेचे 28 उमेदवार विजयी झाले. किमान 15 ते 20 जागांवर मनसेचे उमेदवार अत्यंत थोड्या मतांनी पराभूत झाले; अन्यथा राज यांच्या करिष्म्यामुळे मनसेचे किमान 40 नगरसेवक सहज निवडून आल्यात जमा होते. त्यामुळे अखेर शिवसेनेचा महापौर झाला आणि मनसेला विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आले. सत्ता मिळाली नसली, तरी विरोधी पक्षात बसलेल्या राज ठाकरे यांनी विकासकामांच्या पाहणीच्या निमित्ताने, तर कधी रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी करण्याच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महापालिकेवरील त्यांची पकड अधिक मजबूत करण्यास सुरवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांमध्ये अधिक लक्ष घालत असल्याने आणि पालिका आयुक्तांसह प्रशासनाला आदेश देत असल्याने शिवसैनिक बुचकळ्यात पडले आहेत. आतापर्यंत कल्याण, डोबिवलीच्या इतिहासात पालिकेतील विरोधी पक्षाचा कोणताही पक्षप्रमुख इतक्‍या वेळा विकासकामांबाबत महापालिकेत आलेला नाही. मुळात विरोधी पक्षाने त्यांचे अस्तित्व कधी दाखवू दिले नाही; पण राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटींनी शिवसैनिकांची झोप उडवली आहे. आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये राज ठाकरे यांचा शब्द कल्याण-डोंबिवलीत अंतिम मानला जाऊ लागला आहे; तर शिवसेना-भाजप युतीची सत्ता असलेल्या पालिकेवर कंट्रोल राज ठाकरे यांचाच चालत असल्याची उघड भावना शिवसैनिकांमध्ये तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीत व्यक्त होऊ लागली आहे

बुधवार, 7 सितंबर 2011

सेना-मनसेने एकत्र यावे - नाना पाटेकर

सेना-मनसेने एकत्र यावे - नाना पाटेकर
-
Wednesday, September 07, 2011 AT 04:00 AM (IST)

मुंबई - मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना व मनसेने एकत्र येणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज केले. मराठी माणसाचे मत एकच असल्याने ते मत तुम्ही कापून घेणार काय, असा प्रश्‍नही त्यांनी या पक्षांना उद्देशून केला.

शिवसेना हा मराठी माणसाचा आधार होता; मात्र तुम्ही त्यातून मनसे हा वेगळा पक्ष का स्थापन केलात, असा थेट सवाल नानांनी मुलाखतकार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांना विचारला. त्यावर महाभारतातील कृष्णाच्या दुर्योधनासोबतच्या अयशस्वी शिष्टाईचे उदाहरण देऊन पारकर यांनी तसे होणे अशक्‍य असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. मुंबई गणेश महोत्सव-2011 अंतर्गत "नाना रंग' हा नाना पाटेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम "महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान'तर्फे साठ्ये महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.

अण्णा हजारे यांचे व त्यांच्या आंदोलनाचे पाटेकर यांनी कौतुक केले; मात्र ज्या दिवशी आपल्या स्वतःच्या आयुष्यातून भ्रष्टाचाराचे पूर्ण निर्मूलन होईल, तेव्हाच अण्णांच्या आंदोलनात सामील होईन, असेही त्यांनी स्पष्ट केले. "टीम अण्णा'मधील किरण बेदी व अरविंद केजरीवाल यांच्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. राजकारणात जाण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले

मंगलवार, 6 सितंबर 2011

"राज ठाकरेंचा गुजराती मतावर डोळा नाही''

"राज ठाकरेंचा गुजराती मतावर डोळा नाही'
वृत्तसंस्था
Tuesday, September 06, 2011 AT 06:33 PM (IST)मुंबई- ""आगामी महापालिका निवडणुकीत गुजराती समाजाच्या मतावर डोळा ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे)अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केला नव्हता, तर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेला राज्याचा विकास पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी तो दौरा होता. '' अशी माहिती मनसेचे नेते आणि आमदार बाळा नांदगावकर यांनी आज (मंगळवारी) दिली.

ते म्हणाले,"" राज ठाकरे यांना गुजरातचा दौरा करायचा होता. मात्र त्यांची आणि मोदींच्या समन्वयाबाबत तारीख निश्‍चित होत नसल्याने दौरा लांबत गेला. शेवटी गेल्या महिन्यात राज यांना गुजरातचा दौरा करावा लागला. मुंबई महापालिकेची निवडणूक झाली की ते पुन्हा गुजरातचा दौरा करणार आहेत. त्यामुळे मनसेचा गुजराती मतांवर डोळा आहे असा अर्थ काढणे चुकीचे आहे.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांविषयी बोलताना नांदगावकर म्हणाले, की वास्तविक गुजरात आणि महाराष्ट्राची एकाच दिवशी स्थापना झाली. गुजरात मात्र महाराष्ट्राच्या पुढे गेला. आम्ही मागे राहिलो. त्यांनी विकास कसा केला. याची दखल घेण्याची गरज आहे.''

नांदगावकर यांनी यावेळी शिवसेना-भाजपवरही टीका केली ते म्हणाले, ""मुंबईकरांनी युतीला महापालिकेत सत्तेवर आणले, मात्र ते आता वीस वर्षांनी पुन्हा सत्तेवर येण्यासाठी लोकांसमोर कोणत्या चेहऱ्यांनी ते जाणार आहेत.'