शुक्रवार, 7 सितंबर 2012

‘महाराष्ट्र’की ‘मांडवली’धर्म ?

 ‘महाराष्ट्र’की ‘मांडवली’धर्म ?
राज ठाकरेंच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
खास प्रतिनिधी
मुंबई
आधी विरोध करून मग ‘सूरक्षेत्र’ या कार्यक्रमाला मान्यता देण्यात राज ठाकरे यांचा ‘महाराष्ट्र’ की  ‘मांडवली’ धर्म आहे, असा सवाल काँग्रेसने आज केला आहे. तर प्रक्षोभक भाषणाबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज ठाकरे यांनी टोल नाक्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. पण या आंदोलनाचे आता काय झाले, असा सवाल काँग्रेसने केला आहे. राज ठाकरे हे अचानक आक्रमक होतात आणि नंतर एकदम थंड कसे होतात याचे गुपित काय, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते संजय दत्त आणि जनार्दन चांदूरकर यांनी केला आहे. बिहार दिन, टोल आंदोलन यावरून राज ठाकरे हे कसे बदलतात हे सिद्ध झाल्याचेही काँग्रेसचे म्हणणे आहे. अन्य प्रांतीयांच्या विरोधात वक्तव्य करून समाजात फूट पाडणे किंवा बंदी हुकूम मोडून मोर्चा काढल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे. काँग्रेसने मनसेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच प्रांताच्या मुद्दय़ावर कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. काही जण केवळ व्होटबँकेसाठी जात आणि प्रांताचा वापर करतात, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला.







गुरुवार, 6 सितंबर 2012

मनसेचे 'सूरक्षेत्र' जुळले

मनसेचे 'सूरक्षेत्र' जुळले
Friday, September 07, 2012 AT 01:45 AM (IST)

मुंबई- पाकिस्तानी गायकांचा सहभाग असल्यावरून गेले काही दिवस "सूरक्षेत्र' या कार्यक्रमाला तीव्र विरोध करणाऱ्या मनसेने आज एक पाऊल मागे घेतले. "सहारा' आणि "कलर्स' या वाहिन्यांचे वरिष्ठ अधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटताच त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसारणास हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे आता ठरलेल्या दिवशीच आणि वेळेतच हा कार्यक्रम प्रसारित होईल.

याआधी कार्यक्रम करूनच दाखवा, मनसे "खळ्ळ खट्याक्‌' करेल, अशी गर्जना करणाऱ्या मनसेने अचानक आंदोलनाची तलवार म्यान केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यात शिवसेनेने मात्र आपला पाकिस्तानी कलाकारांविरोधातील पवित्रा कायम ठेवला आहे. शिवसैनिक आर्कुट आणि फेसबुकवरून आपला विरोध व्यक्त करणार आहेत.

पाकिस्तानी कलाकारांना येथे काम करू देणार नाही, अशा प्रकारची धमकी शिवसेना आणि मनसेच्या नेतृत्वाने दिली होती. असे असतानाही आज कित्येक पाकिस्तानी कलाकार व गायक इंडस्ट्रीत काम करीत आहेत. पाकिस्तानी गायकांचे एकापाठोपाठ एक अल्बम येथे येत आहेत. काही गाण्यांचे रेकॉर्डिंगही होत आहे. त्यातच आता "कलर्स' आणि "सहारा' या वाहिन्यांवर "सूरक्षेत्र' हा कार्यक्रम येणार असल्याचे आणि त्यात पाकिस्तानी गायक असल्याचे समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेने याला कडाडून विरोध केला होता. "कलर्स' व "सहारा' या दोन्ही वाहिन्यांना मनसेने धमकीचे पत्र दिले होते. या पत्रात अशा प्रकारचा शो आम्ही होऊ देणार नाही. तरीही तो प्रसारित झाल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असे म्हटले होते.

राज ठाकरे यांनी या शोचे चित्रीकरण दुबईत झाले असले तरी त्यांची कार्यालये येथे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सज्जड दम भरला होता. त्यामुळे "कलर्स' व "सहारा' या वाहिन्यांच्या कार्यालयांबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविला होता. मात्र आज सकाळी "सहारा'चे संचालक बोनी कपूर, "कलर्स'चे सीईओ राज नायक हे राज यांना भेटायला "कृष्णकुंज'वर गेले. त्यांच्यात या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर राज यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली.

यापुढे पाकिस्तानी कलाकारांना संधी नाही
भविष्यात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन आम्ही कोणताही कार्यक्रम करणार नाही, असे आश्‍वासन बोनी कपूर व राज नायक यांनी दिल्यानंतर प्रसारणाची परवानगी दिली. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, की पाकिस्तानी कलाकारांना यापुढे घेणार नाही, असे आश्‍वासन बोनी कपूर व राज नायक यांनी आम्हाला दिले. त्यामुळेच ही परवानगी दिली. तशी खबरदारी बोनी हे घेतील, असे त्यांनी आम्हाला कळविले आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल, असे म्हणणे बोनी कपूर यांनी राज यांच्यासमोर मांडले.

शिवसेनेची फेसबुकगिरी
शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध आहे आणि तो कायम राहील, असे भारतीय चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, की आम्ही अजिबात शेपूट घालणार नाही. देशबांधवांच्या भावनांची आम्ही आदर करतो. पाकिस्तानी कलाकारांना येथे पाय ठेवू देणार नाही. हा सगळा खेळ टीआरपीसाठी चाललेला आहे. त्यामुळे आम्ही आर्कुट व फेसबुकवर कम्युनिटी तयार करणार आहोत. सगळ्यांना हा कार्यक्रम पाहू नका आणि टीआरपी वाढवू नका, असे आवाहन करणार आहोत.

सचिनबाबतची भूमिकाही स्पष्ट करावी- आशा भोसले
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना "अतिथी देवो भव की पैसे देव भव!' असे सुनावणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "कलर्स' व "सहारा' या वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका भेटीतच "मिले सूर मेरा तुम्हारा' असे सूर जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. राज यांच्या आरोपाला आशाताई यांनी "लोगों का काम है कहना' असा टोला लगावला. आशाताईंवर आरोप करणाऱ्या राज यांनी लगेच आपली भूमिका का बदलावी, असा प्रश्‍न विचारला जात आहे. राज यांच्या टीकेला आशाताईंनी आजवर उत्तर दिले नव्हते.

गुरुवारी त्यांना विचारले असता एका वाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, ""कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना...'' या गाण्याच्या ओळी सुरेल आवाजात गाऊन प्रत्युत्तर दिले. त्या पुढे म्हणाल्या, ""आपण पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करू नये, असा सल्ला देणाऱ्या राज यांनी सचिन तेंडुलकर पाकिस्तानी खेळाडूंसोबत खेळल्यास मनसेची भूमिका काय असेल, तेही स्पष्ट करावे.'' पाकिस्तानी कलाकारांना घेतल्याबद्दल वाहिन्यांना धमकाविणाऱ्या राज ठाकरे यांनी वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुरात सूर मिसळावा याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले आहे. या भेटीत चर्चा झाली की "अर्थ'पूर्ण सेटलमेंट झाली, अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे







'सूरक्षेत्र' कार्यक्रमाला राज ठाकरेंची परवानगी

'सूरक्षेत्र' कार्यक्रमाला राज ठाकरेंची परवानगी
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 06, 2012 AT 12:59 PM (IST)

मुंबई - पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या कलर्स वाहिनीवरील 'सूरक्षेत्र' या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) परवानगी दिली.

पाक कलाकरांचा समावेश असल्याने राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. त्यामुळे आज सकाळी कार्यक्रमाचे दिग्दर्शक बोनी कपूर आणि कलर्स वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले. मात्र, येथून पुढे असे कार्यक्रम झाल्यास त्याला मनसेचा विरोध असेल. यापुढे पाक कलाकारांच्या सहभागावर आमचा कायम आक्षेप असणार आहे, असे ते म्हणाले.

सुरक्षेत्र हा कार्यक्रम कलर्स आणि सहारा वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. यापुढे पाक कलाकारांना घेऊन असे कार्यक्रम करणार नसल्याचे वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावरही टीका केली होती






रविवार, 2 सितंबर 2012

पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट - राज ठाकरे

पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Monday, September 03, 2012 AT 03:00 AM (IST)


मुंबई- "पाकिस्तान म्हणजे कुत्र्याची शेपटी आहे. कितीही वेळा नळीत घातली तरी ती सरळ होणार नाही,' असा हल्लाबोल करत "पाकिस्तान विरोधी भूमिका म्हणजे हिंदू-मुस्लिम वाद नाही,' असा खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवारी) केला.

राज म्हणाले, "भारतातील दहशतवादी कारवाया रोखण्यास पाकिस्तान पुढाकार घेत नाही. मात्र, त्यांच्या कलाकारांना पैसे कमविण्याची एकमेव जागा भारत आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना रोखत नाही, तोपर्यंत पाकिस्तानवर दबाव येणार नाही; पण पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचे शेपूट आहे. ते सरळ होणार नाही.''

"पाकिस्तानविरोधी भूमिका म्हणजे हिंदू-मुस्लिम वाद नाही. हा भारत विरुद्ध पाकिस्तान आणि बांगलादेश संदर्भातील वाद आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत तीन "सुपरस्टार' खान आहेत. धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन भारतीय या तिघांवर प्रेम करतात. शिवाय, कोणत्याही जाती-धर्माच्या घरगुती, सार्वजनिक कार्यक्रमात बिस्मिल्ला खान यांच्या सनईचे सूर ऐकू येतात. त्यामुळे, माझी भूमिका मुस्लिमविरोधी आहे, असा गैरअर्थ काढून राजकारण करू नये,' असा टोला राज यांनी लगावला.

बिहारी नेते आणि माध्यमांना राज यांचा इशारा
"राज ठाकरेंवर देशद्रोही खटला भरा,' अशी मागणी करणाऱ्या बिहारी नेते आणि हिंदी माध्यमांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. "महाराष्ट्रात गुन्हे करणारे बिहारमध्येच कसा पळ काढतात. "अमर जवान स्मारका'ची मोडतोड करणाऱ्या युवकाला बिहारमध्येच कसा आश्रय मिळतो,' असा सवाल राज यांनी केला. ते म्हणाले, ""आम्ही बोललो की त्यावर हिंदी चॅनेल्स आणि बिहारी नेते राष्ट्रीयत्त्वाच्या गप्पा मारत आमच्यावर टीकेची झोड उठवतात. "राज ठाकरे देशद्रोही आहेत', अशी गरळ ओकत देशाचे राजकारण तापवतात. स्वत:च्या वाहिनीचा "टीआरपी' वाढावा, म्हणून त्यावर चर्चा घडवून आणतात.'' यापुढे अशा प्रकारची टीका थांबवा. मी मराठीत काय बोलतो ते समजून घ्या. त्यामागची भूमिका जाणून घ्या, माझा पारा चढवू नका. नाहीतर महाराष्ट्रातल्या सर्व हिंदी चॅनेलवाल्यांचा खेळ थांबेल.''

राज म्हणाले...
- राज्याचे पोलिस आयुक्‍त बिहारचे पत्र आल्याचे सांगत असताना गृहमंत्री आर. आर. पाटील मात्र पत्र आले नाही, असे जाहीर करतात. गृहविभागात काय सुरू आहे, हे आबांना कळतच नाही. त्यांना कोणी सांगतही नाही.
- आमच्या कुटुंबांचे मूळ बिहारमध्ये असेल तर दिग्विजयसिंह यांचा जन्म काय सुलभ शौचालयात झाला काय? वाट्‌टेल तसे बोलणारे दिग्विजय म्हणजे कॉंग्रेसने शिव्या खाण्यासाठी पाळलेलं कार्टं आहे.
- "रोखठोक बोलणे ही आशाताईंची ओळख आहे. त्यांना राजकारण कळत नसेल; पण देशात काय सुरू आहे, हे त्यांना कळत नाही काय?



राज्यातील आरोपी बिहारमध्येच का जातात?- राज

राज्यातील आरोपी बिहारमध्येच का जातात?- राज
- वृत्तसंस्था
Sunday, September 02, 2012 AT 01:41 PM (IST)

मुंबई - महाराष्ट्रात कोणताही गुन्हा घडल्यास पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्येच का जावे लागते? राज्यात घडणारे सर्वाधिक गुन्हे परप्रांतियांकडूनच घडत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) केले.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, ''अमर जवान स्मारकाची मोडतोड करणारा आरोपी बिहारलाच का गेला? महाराष्ट्रातील सर्व गुन्हे कोणी केले आहेत आणि ते कोठे जातात हे तपासा. या राज्यातील लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात येत आहेत. येथून येणाऱ्या नागरिकांची कोणतीही नोंद नाही. केरळ पोलिस परप्रांतियांची नोंदणी करून घेते, मग महाराष्ट्रातील पोलिस का करत नाही. पोलिस खात्यात काय सुरु आहे, याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांना नसते. त्यांना हे खाते समजत नाही आणि ते त्यांना कळतही नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

आशाताईंच्या विषयात मी काय चुकीचे बोललो, असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, की बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या कलाकारांना आपण का प्रोत्साहन देत आहोत? आपल्या देशात येऊन ते पैसे कमावितात. इतर वेळी रोखठोक भूमिका मांडणाऱ्या आशाताईंनी या मुद्द्यावर का रोखठोक भूमिका मांडली नाही. इकडे माणसे मारली जात आहेत आणि आपण मैत्रीचा हात पुढे करत आहोत. मी जातीचा मुद्दा उपस्थित करत नसून, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हा माझा मुद्दा आहे.

दिग्विजय सिंह यांच्या विषयी सडेतोड वक्तव्य करताना राज म्हणाले, ''काँग्रेस पक्षाने शिव्या खाण्यासाठी ठेवलेले व्यक्ती आहेत. तसेच ते काँग्रेसचे बुजगावणे देखील आहे. ठाकरे कुटुंबिय मुळचे बिहारचे आहे, असे म्हणणारे दिग्विजय यांचे कुटुंब सुलभ शौचालयातील आहे का? बिहारमधून आम्ही मध्य प्रदेशातील धार गावी आलो, असे म्हणणारे दिग्विजय यांची सवय धाड टाकण्याची आहे.

गुरुवारी बिहारी नागरिकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातील हिंदी चॅनेल्सचे पत्रकार आणि नेते कसे एकत्र येतात, हे यामुळे स्पष्ट झाल्याचे राज यांनी सांगितले. याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील नेते एकत्र का येत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज म्हणाले, की माझे म्हणणे समजून न घेता सर्व वृत्तवाहिन्यांवर चर्चा सुरु झाली. हिंदी चॅनेल्सवाल्यांनी आपला खेळ थांबवावा, नाहीतर मी तुमचा खेळ थांबवील. तुम्हाला मराठी समजत नसेल तर महाराष्ट्रातील पत्रकारांकडून समजावून घ्या. पण, चुकीचा अर्थ काढून चर्चा करू नका



शनिवार, 1 सितंबर 2012

...तर बिहारींना हाकलून लावू : राज

...तर बिहारींना हाकलून लावू : राज
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, September 01, 2012 AT 03:30 AM (IST)


मुंबई - महाराष्ट्रातील दंगल, खून, अपहरणाच्या गुन्ह्यातील गुन्हेगार बिहार आदी परराज्यांत सापडत असूनही विनापरवाना या गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्यास महाराष्ट्रातील पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्याचा समाचार घेत बिहारने अशी कारवाई केल्यास महाराष्ट्रातील "बिहारीं'ना घुसखोर ठरवून हाकलून लावू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. बिहारचे मुख्य सचिव देशात फुटीरतेची बीजे रोवत असताना दिल्लीसह राज्यातील नेते गप्प का, असा सवालही राज यांनी केला.

मनसेची सभासद नोंदणी 5 सप्टेंबरला सुरू होत असल्याच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. आशा भोसले यांना देशहितापेक्षा पैसा मोठा झाल्याची टीका त्यांनी केली.

बिहारचे मुख्य सचिव नवीन कुमार यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून, बिहारमधील गुन्हेगारांना अटक करताना त्या सरकारची परवानगी न घेतल्यास संबंधित पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. एकाच देशात राहताना बिहारचे मुख्य सचिव फुटीची बीजे पेरत असताना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय नेते गप्प का, अशी विचारणा त्यांनी केली.

महाराष्ट्रातील बहुतांश गुन्ह्यांत परराज्यातील गुन्हेगारांचा व बांगलादेशींचा हात असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांवर कारवाईचा प्रयत्न झाल्यास येथील बिहारींना घुसखोर ठरवून त्यांना हाकलून लावू, असा इशारा देत, मला एकसंधतेच्या उपदेशाचे डोस पाजणारे विचारवंत आणि नितीशकुमार आता कुठे गेले, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. परप्रांतीयांच्या माध्यमातून घडविलेली मुंबईतील दंगल म्हणजे केवळ "झलक' असल्याचा आरोप राज यांनी केला. खंबीर नेतृत्व नसल्यानेच ही वेळ आली असून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

कलर वाहिनीवर सुरू होणाऱ्या "सूरक्षेत्र' कार्यक्रमातील पाकिस्तानी गायकांविषयी आशा भोसले यांनी "अतिथी देवो भव' म्हटल्याबद्दल त्यांच्यावर राज यांनी सडकून टीका केली. आशाताईंना अतिथी नव्हे, तर "पैसा देवो भव' झाल्याची टीका त्यांनी केली.

राष्ट्रीय नेता व्हायचे नाही माझ्या पक्षासाठी महाराष्ट्र हीच सीमा आहे. आझाद मैदानातील मनसेच्या मोर्चानंतर मनसे राष्ट्रीय स्तरावर पोचल्याची मते मांडली गेली. पण आपण महाराष्ट्राबाहेर जाण्यात उत्सुक नसून, आपणास राष्ट्रीय नेता व्हायचे नाही. राज्यातून दिल्लीत जाऊन राष्ट्रीय नेते झालेल्यांचे हाल आपण पाहिले आहेत, असे ते म्हणाले.



शुक्रवार, 31 अगस्त 2012

"सूरक्षेत्र' विरोधात मनसेचा "खळ्ळ खट्ट्याक'चा इशारा

"सूरक्षेत्र' विरोधात मनसेचा "खळ्ळ खट्ट्याक'चा इशारा
-
Friday, August 31, 2012 AT 02:00 AM (IST)

मुंबई- खासगी वाहिनीवरील "सूरक्षेत्र' या संगीत कार्यक्रमात पाकिस्तानी गायकांचा समावेश केल्यावरून मनसेने "खळ्ळ खट्ट्याक' स्टाइल आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या 8 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या या कार्यक्रमाविषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.
याआधी शिवसेनेने "सूरक्षेत्र' विरोधात आवाज उठविला होता, मात्र शिवसेनेचा विरोध मावळला आणि संतप्त मनसेने हा कार्यक्रम थांबविण्याचा इशारा वाहिनी व्यवस्थापनाला दिला. 

"सहारा वन' या हिंदी वाहिनीवर हा कार्यक्रम होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वाहिनीने "सूरक्षेत्र'ची जोरदार जाहिरात केली होती. याला शिवसेनेने विरोध दर्शविला होता. चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजित पानसे यांनी हा कार्यक्रम रोखण्याचा इशारा दिला होता. दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीने भारतावर हल्ले करतात. बॉंबस्फोट घडवून आणतात. अशा परिस्थितीत असे कार्यक्रम करून देणे, हे शिवसेनेच्या नीतीत बसत नाही, असे स्पष्ट करीत विरोधाचे हत्यार उपसले होते; परंतु त्यानंतरही "सहारा वन'ने कलर वाहिनीसाठी या कार्यक्रमाचे दुबईत चित्रीकरण केले. यात आठ पाकिस्तानी आणि आठ भारतीय गायकांचा सहभाग आहे. भारतीय गायकांचा कर्णधार हिमेश रेशमिया आणि पाकिस्तानी गायकांचा कर्णधार आतिफ अस्लम आहे.
मात्र, कार्यक्रम प्रसारणाची तारीख जवळ आली तरी शिवसेनेच्या आंदोलनाचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली.

आशा भोसलेंनाही निवेदन


भारतीय कलाकारांना पाकिस्तानात सन्मान दिला जात नाही. मात्र, तेथील कलाकारांना येथे लाल गालिचा का अंथरायचा, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. दहशतवादास खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशातील गायकांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अशा आशयाचे निवेदन ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना दिल्याचे खोपकर यांनी सांगितले.