शुक्रवार, 13 जुलाई 2012

टोलवसुलीचा डब्बा फुल्ल..!

टोलवसुलीचा डब्बा फुल्ल..!


* मुंबईत वसुलीचे उद्दिष्ट साध्य झाल्याचा मनसेचा दावा * राज ठाकरे फोडणार वसुलीचा फुगा
संदीप आचार्य , मुंबई

राज्य शासन व महाराष्ट्र राज्य महामार्ग वकिास महामंडळ (एमएसआरडीसी) काहीही सांगत असले तरी मुंबईच्या पाचही जकात नाक्यांसाठीचे टोल-वसुलीचे उद्दिष्ट २०१० सालीच पार झाले असल्याने सध्या सुरू असलेली टोल-वसुली अन्याय्य असल्याचा निष्कर्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या मोजणी आंदोलनातून काढण्यात आला आहे. त्यामुळे मुलुंड, ऐरोली, दहिसर, एलबीएस मार्ग आणि वाशी नाक्यावरील टोल-वसुली ‘मनसे स्टाइल’ने बंद करायची की न्यायालयात पितळ उघडे पाडून टोल बंद करायला लावायचा, याचा निर्णय राज ठाकरे लवकरच जाहीर करतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रात जागोजागी उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांमुळे वाहनचालक कमालीचे हैराण झाले आहेत. टोलनाक्यांची मुदत किती, मुदतवाढ का दिली जाते, दररोज किती गाडय़ांकडून टोल वसूल केला जातो, नेमके किती उत्पन्न मिळाले, शासनाकडून दाखविण्यात येणारी आकडेवारी ‘मॅनेज’ केलेली आहे का, टोल दरवाढ कोणाच्या भल्यासाठी केली जाते आदी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम गेले काही महिने मनसेचा रस्ते व आस्थापना विभाग करत होता. त्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करून असंख्य कागदपत्रे गोळा करण्यात आली. प्रत्येक ठिकाणच्या टोलचे करार व मसुदे वेगळे, त्याचप्रमाणे टोलच्या माहितीत गोपनीयतेचा कोणताही भाग नसतानाही राज्यातील संपूर्ण टोल व्यवहाराची माहिती मिळविण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा करावा लागलेला वापर आदी गोष्टी लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यांच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला.
एमएसआरडीसीने काढलेल्या निविदेत २००२ ते २००५ या कालावधीसाठी आयआरबीला २२५ कोटी रुपयांना टोलचे काम देण्यात आले. माहितीच्या अधिकारात मनसेच्या हाती आलेल्या माहितीनुसार २४ डिसेंबर २००२ रोजी आयआरबीने आणखी तीन वर्षांसाठी टोल-वसुलीचे काम मिळावे व यासाठी २०२ कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली. ज्या दिवशी हे पत्र त्यांनी लिहिले, त्याच दिवशी त्यांना मान्यताही एसआरडीसीने देऊन टाकल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याचे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. खरे तर एवढय़ा मोठय़ा कामासाठी पुन्हा निविदा काढणे अपेक्षित होते. २००२ ते २००८ या कालावधीसाठी ४२५ कोटी रुपयांमध्ये मुंबईच्या पाचही टोलनाक्यांवरील वसुलीचे काम आयआरबीला मिळाले. त्यांना मिळालेल्या उत्पन्नाबाबत शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या आठ वर्षांत टोल-वसुलीतून ४३६ कोटी रुपये मिळाल्याचे दिसून येते. त्यानंतर टोल-वसुलीची २०३१ची अंतिम मुदत लक्षात घेऊन एसआरडीसीने काढलेली निविदा आयआरबी व एमईपी यांना २१०० कोटीत मिळाली असून २०२७ पर्यंत टोल-वसुलीला मान्यता देण्यात आली आहे. मनसेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार रस्ते बांधणी व देखभालीसाठी येणारा खर्च २०१० सालीच वसूल झाला असल्यामुळे मुंबईच्या सर्व टोलनाक्यांवरील टोल-वसुली रद्द करण्याची तसेच जादाचा वसूल झालेला टोल शासनाने वसूल करावा, अशी भूमिका राज ठाकरे मांडणार असल्याचे समजते.  

असा झाला ‘टोल’नामा
मुंबई, ठाणे, पुणे, रायगड जिल्ह्य़ातील सर्व टोलनाक्यांवरून येजा करणाऱ्या वाहनांची मोजणी करण्याचे आदेश राज यांनी कार्यकर्त्यांनी दिले. त्यानुसार १९ जून ते २ जुलैपर्यंत पंधरा दिवस मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवरील वाहनांची मोजणी केली. या साऱ्याचे विश्लेषण जवळपास पूर्ण झाले असून मुंबईसाठी टोल घेण्याची गरज तर नाहीच उलट जादाची झालेली टोलवसुली शासनाने संबंधित कंपनीकडून वसूल केली पाहिजे, असा निष्कर्ष निघाला

शुक्रवार, 15 जून 2012

टोलनाक्‍यांवरील वाहनांचा लेखाजोखा मनसे मांडणार

टोलनाक्‍यांवरील वाहनांचा लेखाजोखा मनसे मांडणार
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, June 16, 2012 AT 01:00 AM (IST)
मुंबई - रस्त्यांच्या खर्चाच्या नावाखाली आघाडी सरकार उद्याच्या काळात गल्लीतही टोलनाके उभारतील, असा आरोप करून राज्यातील टोलनाक्‍यांवर दिवसाला किती टोलवसुली होते, याचा लेखाजोखा मनसे ठेवणार असल्याची माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. त्याच वेळी या कार्यकर्त्यांच्या कामात संबंधित कंपनी अथवा सरकारने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात मी हंगामा करीन. हा हंगामा मग कोणालाही आवरता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

कृष्णकुंजवर आयोजित पत्रकार परिषदेत टोलनाक्‍यांच्या विरोधातील लढा हा टोलवसुलीत पारदर्शकता येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ठाण्यात टोलनाक्‍यांच्या विरोधात केलेल्या आवाहनानंतर राज्यात जागोजागी मनसैनिकांनी आंदोलन केले. मी टोलवसुलीच्या विरोधात नाही. कामे करण्यासाठी निधी लागतो, याची कल्पना मला आहे. पण, टोलनाक्‍यांच्या नावाखाली कमी वाहने दाखवून मंत्री आणि कंत्राटदार एकत्र येऊन जी नागरिकांची लूट करीत आहेत; त्याला आपला विरोध असल्याचे ते म्हणाले. ही गुन्हेगारी स्वरूपाची लूट उघडकीस आणण्यासाठी सोमवारपासून राज्यातील प्रत्येक टोलनाक्‍यावर 50 मनसैनिक उभे राहून वाहनांची संख्या मोजणार आहेत. तसेच, या वेळी फलक लावून वाहनचालकांना टोलच्या बदल्यात त्यांना किमान कोणत्या सुविधा देणे अपेक्षित आहे, याची माहिती दिली जाणार आहे. मनसेचे कार्यकर्ते कामात कोणताही अडथळा आणणार नाहीत. मात्र, या कार्यकर्त्यांना काही त्रास दिल्यास संपूर्ण राज्यात हंगामा करण्याचा इशारा राज यांनी दिला.

मंत्र्यांच्या आशीर्वादाने टोलवसुलीत पारदर्शकता राहिलेली नाही. कंत्राट भरताना गाड्यांचा आकडा कमी दाखविणे, कमी वाहनांच्या नावाखाली कंत्राट वाढवून देणे, कंत्राट संपल्यावरही वसुली सुरू ठेवणे, कायद्याने सुरक्षितता देणे आवश्‍यक असताना वाहनचालकांना वाऱ्यावर सोडणे, परतीचा प्रवास असल्यास प्रवासाचा टोल पन्नास टक्के घेणे बंधनकारक असताना पूर्ण पैसे घेणे आदी गोष्टी या टोलनाक्‍यांच्या कंत्राटामध्ये सर्रास सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

छगन भुजबळांची रोजीरोटी
मी टोलनाक्‍याच्या विरोधात बोलल्यावर छगन भुजबळ यांच्या रोजीरोटीवरच लाथ मारल्यासारखे ते चिडले आहेत. पण, मला समजाविण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. व्यवसाय कसा करायचा, याची मला माहिती आहे. तसेच, टोलनाका नाही, तर राज्य चालविण्यास आपण तयार असल्याचा टोला राज यांनी छगन भुजबळ यांना लगावला.

महाराष्ट्रात वाहनचालकांना फेफरे
गुजरातमध्ये डाव्या बाजूने चालणाऱ्या इतर राज्यांतील ट्रकचालकांना महाराष्ट्रात आल्यावर फेफरे भरते. येथील कायद्याचा धाक नसल्यानेच हे ट्रकचालक आडवेतिडवे गाड्या चालवत असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यासाठी "एनएच-4' या महामार्गाची आपण डीव्हीडी तयार केली आहे. या डीव्हीडीमध्ये कर्नाटकमधील महामार्गावरील वाहतूक आणि महाराष्ट्रातील वाहतुकीतील फरक कळत असल्याचे सांगून या डीव्हीडीचे वाटप त्यांनी केले

बुधवार, 13 जून 2012

औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला

औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 13, 2012 AT 02:22 PM (IST)

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 13) दुपारी दोन वाजता हर्सुल सावंगी येथील टोल नाक्‍याची तोडफोड केली.

या आंदोलनात नगरसेवक राजगौरव वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या टोल नाक्‍यावर रस्ता तयार करण्यासाठी किती निधी दिला? त्यातून टोल किती वसुल झाला? याच्या माहितीचा फलक न लावल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले

मंगलवार, 12 जून 2012

मनसेतील नासके आंबे पत्र पाठवून कळवा!

मनसेतील नासके आंबे पत्र पाठवून कळवा!
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 13, 2012 AT 03:00 AM (IST)
ठाणे -  नाशिकमध्ये मनसेचा महापौर झाला, पुण्यात विरोधी पक्षनेता आपला आहे; मग ठाण्यातच कोठे घोडे अडले? असा सणसणीत सवाल करत संघटनेतील नासके आंबे बाहेर काढावेच लागतील... मग ते कितीही मोठ्या पदावरचे असोत, असे सूतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 12) ठाण्यात केले. मी एका मर्यादेपर्यंत सहन करतो, असे स्पष्टपणे बजावून त्यांनी ठाण्यातील पक्षसंघटनेतील फेरबदलांना सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले.

निवडणुकीच्या काळात कोणी कोणी काय काय केले ते आपल्याला "राजगडा'वर पत्रे पाठवून कळवा, असे आवाहनही त्यांनी गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यात बोलताना केले. मेळाव्यात राज यांनी संघटनेतील फुटीर मंडळींची चांगलीच झाडाझडती घेतली.

ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेला मिळालेले अपयश अनपेक्षित होते, असे सुरुवातीलाच सांगत राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना फैलावर घेण्यास सुरुवात केली. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मनसेला पडलेली मते आणि महापालिका निवडणुकीत पडलेली मते यातील फरक लक्षात घ्या, असे परखडपणे सुनावतानाच "तुमचा जनसंपर्क का कमी पडला याचा एकदा शांतपणे विचार करा', असेही त्यांनी सुचविले. प्रश्‍नांना वाचा फोडल्याशिवाय लोकसंग्रह होत नाही, असे सांगून त्यांनी ठाण्यातील असंख्य प्रश्‍न हातात घ्या, असे आवाहनही उपस्थितांना केले. तुमच्यात जर जनतेचे प्रश्‍न सोडवण्याची संवेदनाच नसेल तर तुम्ही पुढे जाणार कसे? निवडणुका आल्या की उमेदवारी मात्र हवी. इतर वेळी गळ्यात गळे घालून फिरणार आणि निवडणुकीला तिकीट मिळाले नाही की एकमेकांना पाण्यात पाहण्यास सुरुवात करणार, असे सांगून त्यांनी ठाण्यात तुम्ही अशी काय क्रांती केलीत? असा प्रश्‍नही विचारला. एकीकडे मी पक्ष उभा करायचा, जनतेचा विश्‍वास संपादन करायचा आणि तुम्ही मात्र तो घालवायचा हे चालणार नाही, असेही त्यांनी सडेतोडपणे बजावले.

टोलनाके-क्वॉरीमालकांविरोधात आंदोलन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावरही राज ठाकरे यांनी जोरदार आसूड ओढले. ""सध्या राज्यात काय चालू आहे तेच कळत नाही. राज्यकर्ते लुटत आहेत आणि विरोधी पक्षांना त्यांनी खिशात घातले असल्याने तेही काही करीत नाहीत. पण आपल्या पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, हे लक्षात ठेवा,'' असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पिशव्यामुक्त करण्यापेक्षा टोलमुक्त करा, असे सांगून राज्यभर मनसे टोलमुक्तीसाठी आंदोलने करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दुसरीकडे सर्वत्र डोंगर पोखरणाऱ्या क्वॉरीमालकांविरोधात आंदोलनाने दणका देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या नावाखाली तिकडे स्वतःचा वेगळा टोल लावू नका, असा चिमटाही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना लगावला.

"राजगडा'वर थेट पत्रे पाठवा
महापालिका निवडणुकीत काय चुकले आणि काय करायला हवे होते, याचे सविस्तर पत्र आपल्याला थेट "राजगडा'वर पाठवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले आहे. आलेली पत्रे आपण स्वतः वाचणार असून ती हर्षल देशपांडे आणि केदार अंबाळकर यांच्याकडे लिफाफ्यातून द्या, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. महापालिका निवडणुकीत कोणी संघटनेचे काम केले नाही आणि कोणी प्रामाणिकपणे केले असेल तर तेही सांगण्याचा मोठेपणा तुमच्याकडे असला पाहिजे, असेही त्यांनी बजावले.

वाढदिवसाची होर्डिंग्ज बंद करा
राज ठाकरे यांनी मेळाव्यात वाढदिवसाची होर्डिंग्ज दिसली नाही पाहिजेत, असा इशारा आपल्या कार्यकर्त्यांना दिला. माझ्याही आणि तुमच्याही वाढदिवसाची होर्डिंग्ज बंद करा, असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले

शुक्रवार, 1 जून 2012

मग, वाघांसाठी 'बंद' का नाही? - राज

मग, वाघांसाठी 'बंद' का नाही? - राज
- सकाळ वृत्तसेवा
Friday, June 01, 2012 AT 01:45 AM (IST)
चंद्रपूर - पेट्रोलची भाववाढ झाल्याने संपूर्ण देशात बंद पुकारण्यात आला. मात्र, वाघाच्या इतक्‍या शिकारी होऊनही कुणी आवाज उठवीत नाहीत. वाघांसाठी बंद का नाही, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला.

ताडोबा अभयारण्यातील शिकार, पुनर्सवनाच्या मार्गावरील गावांना भेट दिल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. 31) राज ठाकरे यांनी महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर येथील हिराई विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, वाघाच्या शिकारीसंदर्भात जे वृत्तपत्रात वाचले, ते प्रत्यक्ष बघण्यासाठी इथे आलो. स्वयंसेवी संस्था, गावकरी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर परिस्थिती समजेल. शिकारीत गावकऱ्यांचा सहभाग असेल. त्यामुळे बाहेरचे शिकारी इथे तळ ठोकून बसतात. स्थानिकांनी शिकारी टोळ्यांना मदत करणे आता थांबविले पाहिजे, असे आवाहन केले.

विदेशातील शासन वन्यप्राण्यांच्या संरक्षणात अतिशय गंभीर आहेत. मात्र, देशातील शासनाची उदासीन भूमिका आहे. नेते केवळ भूखंड आणि पैसा हडप करण्याच्या मागे लागले आहेत. उद्या वाघांचे जंगल नष्ट करून वनजमिनी बळकावतील, अशी भीती राज यांनी व्यक्त केली. येथील कोळसा खाणी मानवासह वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. वन्यजीवांच्या रक्षणासाठी वनविभागाने स्वयंसेवी संस्थांना विश्‍वासात घेऊन काम करण्याची गरज आहे, असल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार बाळा नांदगावकर, आमदार नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, मनसेचे पूर्वविदर्भ संघटक हेमंत गडकरी, जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार उपस्थित होते.

प्रत्येक बाबतीत राजकारण करणे ठीक नाही. प्राण्यांवर प्रेम आणि आपुलकी आहे. म्हणूनच थंड हवेच्या ठिकाणी न जाता 47 अंश तापमान असलेल्या चंद्रपूरात आलोय, ते उगीच नव्हे.
- राज ठाकरे.

शुक्रवार, 4 मई 2012

मनसेचा कोणताही आमदार युरोप दौऱ्यात नाही

मनसेचा कोणताही आमदार युरोप दौऱ्यात नाही
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, May 05, 2012 AT 03:45 AM (IST)

मुंबई - युरोप दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही आमदार जाणार नाही, असे पक्षाचे विधिमंडळ व्हिप आमदार नितीन सरदेसाई यांनी आज स्पष्ट केले. विधिमंडळ प्रतोद म्हणून आपण विधान मंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना याआधीच तसे पत्र दिल्याचे ते म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने हा दौरा होणार आहे.

"सकाळ'मध्ये या संदर्भात "मनसेचाही आमदार युरोप दौऱ्यात' या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावर स्पष्टीकरण देताना सरदेसाई यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केले. ते म्हणाले, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी या दौऱ्यासाठी पक्षाचे आमदार नितीन भोसले यांचे नाव सुचविले होते; मात्र त्यानंतर कोणत्याही आमदाराला पाठविण्यात येणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.

सरदेसाई यांच्या वतीने महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना पाठविलेले पत्र या विभागाच्या लिपिकांनी स्वीकारल्याची तारीख 2 मे आहे. या पत्रात मे व जून 2012 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने युरोपीय देशाचा परदेश दौरा होणार आहे. या दौऱ्याकरिता मनसे पक्षाच्या सदस्याचे नाव कळविण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. परंतु या दौऱ्यासाठी मनसेकडून कोणताही सदस्य पाठविण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी "आधी केले, मग सांगितले" या भावनेने प्रथम आपल्या आमदारांना परदेश दौऱ्यावर न जाण्याचा आदेश दिला व नंतर इतरांना सल्ला दिला असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले

बुधवार, 2 मई 2012

परदेशी मंत्र्यांना जिल्हाबंदी करा- राज ठाकरे

परदेशी मंत्र्यांना जिल्हाबंदी करा- राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, May 02, 2012 AT 05:13 PM (IST)

मुंबई - रेल्वे परिक्षेबाबत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त भागात जाऊन मतदकार्य करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. दुष्काळग्रस्त भागात जाऊन चारा आणि पाणी पुरवितानाच प्राणीमित्र, संघटनांच्या मदतीने प्राण्याचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना रस्त्यावरच फोटा, अशा शब्दांत त्यांनी आपले प्राणीप्रेम दर्शविले. दुष्काळ पडल्यानंतर दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणाऱ्या परदेशी मंत्र्यांना जिल्हाबंदी करावी, ऐन मे मध्ये परदेशात जाऊन अभ्यास करणाऱ्या आमदारांना जिल्हाबंदी करावी, असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
मुंबई येथे घेण्यात आलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्रात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दहशत, जबर असलीच पाहिले, असेही ते म्हणाले. आगीमध्ये भस्मसात झालेल्या सहा हजार 800 क्षेत्राचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगल जळाले. मात्र, सरकारने काहीच केले नाही. अशाप्रकारचे कृत्य करणारी मोठी लॉबी सध्या महाराष्ट्रभर फिरते आहे. अशाप्रकारच्या आगी लावायच्या आणि ती जमीन काबीज करून पैसा कमवायचा, अशी या राज्यकर्त्यांची वृत्ती आहे. जनावरे मरताहेत, झाडे जळताहेत याचे त्यांना काही देणेघेणेच राहिलेले नाही. मात्र, हे सर्व होत असताना मनसेच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी काम काम केले, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. येत्या काही दिवसात मी पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम देणार असून त्यावर मी देखरेख ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मे महिना आली, की आमदारांचे अभ्यासदौरे सुरू होतात. मात्र, या अभ्यासदौऱ्यातून ते काय शिकून आले, हे एकदाही सरकार विचारत नाही. अशा आमदारांना जिल्हाबंदी केली पाहिजे, असे मार्गदर्शन करतानाच ठाकरे यांनी मनसेच्या एकाही आमदाराला अशाप्रकारच्या अभ्यासदौऱ्यांना पाठविले जाणार नाही, अस ठासून सांगितले.

दुष्काळग्रस्त भागात काम करायला जाताना, उद्देशन स्पष्ट ठेवला पाहिजे. त्या ठिकाणी भाषणबाजी, प्रचार आदी गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तेथील स्थानिक वृत्तपत्रांनाही त्याबाबतची माहिती मिळाली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले