गुरुवार, 9 जुलाई 2009

५० नको, तर १०० टक्के आरक्षण हवे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई - रेल्वे भरतीमध्ये भूमिपुत्रांना १०० टक्के आरक्षण असले पाहिजे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली; तर रेल्वेच्या नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के वाटा मिळाला पाहिजे, अशी आपली मागणी कायम असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
रेल्वे भरतीमध्ये भूमिपुत्रांना ५० टक्के प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज लोकसभेत मांडली. रेल्वेमंत्र्यांच्या भूमिकेवर "सकाळ'शी बोलताना राज ठाकरे म्हणाले, की ५० टक्‍क्‍यांचा काय संबंध? ५० टक्के नाही; तर १०० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत. ५० टक्के भूमिपुत्रांना रेल्वे भरतीत सामावून घेतल्यास उर्वरित ५० टक्के उत्तर भारत, बिहारमधून महाराष्ट्रात येतील, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच ज्या राज्यात रेल्वे भरतीच्या परीक्षा झाल्या आहेत, त्या परीक्षांचे पेपर त्याच राज्यात तपासले गेले पाहिजेत, असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.
शिवसेना म्हणते ८० टक्के -
रेल्वे भरतीत भूमिपुत्रांना ८० टक्के वाटा मिळाला पाहिजे ही शिवसेनेची मागणी कायम आहे. राज्य सरकारचा तसा कायदा आहे. केंद्र सरकारनेही तसा कायदा करावा आणि प्रत्येक राज्यातील भूमिपुत्रांना रेल्वेत ८० टक्के आरक्षण द्यावे, असेही खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी या आज रेल्वेमंत्री झाल्या असल्या तरीही त्यांनीही पश्‍चिम बंगालमध्ये भूमिपुत्रांसाठी लढा दिला आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचा लढा काय असतो, हे त्यांना चांगले माहीत आहे, असा टोलाही खासदार राऊत यांनी मारला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश आदी प्रत्येक राज्यात भूमिपुत्रांच्या आरक्षणाचा कायदा करावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.


सकाळ वृत्तसेवा
Friday, July 10th, 2009 AT 10:07 AM

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें