मंगलवार, 8 मई 2018

"बुलेट ट्रेन'ला "मनसे'ची धडक

ठाणे - केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर विरोध दर्शवल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाण्यातील दिवा-शिळ भागात बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच सोमवारी सकाळी मोजक्‍या स्थानिकांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवत पोलिस बंदोबस्तात सुरू असलेला जमिनीच्या सर्वेक्षणाचा डाव उधळून लावला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीनेही दिवा-म्हातार्डी गावात स्थानिक भूमिपुत्र आणि तहसीलदार, पोलिस, रेल्वे अधिकारी आदींची बैठक घेऊन जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत सर्व्हे करून देणार नसल्याची भूमिका घेतली होती.

दिवा-शिळ येथील शिळ, डवले, पडले, आगासन, बेतवडे, देसाई आणि म्हातार्डी या सात गावांतून बुलेट ट्रेन जात असून नियोजित स्थानक दिवा-म्हातार्डी परिसरात असल्याने भूसंपादनासाठी आवश्‍यक असलेल्या जमिनीच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचे पथक सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात दिवा-शिळ भागात आले होते. तेव्हा सरकारच्या या सर्वेक्षणाला मनसेने विरोध दर्शवत मोजणीसाठी आणलेले यंत्र उधळून लावत सर्वेक्षण बंद पाडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी सर्वेक्षणासाठी उपस्थित असलेले तहसीलदार अधिक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, गावकऱ्यांशी वेळोवेळी बैठका तसेच जिल्हास्तरावर चर्चा झाल्या आहेत. शिळ गावातील नागरिकांच्या मागण्या नाहीत. मात्र, म्हातार्डी येथील नागरिकांना जमिनीचे दर वाढवून देण्याची मागणी आहे. तरीही आंदोलन करणाऱ्या मनसेला प्रकल्पाची माहिती देऊन चर्चेतून मार्ग काढला जाईल.
दरम्यान, सकाळी बुलेट ट्रेनच्या सर्व्हेला विरोध दर्शविल्यानंतर सायंकाळी ठाणे तहसीलदार कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पुन्हा एकदा बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास विरोध दर्शवणाऱ्या घोषणा देत सर्वेक्षण होऊ देणार नसल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. मनसेच्या या आंदोलनाला मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनविसे अध्यक्ष संदीप पाचंगे, मनोहर चव्हाण, पुष्कर विचारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व बाधितांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून प्रशासनाने जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तरीही मनसेचा विरोध असेल तर त्यांना शासनाची भूमिका समजावून सांगितली जाईल.
- सुदाम परदेशी, प्रांताधिकारी, ठाणे.  
पाठ फिरताच पुन्हा सर्वेक्षण 
मनसेने बुलेट ट्रेनसाठी लागणाऱ्या भूमी सर्वेक्षणाला सोमवारी क्षणिक विरोध दर्शवल्यानंतरही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने मनसेची पाठ फिरताच पुन्हा पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे आता संघर्ष अटळ बनल्याची चिन्हे दिसत आहेत.

शुक्रवार, 4 मई 2018

भाजपमधील एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक ; राज यांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका


उल्हासनगर : ''व्यक्ती बदलला की भूमिका बदलते. भाजपमध्ये एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्याकडून आज आणि भविष्यात धोके दिसत आहेत'', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. भाजपशी हातमिळवणी करणार का, या प्रश्नावर प्रथम भाजपला तर मोदीमुक्त होऊ द्या, असे राज ठाकरे म्हणाले.
उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये आज कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेत राज ठाकरे हे बोलत होते. ते म्हणाले, ''नरेंद्र मोदी यांची राजकीय भूमिका ही गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना नष्ट करण्याची आहे. विशेषतः शेतकऱ्यांबाबत बुलेट ट्रेनच्या नावावर बनावट सात बारा बनवून त्यांच्या जमिनी हडपल्या जात आहेत. नाणार प्रकल्प कोकणात येणार याबाबत स्थानिक अनभिज्ञ राहतात. पण परप्रांतीय व्यापाऱ्यांना अगोदरच कसे ठाऊक होते ? ते जमिनी विकत घेऊन मोकळे होतातच कसे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार आणि परप्रांतीय व्यापारी एकत्र आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

उल्हासनगर शहरात मनसेच्या नेत्यांनी एकही नगरसेवक नसताना विद्यमान शहर जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका तयार होत असल्याचे राज ठाकरे यांच्या निदर्शनास येताच त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय मनसे कामगार युनिटचे अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या युनिटचे काम, कब्रस्तानचा पाठपुरावा, एल बी टी गैरव्यवहार उघडकीस आणल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांची त्यांनी स्तुती केली. यापुढे सातत्याने सर्व शहरांना भेट देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिले.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, राजू पाटील, संदीप देशपांडे, सचिव सचिन मोरे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनी बंडू देशमुख, सचिन कदम, प्रदीप गोडसे, संजय घुगे, शैलेश पांडव, मनोज शेलार, शालिग्राम सोनवणे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावून लवकरच 'कृष्णकुंज'वर बोलवून पक्ष संघटनेचे धडे देणार असे सांगितले.

बुधवार, 2 मई 2018

राज ठाकरेंनी केले कार्यकर्त्याच्या घरी जेवण

आज दुपारी पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील माझा महाराष्ट्र सैनिक, वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवायला गेलो होतो. 


शनिवार, 14 अप्रैल 2018

नाणारचे ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला 'कृष्णकुंज'वर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नाणारवासियांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल.
नाणारच्या प्रकल्पग्रस्तांनी आज (शनिवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की, ‘सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल.’

केंद्र सरकारकडून नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील

रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही मोठी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत सह्याही झाल्या. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळ असलेल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार आहे.

या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली होती.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील, तसंच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असं सांगण्यात येत आहे.

पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल. असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं.

नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

रविवार, 8 अप्रैल 2018

नाशिकमध्ये मनसेचे इंजिन धावले; भाजपला धक्का

नाशिक : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेराच्या क गटातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैशाली मनोज भोसले यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांचा २३३३ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेे मनसेला पाठिंबा दिला.

भाजपच्या विजया लोणारी यांना तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. वैशाली भोसले यांना ७४५३, शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांना ५२३१, तर भाजपच्या विजया लोणारी यांना ४८१० एवढी मते मिळाली. निवडणुकीत उभ्या असलेल्या उर्वरीत सहा जणांचे अनामत रक्कम जप्त झाली.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी येथे मनसेची जागा असली तरी बहुतांश भाग भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी व्यापला असल्याकारणाने येथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होण्याची अपेक्षा होती. परंतु मतदारांनी पुन्हा भोसले कुटुंबीयांवर विश्वास ठेवत भाजपला नाकारले.