मंगलवार, 10 अक्टूबर 2017

परप्रांतीय कामगारांना 'मनसे'ने दिला चोप

कुपवाड - स्थानिक युवकांना औद्योगिक वसाहतीत काम मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत परप्रांतीय कामगार हटाओ मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केली आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश न आल्याने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुपवाड औद्योगिक वसाहतीत मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना अडवून बेदम चोप दिला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या प्रकारानंतर मनसेचे कुपवाड शहर प्रमुख विनय देवगोंडा पाटील (वय २०, लिंगायत गल्ली) याच्यासह सागर लक्ष्मण मगदूम (वय २२) आणि अविनाश तुकाराम मासाळ (वय २३, दोघे बजरंगनगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. जितेंद्रकुमार रामेश्‍वर साह (वय २५, एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी - औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी स्थानिक युवकांनाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांना अधिक नोकऱ्या दिल्याने स्थानिक युवक बेरोजगार आहेत. यासाठी परप्रांतीय हटाओ मोहीम मनसेने सुरू केली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर कुपवाड परिसरात आज आंदोलन करण्यात आले.
दरम्यान,  मंगळवारी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना सुटी असल्याने परप्रांतीय कामगार मिळाले नाहीत. मुख्य रस्त्यावरून चालत जाणाऱ्या परप्रांतीय युवकांना मारहाण करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली. घाबरलेल्या परप्रांतीय कामगारांनी पळ काढला. त्यानंतर तातडीने कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी शहराध्यक्ष पाटीलसह तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
‘‘औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देण्याचा अध्यादेश २००८ मध्ये पारित करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरवा केला. मात्र दखल न घेतल्याने आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे  इथून पुढेही परप्रांतीय हटाओ मोहीम सुरूच राहील.’’
- तानाजी सावंत, 

जिल्हाध्यक्ष, मनसे, सांगली
सोशल साईटवर बातमी व्हायरल
‘मनसे’ स्टाइल आंदोलनाचे वृत्त समजल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. सायंकाळी झालेल्या प्रकारानंतर हा प्रकार वाऱ्यासारखा सोशल साईटवर फिरला. मारहाण सुरू असताना कोणीतरी व्हिडीओ तयार करीत होते. ती व्हिडिओ क्‍लिपही व्हायरल झाली. या प्रकारामुळे औद्योगिक वसाहतीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दिवाळीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. तीही व्हायरल झाली.
संतप्त प्रतिक्रिया
‘मनसे’ या पक्षाचा परप्रांतीयांना रोखणे, हा पक्षीय अजेंडा असू शकतो; मात्र भरचौकात युवकांना अडवून बेदम मारहाण करीत त्यांच्या गृहोपयोगी वस्तूंचीही नासधूस करण्यात आली. हे अमानवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.

बुधवार, 4 अक्टूबर 2017

राज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आज मनसेचा संताप मोर्चा; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याने आज नक्की काय घडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अजूनही मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसे आणि प्रशासनात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही मोर्चाची संपूर्ण तयारी केली आहे. आता काही झाले तरी मोर्चा निघणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा निर्धार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. लोकशाहीत मोर्चाला परवानगी दिली जात नाही, हा कुठला नियम म्हणायचा. हा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली.




मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मनसेच्या या मोर्चाला परवानगी दिली जात नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तांत्रिकरित्या तशी परवानगी देणे पोलिसांना आणि प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नसली तरी त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. मेट्रो चित्रपटगृहापासून पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच चर्चगेट स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मनसेकडूनही या भागात मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मरिनलाईन्स स्थानकापासून रेल्वे मुख्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावर मनसेचे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. तर चर्चगेट स्थानकाच्या परिसरात एक लहानसे व्यासपीठ उभारले जात असून या ठिकाणी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणात असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चर्चगेट स्थानकाचा परिसर बॅरिकेडस लावून बंदिस्त करण्यात आला आहे.



* मनसेच्या मोर्चाला रेल्वे प्रवासी संघटनांचा पाठिंबा
* मोर्चाला परवानगी नाकारणे हा तर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- संदीप देशपांडे
* लोकशाहीत मोर्चाला परवानगी देणार नाही, हा कुठला नियम- संदीप देशपांडे
* ब्रिटीशही मोर्चांना परवानगी देत होते, मात्र हे सरकार परवानगी देत नाही,
* आमची तयारी पूर्ण; मोर्चा निघणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ- संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस
* मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन

रविवार, 1 अक्टूबर 2017

‘माझे असत्याचे प्रयोग’; राज ठाकरेंचं मोदींवर पुन्हा टीकास्त्र

महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रातूनही राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान धादांत खोटे बोलतात, अशी टीका राज ठाकरे यांनी शनिवारी केली होती. त्या टीकेला धरुन राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढत मोदींना पुन्हा लक्ष्य केले. राज यांनी त्यांच्या व्यंगचित्राला ‘एकाच मातीतील दोघे,’ असे शीर्षक दिले आहे.
राज ठाकरेंनी गांधी जयंतीनिमित्त रेखाटलेल्या छायाचित्रात महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी दिसत आहेत. यामध्ये गांधींच्या हातात ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. महात्मा गांधींच्या बाजूला उभ्या असलेल्या मोदींच्या हातातही राज ठाकरेंनी एक पुस्तक दिले आहे. राज ठाकरेंनी या पुस्तकाला ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे नाव दिले आहे. ‘पंतप्रधान मोदी धादांत खोटे बोलतात. इतक्या मोठ्या प्रमाणात खोटे बोलणारा पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिला नाही,’ अशी टीका राज यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींच्या हातात राज यांनी ‘माझे असत्याचे प्रयोग’ हे पुस्तक दिले आहे. मोदी खोटे बोलतात. त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहिल्यास त्याचे नाव ‘माझे असत्याचे प्रयोग’ असेल, असे राज यांना सुचवायचे आहे.
पंतप्रधान मोदींवरील व्यंगचित्राला राज ठाकरेंनी ‘एकाच मातीतील दोघे’ असे शीर्षक दिले आहे. महात्मा गांधी आणि मोदी हे एकाच मातीतील, म्हणजेच गुजरातमधील आहेत. मात्र या दोघांमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. महात्मा गांधी कायम खरे बोलायचे. त्यामुळेच त्यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘माझे सत्याचे प्रयोग’ आहे. मात्र गांधींच्याच मातीमधील, म्हणजेच गुजरातमधील मोदींनी त्यांचे आत्मचरित्र लिहिल्यास त्याला ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे नाव द्यावे लागेल, असे राज यांनी व्यंगचित्रातून सुचवले आहे.


शनिवार, 30 सितंबर 2017

मुंबईत बुलेट ट्रेनची वीटही रचू देणार नाही : राज ठाकरे Full Video

मुंबई : 'जगायचं कसं हा प्रश्‍न लोकांसमोर पडला आहे आणि तुम्ही त्यांना योगा करायला सांगताय.. स्वच्छता करायला सांगताय.. कॉंग्रेस गेले आणि भाजप आले.. देशात फरक काय पडला? गेल्या साडेतीन वर्षांत फक्त नोटांचा रंग बदलला. असलेल्या गोष्टी सुधारण्याऐवजी आम्ही काहीतरी नवीन गोष्टी आणतोय. मेट्रोमुळे मुंबईची आणखी वाट लागली आहे. आता मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही. बुलेट ट्रेन हवीच असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्येच ती फिरवावी.. यासंदर्भात जबदरस्ती करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सरकारला इशारा दिला.
मुंबईत एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि प्रशासनाची ढिलाई याविरोधात येत्या 5 ऑक्‍टोबर रोजी मनसे चर्चगेटला मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व राज ठाकरे करणार आहेत. 'या मोर्चात सर्व मुंबईकर आणि ठाणेकरांनी सहभागी व्हावे. या मोर्चांचे परिणाम होत असतात. हा गर्दीचा विषय नाही; राग व्यक्त करण्याचा आहे', असे आवाहन राज यांनी केले.

राज ठाकरे म्हणाले.. 
  • काल घटनास्थळी मुद्दाम गेलो नाही. कारण तिथे जाऊन आपल्या यंत्रणेवर ताण देण्याची इच्छा नव्हती. पोलिस, फायरब्रिगेड, डॉक्‍टर त्यांची जबाबदारी पार पाडत असतात. पण तिथे मीडिया असते म्हणून सगळे पुढारी, मंत्री घटनास्थळी जातात. मदतकार्य सुरू असताना चिंतेचा आव आणून तिथे जाण्यात उपयोग नसतो. 
  • गेली दहा-पंधरा वर्षे याच एका एल्फिन्स्टन पुलाबद्दल भांडत आहेत; पण काहीही झालं नाही. 
  • आपल्या शहरांमध्ये इतक्‍या सरकारी संस्था काम करतात आणि सगळ्या संस्था आपापली जबाबदारी झटकत आहेत. कुणीही उत्तर द्यायला तयार नाही. 
  • कसलं 'मुंबई स्पिरीट'? रोज सकाळी उठून ऑफिसला जावंच लागतं.. त्याला पर्याय नाही. 
  • शहरांवर बाहेरचे लोंढे येऊन आदळणे थांबत नाहीत, तोपर्यंत अशा घटनांवर उपाय नाहीत. मुंबई, ठाणे, पुणे ही शहरे आचके देत आहेत. इथे पायाभूत सुविधाच नाहीत. 
  • रेल्वे स्थानकांची परिस्थिती सुधारण्यासाठी यंत्रणा नाही आणि आपण बुलेट ट्रेन आणायला चाललो आहोत. 
  • आपल्या देशात बाहेरचे दहशतवादी हवेच कशाला? आपणच आपली इतकी माणसे मारत असतो..

मंगलवार, 26 सितंबर 2017

सोशल मिडीयाच अस्त्र भाजपवर बुमरँग झालयं: राज ठाकरे

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
निवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर, नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला 'जुमला' होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत, असे राज यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज म्हणाले, ''तुम्ही केलेल्या नोटबंदीने अर्थव्यवस्था डबघाईला गेली, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महागाईने कळस गाठलाय आणि एवढं होऊन देखील लोकांनी तुम्हाला जाब विचारायचा नाही? पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत? आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटिसा धाडणार? पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो 'ट्रोल्सचं' काय? फोटोशॉपचा वापर करून नव्हत्याच, होतं केलंत. तुम्हाला विरोध करणाऱ्या पत्रकारांबद्दल, विचारवंतां बद्दल भारतीय जनता पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडियाकरवी इतकं गलिच्छ लिहिलं गेलं की ते वाचून मरू दे तो सोशल मीडिया असं वाटावं. तेंव्हा नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला? दुसऱ्या राजकीय पक्षांची,त्यांच्या नेत्यांची थट्टा करताना तुम्हाला आनंद मिळत होता पण तुमची थट्टा व्हायला लागल्यावर तुम्ही पोलिसी बळाचा वापर करणार?''
स्वाती चतुर्वेदी नावाच्या पत्रकार बाईंनी लिहिलेल्या I am a Troll पुस्तकांत भारतीय जनता पक्षाची आयटी आणि सोशल मीडिया टीम कसं काम करते याची पूर्ण माहिती आहे. या भस्मासुरांना तुम्ही पोसलंत, त्यांच्या बरोबर पंतप्रधान सेल्फी घेतात, त्यांना ट्विटरवर फॉलो करतात याचा अर्थ अराजक पसरावणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय. आणि तुमच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत बसवताय हा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. ज्यांना ज्यांना अश्या नोटिसा सरकारने धाडल्या असतील किंवा धाडल्या जातील त्यांनी माझ्याशी connectrajthackeray@gmail.com या माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधा,तुमचं नाव,पत्ता,पोलीस स्टेशनचं नाव संपर्क क्रमांक कळवा. पुढे पाहू काय करायचं ते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच नाही तरी कोणाही सामान्य माणसाला जरी अशी नोटीस आली तरी मला कळवा. अजून एक बाब, मी पहिल्यापासून पोलिसांच्या पाठीशी ठाम उभा होतो, आहे आणि राहणार. माझी पोलिस बांधवाना विनंती आहे की तुम्ही सरकारच्या दडपणाखाली असल्या गोष्टी करू नका, सरकार बदलत राहतात, सरकारच्या सांगण्यावरून असल्या चुकीच्या गोष्टी करू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.