सोमवार, 21 जून 2010

राज यांना पाहण्याची अपेक्षा पूर्ण, ऐकण्याची अधुरीच..

राज यांना पाहण्याची अपेक्षा पूर्ण, ऐकण्याची अधुरीच....
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 22, 2010 AT 12:30 AM (IST)
 

भीमाशंकर वाघमारे : सकाळ वृत्तसेवाउस्मानाबाद - त्यांची प्रतीक्षा सर्वांनाच होती... अगदी सकाळपासून अणदूरपासून ते उमरग्यापर्यंत मार्गावर असलेल्या गावांतील कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा केलेली गर्दी... मोठाले डिजिटल फलकही तोऱ्यात होते... उमरगा न्यायालयाचा आवार तर फुटून निघाला होता... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भाव होते, त्यांना एकदा पाहण्याचे.. काहींना त्यांना ऐकण्याचे.. पाहण्याची अपेक्षा पूर्ण झाली ऐकण्याची मात्र "अधुरी'च राहिली. केवळ "आजि म्या राज पाहिला...' एवढे एकच समाधान चेहऱ्यावर झळकवत कार्यकर्त्यांना परतावे लागले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारपासून (ता. 21) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. उमरगा येथील न्यायालयात हजेरी लावून सुरू झालेला त्यांचा दौरा मंगळवारी (ता. 22) कळंबच्या न्यायालयात हजेरी लावून संपणार आहे. राज ठाकरे येणार म्हटल्यावर "मनसे'च्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारणे स्वाभाविक आहे. यावेळी मात्र सामान्य तरुणही राज ठाकरे यांना पाहण्यासाठी न्यायालयाच्या आवारात आला होता, हे विशेष. राज यांची सध्या असलेली "क्रेझ' पाहता त्यांच्या एखाद्या सभेचा कार्यक्रम आयोजित होऊ शकला असता; मात्र तो का झाला नाही, हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाच माहीत.

सकाळी अकराच्या सुमारास राज ठाकरे यांचे न्यायालयाच्या आवारात आगमन झाल्यापासून त्यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी गर्दी झाली. एक तासानंतर ते बाहेर आले. कार्यकर्त्यांची गर्दी पाहून राज ठाकरेही खूष झाले. गर्दी पाहून त्यांना कार्यकर्त्यांना पाच मिनिटे अभिवादन केले नि निघून गेले. जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा जयघोषही केला. त्यांना ऐकण्याची इच्छा मात्र अधुरीच राहून गेली. "बाईट' न दिल्याने इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचाही हिरमोड झाला.

पोलिसांचा ढिसाळपणान्यायालयाच्या आवारात पोलिसांनी केलेले बंदोबस्ताचे नियोजन अगदीच तोकडे पडले. पोलिस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी तेथे असूनही पोलिसांचे नियोजन गांभीर्याने झाले नसल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाच्या आवारात जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करू नये, शांतता बाळगावी, असे आवाहन मनसेचे परिवहन विभागाचे मराठवाडा अध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी केले. पोलिसांनीही केले. त्यामुळे सुरवातीला शांतता पसरली. राज ठाकरे आल्यानंतर मात्र गर्दी उसळली व न्यायालयाच्या आवारातच कार्यकर्त्यांची गर्दी झाली. राज ठाकरे यांनाही न्यायालयात जाताना कसरत करावी लागली. त्यातच भर पडली ती राज ठाकरे यांच्या खासगी सुरक्षारक्षकांच्या अरेरावीची. पोलिसांनी व्यवस्थित नियोजन केले असते तर न्यायालयाच्या आवारातील गोंधळच घडला नसता, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

आता पक्षाचे काय..!राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर "मनसे' कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे, हे खरे आहे. यातून मात्र आता नेत्यांनीही आपापले गट विसरून एकत्र येण्याची गरज आहे. जिल्ह्यात पक्ष वाढला पाहिजे, असे "मनसे'च्या प्रत्येक नेत्याचे मत असले तरी काही नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अपवाद सोडले तर अनेकांची कृती तशी नाही. आपापले गट सांभाळण्यातच धन्यता मानणारे अनेकजण आहेत. त्यामुळेच पक्षवाढीला मर्यादा येत आहेत, ही सामान्य "मनसे' कार्यकर्त्यांची भावना आता राज ठाकरे मनावर घेतील काय, हा प्रश्‍न आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलित काय, या प्रश्‍नाचे उत्तर शोधताना नेत्यांनी आपसांतील मतभेद विसरून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले तरी खूप मोठे यश असेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें