शुक्रवार, 1 जून 2012

मग, वाघांसाठी 'बंद' का नाही? - राज

मग, वाघांसाठी 'बंद' का नाही? - राज
- सकाळ वृत्तसेवा
Friday, June 01, 2012 AT 01:45 AM (IST)
चंद्रपूर - पेट्रोलची भाववाढ झाल्याने संपूर्ण देशात बंद पुकारण्यात आला. मात्र, वाघाच्या इतक्‍या शिकारी होऊनही कुणी आवाज उठवीत नाहीत. वाघांसाठी बंद का नाही, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला.

ताडोबा अभयारण्यातील शिकार, पुनर्सवनाच्या मार्गावरील गावांना भेट दिल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. 31) राज ठाकरे यांनी महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर येथील हिराई विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, वाघाच्या शिकारीसंदर्भात जे वृत्तपत्रात वाचले, ते प्रत्यक्ष बघण्यासाठी इथे आलो. स्वयंसेवी संस्था, गावकरी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर परिस्थिती समजेल. शिकारीत गावकऱ्यांचा सहभाग असेल. त्यामुळे बाहेरचे शिकारी इथे तळ ठोकून बसतात. स्थानिकांनी शिकारी टोळ्यांना मदत करणे आता थांबविले पाहिजे, असे आवाहन केले.

विदेशातील शासन वन्यप्राण्यांच्या संरक्षणात अतिशय गंभीर आहेत. मात्र, देशातील शासनाची उदासीन भूमिका आहे. नेते केवळ भूखंड आणि पैसा हडप करण्याच्या मागे लागले आहेत. उद्या वाघांचे जंगल नष्ट करून वनजमिनी बळकावतील, अशी भीती राज यांनी व्यक्त केली. येथील कोळसा खाणी मानवासह वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. वन्यजीवांच्या रक्षणासाठी वनविभागाने स्वयंसेवी संस्थांना विश्‍वासात घेऊन काम करण्याची गरज आहे, असल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार बाळा नांदगावकर, आमदार नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, मनसेचे पूर्वविदर्भ संघटक हेमंत गडकरी, जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार उपस्थित होते.

प्रत्येक बाबतीत राजकारण करणे ठीक नाही. प्राण्यांवर प्रेम आणि आपुलकी आहे. म्हणूनच थंड हवेच्या ठिकाणी न जाता 47 अंश तापमान असलेल्या चंद्रपूरात आलोय, ते उगीच नव्हे.
- राज ठाकरे.

शुक्रवार, 4 मई 2012

मनसेचा कोणताही आमदार युरोप दौऱ्यात नाही

मनसेचा कोणताही आमदार युरोप दौऱ्यात नाही
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, May 05, 2012 AT 03:45 AM (IST)

मुंबई - युरोप दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही आमदार जाणार नाही, असे पक्षाचे विधिमंडळ व्हिप आमदार नितीन सरदेसाई यांनी आज स्पष्ट केले. विधिमंडळ प्रतोद म्हणून आपण विधान मंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना याआधीच तसे पत्र दिल्याचे ते म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने हा दौरा होणार आहे.

"सकाळ'मध्ये या संदर्भात "मनसेचाही आमदार युरोप दौऱ्यात' या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावर स्पष्टीकरण देताना सरदेसाई यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केले. ते म्हणाले, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी या दौऱ्यासाठी पक्षाचे आमदार नितीन भोसले यांचे नाव सुचविले होते; मात्र त्यानंतर कोणत्याही आमदाराला पाठविण्यात येणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.

सरदेसाई यांच्या वतीने महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना पाठविलेले पत्र या विभागाच्या लिपिकांनी स्वीकारल्याची तारीख 2 मे आहे. या पत्रात मे व जून 2012 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने युरोपीय देशाचा परदेश दौरा होणार आहे. या दौऱ्याकरिता मनसे पक्षाच्या सदस्याचे नाव कळविण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. परंतु या दौऱ्यासाठी मनसेकडून कोणताही सदस्य पाठविण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी "आधी केले, मग सांगितले" या भावनेने प्रथम आपल्या आमदारांना परदेश दौऱ्यावर न जाण्याचा आदेश दिला व नंतर इतरांना सल्ला दिला असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले

बुधवार, 2 मई 2012

परदेशी मंत्र्यांना जिल्हाबंदी करा- राज ठाकरे

परदेशी मंत्र्यांना जिल्हाबंदी करा- राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, May 02, 2012 AT 05:13 PM (IST)

मुंबई - रेल्वे परिक्षेबाबत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त भागात जाऊन मतदकार्य करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. दुष्काळग्रस्त भागात जाऊन चारा आणि पाणी पुरवितानाच प्राणीमित्र, संघटनांच्या मदतीने प्राण्याचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना रस्त्यावरच फोटा, अशा शब्दांत त्यांनी आपले प्राणीप्रेम दर्शविले. दुष्काळ पडल्यानंतर दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणाऱ्या परदेशी मंत्र्यांना जिल्हाबंदी करावी, ऐन मे मध्ये परदेशात जाऊन अभ्यास करणाऱ्या आमदारांना जिल्हाबंदी करावी, असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
मुंबई येथे घेण्यात आलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्रात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दहशत, जबर असलीच पाहिले, असेही ते म्हणाले. आगीमध्ये भस्मसात झालेल्या सहा हजार 800 क्षेत्राचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगल जळाले. मात्र, सरकारने काहीच केले नाही. अशाप्रकारचे कृत्य करणारी मोठी लॉबी सध्या महाराष्ट्रभर फिरते आहे. अशाप्रकारच्या आगी लावायच्या आणि ती जमीन काबीज करून पैसा कमवायचा, अशी या राज्यकर्त्यांची वृत्ती आहे. जनावरे मरताहेत, झाडे जळताहेत याचे त्यांना काही देणेघेणेच राहिलेले नाही. मात्र, हे सर्व होत असताना मनसेच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी काम काम केले, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. येत्या काही दिवसात मी पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम देणार असून त्यावर मी देखरेख ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मे महिना आली, की आमदारांचे अभ्यासदौरे सुरू होतात. मात्र, या अभ्यासदौऱ्यातून ते काय शिकून आले, हे एकदाही सरकार विचारत नाही. अशा आमदारांना जिल्हाबंदी केली पाहिजे, असे मार्गदर्शन करतानाच ठाकरे यांनी मनसेच्या एकाही आमदाराला अशाप्रकारच्या अभ्यासदौऱ्यांना पाठविले जाणार नाही, अस ठासून सांगितले.

दुष्काळग्रस्त भागात काम करायला जाताना, उद्देशन स्पष्ट ठेवला पाहिजे. त्या ठिकाणी भाषणबाजी, प्रचार आदी गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तेथील स्थानिक वृत्तपत्रांनाही त्याबाबतची माहिती मिळाली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले

शुक्रवार, 27 अप्रैल 2012

सचिनने खासदारकी स्वीकारणे योग्य -राज ठाकरे

सचिनने खासदारकी स्वीकारणे योग्य -राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Friday, April 27, 2012 AT 02:56 PM (IST)  
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राज्यसभेची खासदारकी स्वीकारणे हा योग्य निर्णय असल्याचे सांगून त्याच्या खासदारकीला आमचा पाठिंबा आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सांगितले.

पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी सचिनच्या खासदारकीला पाठिंबा दिला. राज म्हणाले,""सचिनला खासदारकी बहाल करणे हा त्याचा सन्मान आहे. त्याने खासदारकी स्वीकारणे हा योग्य निर्णय आहे. याबाबतीत राजकारण करायला नको. सचिनच्या खासदारकीची चर्चा होते हे कोतं राजकारण आहे. सचिन महान क्रिकेटपटू आहे. त्याच्या विक्रमाचा गौरव व्हायलाच हवा. सचिन राज्यसभेवर जाणार आहे, कॉंग्रेसमध्ये नाही. त्यामुळे सचिनने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, अशी उलट सुलट चर्चा चुकीची आहे.''

दुष्काळावर राज म्हणाले,""इतकी वर्षे कॉंग्रेसच्या हातात सत्ता होती. तरीही पश्‍चिम महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याचा महाराष्ट्राने विचार करण्याची गरज आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात जर दुष्काळ पडत असेल तर मराठवाडा आणि विदर्भाचा विचार न केलेलाच बराच. केंद्र आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तरीही दुष्काळी परिस्थितीत काही फरक पडला नसेल तर त्या निधीचे अखेर झाले तरी काय?'

शुक्रवार, 13 अप्रैल 2012

अखेर बिहार दिनाचा तिढा सुटला

अखेर बिहार दिनाचा तिढा सुटला
- सकाळ वृत्तसेवा
Friday, April 13, 2012 AT 04:18 PM (IST),  
मुंबई- 15 एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बिहार दिनाच्या कार्यक्रमाचा तिढा अखेर आज (शुक्रवारी) सुटला. बिहार दिनाला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र बिहार दिनाच्या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्ये करण्यात येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बिहार दिनाचे आयोजक देवेशचंद्र ठाकूर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले,""भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्षे पूर्ण झाली तर बिहार दिनाची शताब्दी कशी काय साजरी करण्यात येत आहे, ते मला समजले नाही. बिहार दिनाला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना माझा विरोध नाही. मुंबईला होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने होणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकता अशा शहरांमध्ये बिहार दिन साजरा होणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. परंतु, बिहार दिनाच्या नावाखाली व्यासपीठावरून राजकीय वक्तव्ये सहन केली जाणार नाही. याची आयोजकांची काळजी घ्यावी.''

बिहारमधील विकासावर राज म्हणाले,""बिहारमध्ये नीतिशकुमार चांगले काम करीत आहेत. तेथे विकासाची कामे सुरू आहेत. असाच विकास सुरू राहिला तर महाराष्ट्रातील बिहारी लोकांनी आपल्या राज्यात परतायला हरकत नाही. समाजवादी पक्षाकडून महाराष्ट्रात राजकारण केले जात आहे. येथे येऊन आपली ताकद दाखविण्याची भाषा करायची, हे खपवून घेतले जाणार नाही.

गुरुवार, 12 अप्रैल 2012

नितीशकुमार यांनी बिहार दिन साजरा करून दाखवावाच ! राज ठाकरे यांचे आवाहन

नितीशकुमार यांनी बिहार दिन साजरा करून दाखवावाच ! राज ठाकरे यांचे आवाहन


मालेगाव,  वार्ताहर
altसर्वकाही सुरळीत असताना उगाचच आम्हांला डिवचणाऱ्या नितीशकुमारांनी मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवावाच, असे आव्हान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे दिले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने येथे आयोजित प्रचंड जाहीर सभेत राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्याला हात घालतानाच मिळकत जमा करण्यामागे लागलेल्या राज्यातील नेत्यांनाही टिकेचे लक्ष केले. मालेगाव शहराचा विकास असा झालाच नाही, हे स्पष्ट करताना मालेगावसारखी शहरे पाडून पुन्हा बांधावयास हवीत, या शब्दांत राज यांनी मालेगावच्या अधोगतीचे वर्णन केले.
मुंबईत १५ एप्रिल रोजी ‘बिहार दिन’ साजरा करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार येणार आहेत. मुंबईत येण्यासाठी आम्हांला कुणाचा व्हिसा घेण्याची गरज नाही, या नितीशकुमार यांच्या विधानाच्या पाश्र्वभूमीवर राज त्यांना कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. मालेगावच्या जाहीर सभेत नितीशकुमार यांच्या या विधानाचा आपल्या खास ठाकरी शैलीत समाचार घेताना राज यांनी नितीशकुमार यांनी मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवावाच, असे आव्हान दिले. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, आम्ही काहीही वक्तव्य केलेले नसताना नितीशकुमार यांनी आम्हांला डिवचण्याचा प्रयत्न केला. ते जर असे वागत असतील तर यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयांना मराठी माणसाकडून व्हिसा घ्यावाच लागेल. आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असून शासन जर याप्रकरणी आपणांस अटक करणार असेल तर त्यांनी करून दाखवावी. एकदा त्यांनी असा प्रयत्न करून पाहिल्यावर त्याचे काय परिणाम होतात, त्याचा अनुभवही त्यांनी घेतला, असे एकप्रकारे राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही राज यांनी आव्हान दिले.
मालेगावच्या अधोगतीला परप्रांतीयच जबाबदार आहेत. मालेगावच्या समस्या कोणी जाणण्याचा प्रयत्नच केलेला नाही. आम्ही तुम्हांला कोणतेही आश्वासन देणार नाही. जे शक्य आहे, ते आम्ही करूच. परंतु आमचे लक्ष आहे पुढील विधानसभा निवडणुकीकडे. या निवडणुकीत मनसेच्या हातात सत्ता देवून बघा, मग महाराष्ट्राचा विकास कसा करून दाखवितो ते बघा, असे आवाहनही राज यांनी केले. महाराष्ट्रातील नेते जमीन, फ्लॅटस् घेण्यामागे लागले आहेत. आपल्या पाच-सहा पिढय़ांचे कल्याण त्यांना साधावयाचे आहे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांना काहीही करावयाचे नाही, असा टोलाही त्यांनी हाणला

बुधवार, 11 अप्रैल 2012

मनसेच्या प्रचाराचा नारळ मालेगावमध्ये फुटणार

मनसेच्या प्रचाराचा नारळ मालेगावमध्ये फुटणार
- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, April 12, 2012 AT 01:30 AM (IST)

राज ठाकरे यांची बुधवारी जाहीर सभा

मुंबई- राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. मनसेच्या प्रचाराचा नारळ उद्या (ता. 12) मालेगाव येथे फुटणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने प्रचाराला सुरवात होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता मालेगाव येथील कॉलेज मैदानात ही सभा होईल.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे शिवसेनेप्रमाणेच मनसेनेही दुर्लक्ष केले होते. मनसेनेच्या वतीनेही मुंबई, नाशिक, पुणे महापालिकांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्येच खऱ्या अर्थाने लढत झाली, तर मनसे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी जमतील तेवढ्या जागा मिळविण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेत केला. मात्र, राज यांनी मालेगावमधील सभेतून प्रचाराला सुुरवात केल्याने ग्रामीण भागातील पाचही महापालिकांमधील निवडणुका तयारीने लढविण्याचे संकेत राज यांनी दिल्याचे मानले जात आहे