गुरुवार, 21 मार्च 2013

आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक

आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक

-
Thursday, March 21, 2013 AT 11:20 AM (IST)

मुंबई - विधिमंडळात एसीपी सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेले आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर हे दोघेही आज (गुरुवार) पोलिसांसमोर शरण आले. मुंबई क्राईम ब्रॅंचसमोर हे दोघेही आज हजर झाले. या दोघांनाही थोड्यावेळात न्यायालयामध्ये हजर केले जाईल.

पोलिस निरीक्षकाला विधानभवनात मारहाण करणाऱ्या पाच आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत निलंबित करण्याचा निर्णय आज विधानसभेत घेण्यात आला. यामध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम, शिवसेना आमदार राजन साळवी, भाजप आमदार जयकुमार रावळ आणि अपक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांचा समावेश आहे.

या पाचही आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाच्या आवारातदेखील येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनाची कारवाई करू नये यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी सरकारवर दबाव आणला होता. मात्र, या दबावाला झुगारून सरकारने विधानसभेत आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करत निलंबनावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

या आमदारांनी पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मंगळवारी (ता. 19) विधानभवनात मारहाण केली होती. या निंदनीय प्रकाराचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातल्या जनतेची जाहीर माफी मागत या प्रकाराचा खेद व्यक्‍त केला. या आमदारांवर मारहाणीबाबत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांचे निलंबन करू नये, असा दबाव सर्वपक्षीय आमदारांनी सरकारवर टाकला होता. मात्र, सरकारने हा दबाव झुगारला आणि विधानसभेत विधिमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला.

काल दुपारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला.

रविवार, 10 मार्च 2013

सकाळी भाषण संध्याकाळी "सेटिंग'- राज ठाकरे

सकाळी भाषण संध्याकाळी "सेटिंग'- राज ठाकरे

-
Monday, March 11, 2013 AT 04:30 AM (IST)
मुंबई- विधिमंडळ काळात सकाळी जोरदार भाषण करून सायंकाळी "सेटिंग' करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांची पद्धत नसल्याचा जोरदार टोला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विरोधी पक्षनेत्यांना लगावला. त्याच वेळी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसेचे आमदार विरोधक म्हणून आक्रमक भूमिका निभावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज'वरील पत्रकार परिषदेत भाजप, शिवसेना, रिपाइंच्या वतीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते उपस्थित नसल्याच्या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. एकनाथ खडसे यांनी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत आतापर्यंत सरकारच्या विरोधातील जलसंपदा, गृहनिर्माण आदी भ्रष्टाचार आपणच मोठ्या प्रमाणात बाहेर काढले असून, विरोधकांमध्ये कोण सत्ताधाऱ्यांना जाब विचारतो, हे आता लोकांना कळणार असल्याचा टोला मनसेला लगाविला होता. त्याबाबत राज यांना विचारणा केली असता सकाळी जोरदार भाषण करून सायंकाळी "सेटिंग' करण्याची मनसेमध्ये पद्धत नसल्याचा भीमटोला खडसेंना लगाविला.
...
रतन टाटा यांचा आशीर्वाद
उद्योगपती रतन टाटा यांनी घरी येऊन घेतलेल्या भेटीकडे आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहत नसून त्यांच्याकडून मला मिळालेला आशीर्वाद म्हणूनच मी त्याकडे पाहत आहे. वाघांची शिकार थांबविण्यासाठी अशा अभयारण्याच्या ठिकाणी टाटा ग्रुपने हॉटेल्स काढल्यास वाघ मारण्याऐवजी वाघ दाखविणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल, अशी सूचना आपण टाटा यांना केली असल्याचे राज यांनी सांगितले.
...
दुष्काळाचे कारण
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात नेमलेल्या नेत्यांमुळेच राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असल्याची टीका राज यांनी केली. या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळेच दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने विकासकामेच करण्यात आली नसल्याची टीका त्यांनी केली.
...
मनसे होणार आक्रमक
मनसेच्या सर्व आमदारांची आज सकाळी 10पासूनच "कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती, असे समजते. या बैठकीत सत्ताधाऱ्यांना दुष्काळ, जलसंपदा आदी विषयांवरून सळो की पळो करून सोडण्याचा आदेश आमदारांना दिल्याचे कळते. राज्यात विरोधक म्हणून "मनसे'च्या आमदारांची वेगळी ओळख लोकांपर्यंत गेली पाहिजे, अशा पद्धतीने सरकारला धारेवर धरण्यास या आमदारांना सांगण्यात आले आहे

रविवार, 3 मार्च 2013

राज ठाकरेंना "पुणे बंदी' नाही

राज ठाकरेंना "पुणे बंदी' नाही
 

-
Monday, March 04, 2013 AT 04:00 AM (IST)
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात येऊ न देण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा व खासदार वंदना चव्हाण यांनी रविवारी जाहीर केले. "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ठाकरे येत्या गुरुवारी (ता. 7) पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी एक दिवसाच्या मुक्कामासाठी येणार आहेत. राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी, "राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन दाखवावे,' असे आव्हान दिले होते. त्यास ठाकरे यांनी जालना येथील सभेत, "पुण्यात येतो, अडवून दाखवा,' असे प्रतिआव्हान दिले. या पार्श्‍वभूमीवर, पुणेकरांना कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने याबाबतचा निर्णय मागे घेतल्याने तणाव निवळण्यास मदत होणार आहे.

चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, "राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन व बेभानपणे केलेल्या टीकेमुळे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी, "राज ठाकरे यांना पुण्यात येऊ देणार नाही,' अशी भूमिका जाहीर केली होती. मात्र, पवारसाहेब व पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. पक्षाचे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ठाकरे यांच्या या भडकावू वृत्तीला अत्यंत संयमाने सामोरे जातील. प्रत्येक नागरिकाला भारतात कोठेही जाण्याचा व विचार व्यक्त करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्याचा आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदर करतील,' असे नमूद केले आहे.
काही मंडळी गेल्या काही दिवसांपासून जनतेच्या मनात विष पेरण्याचे काम करीत आहेत. 21 व्या शतकात युवकांना योग्य दिशा दाखविण्याऐवजी घरात घुसून तोडफोड करून रक्तपात करा, अशी प्रक्षोभक भाषा करीत आहेत. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. या झुंडशाहीचा आम्ही निषेध करतो, असेही चव्हाण यांनी सांगितले.
...
राजकीय पोळी भाजणार नाही
"राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याची आमची प्रवृत्ती नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडविण्याचे प्रयत्न काही जण जाणीवपूर्वक करीत आहेत. त्याला बळी न पडता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या विधायक कामासाठी आपली ताकद लावतील,' असे चव्हाण यांनी नमूद केले.

शुक्रवार, 15 फ़रवरी 2013

राज ठाकरे : खेड




कोकणवासीयांनो, जमिनी विकू नका

कोकणवासीयांनो, जमिनी विकू नका!

-
Saturday, February 16, 2013 AT 03:00 AM (IST)

खेड - 'कोकणवासीयांनी जमिनी विकू नयेत. तसे झाल्यास तुमचे अस्तित्वच संपेल. कोकणातील जमिनी स्थानिक नेते, परप्रांतीय, प्रतिष्ठितांनी खरेदी केल्या आहेत किंवा जोरजबरदस्तीने बळकावल्या आहेत. केंद्र सरकारची फेलोशिप मिळालेल्या एका पत्रकाराने लिहिलेल्या अहवालात मालवणमधील माणूस दबावाखाली असल्याचे म्हटले आहे. हा दबाव नारायण राणेंचाच आहे. तो तसा नसेल, तर त्यांनी याचा खुलासा करावा,'' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे झालेल्या विराट सभेत दिले.

ठाकरे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातून राज्याच्या दौऱ्याला सुरवात केली. कोकणातील पहिलीच जाहीर सभा त्यांनी आज खेडमध्ये घेतली. त्याचा संदर्भ देताना ते म्हणाले, ""कोकणातील जमिनी विकल्या जात आहेत, हे गंभीर आहे. भीती घालून कोकणात प्रकल्प आणले जात आहेत. गोपीनाथ मुंडेंनी कोकणातील एन्‍रॉन प्रकल्प समुद्रात बुडविणार असल्याचे सांगितले. नंतर तो तरंगायला कसा लागला? सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा, रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन म्हणून जाहीर झाला. त्यातील कोणतेच प्रकल्प येथे दिसत नाहीत. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी धरण बांधले जात आहे. त्यासाठी सुरुंग लावले जात आहेत. त्याचा परिणाम रायगड किल्ल्यावर होत आहे.''

मुंबई, नाशिक, पुण्याप्रमाणेच कोकणातही परप्रांतीय घुसल्याचे दाखले त्यांनी दिले. खेडमध्ये अनेक बांगलादेशीयांना झालेल्या शिक्षेचे उदाहरणही त्यांनी दिले.

नक्कल करायला अक्कल लागते नक्‍कल करून राज्य चालत नाही, असा टोला हाणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ""नक्‍कल करायलादेखील अक्‍कल लागले. फक्‍त माझ्या हातात एकदा महाराष्ट्र द्या, मग बघा कसा चालवतो आणि हाकतो.''

'जैतापूर'ला विरोध की समर्थन? कोकणातील अनेक प्रकल्पांबरोबरच जैतापूर प्रकल्पही आणण्यात आला. इतर प्रकल्पांना विरोध करताना जैतापूर प्रकल्पाबाबत त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला. ते म्हणाले, ""अणुऊर्जा प्रकल्पामुळे काय होणार आहे? त्सुनामी आली तर ती कोकणात येईल असे नाही. त्सुनामी सांगून येत नाही. जगात शेकडोंनी प्रकल्प आहेत. तारापूरला आहे, मुंबईत मध्यवस्तीत चेंबूर भागात; तर भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर 1960 पासून सुरू आहे. तेथील लोकसंख्या पावणेदोन कोटी एवढी आहे. भूकंप झाला तर एकावेळी किती लोक मरतील, हे सांगणे कठीण आहे; परंतु ते सेंटर अजूनही सुरू आहे.''

परशुराम उपरकर "मनसे'त दाखल खेडमधील या सभेत शिवसेनेचे सिंधुदुर्गचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. राज ठाकरे यांनी उपरकर यांच्या हातात पक्षांचा झेंडा दिला. तो झेंडा उपरकरांनी उंच फडकावून पक्षात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. उपरकर यांच्याबरोबरच सिंधुदुर्गातील अनेक शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला

मंगलवार, 12 फ़रवरी 2013

टाळी देण्यात स्वारस्य नाही - राज ठाकरे

टाळी देण्यात स्वारस्य नाही - राज ठाकरे

- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 12, 2013 AT 08:09 PM (IST)
कोल्हापूर -  मला टाळी देण्यात कोणतेही स्वारस्य नाही. जे काही करेन ते स्वबळावरच. राज्यात संपूर्ण सत्ता द्या, महाराष्ट्राचे नवनिर्माण करून दाखवितो, असा विश्‍वास आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे झालेल्या सभेमध्ये दिला. राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आज कोल्हापुरातून दणक्‍यात प्रारंभ झाला.

आपल्या एक तासाच्या भाषणात राज यांनी सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली; तसेच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या टाळीला सध्यातरी प्रत्युत्तर देणार नसल्याचे त्यांचा नामोल्लेख न करता सांगितले. या विषयावर वर्तमानपत्रांतून चर्चा सुरू आहे ते पाहता आपली "एकला चलो रे'चीच भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महालक्ष्मी मंदिर विकासासाठी राज्य शासनाने एक हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणीही राज यांनी या वेळी केली.

तरुणाईने तुडुंब भरलेल्या ऐतिहासिक गांधी मैदानात राज ठाकरे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिली सभा गाजवली. राज ठाकरे म्हणाले, ""राज ठाकरेला मिळाली की मराठी मते फुटतात अशी ओरड होते. ते अत्यंत चुकीचे आहे. ही कुठली पद्धत. कोल्हापूर महापालिकेत कोणाची सत्ता आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची. कोल्हापुरात सर्वांत जास्ती लोक कोण राहतात. त्यांना मतदान कानड्यांनी केले काय? तुमच्यासमोर गैरसमज पसरवून तुम्हाला फसविले जात आहे.'' अल्पसंख्याक भाषक टक्का असेल त्या भाषेत परीक्षा देण्याची मुभा दिली आहे. मराठीबरोबर हिंदी, उर्दूमध्येही परीक्षा देण्याची तयारी सुरू आहे. येथून पुढे त्यांचा टक्का वाढून त्यांना नोकऱ्या मिळणार, याला मनसेचा विरोध असल्याचे राज ठाकरे यांनी बजावले.

टोलनाक्‍यांविरोधातील आंदोलनाला आपल्याला यश मिळाल्याचे सांगून त्यांनी कर्नाटकातील रस्त्यांचे उदाहरण दिले. स्मारकांचे विषय समोर ठेवून मराठी जनतेला भुलविले जात आहे. महाराजांचे समुद्रात स्मारक बांधण्याऐवजी किल्ल्यांची डागडुजी केल्यास शिवछत्रपतींचा इतिहास जगासमोर मांडता येईल, असा मुद्दा राज यांनी मांडला.

आबांची हजेरी
मनसेची शाखाबांधणी करण्यास निघालेल्या कार्यकर्त्यांना आर. आर. पाटील यांचे कार्यकर्ते धमक्‍या देतात. त्यांना काम करू देत नाहीत. इतकेच नव्हे; तर त्यांच्या आई-वडिलांनाही धमक्‍या देतात. हा प्रकार मी यापुढे सहन करणार नाही. यापुढे असे झाल्यास केवळ आर. आर. पाटील यांनाच नाही; तर त्यांच्या घरच्यानांही धमक्‍या देण्यास माझे कार्यकर्ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला