गुरुवार, 14 अप्रैल 2011

मनसेची फेरीवाल्यांना मारहाण

मनसेची फेरीवाल्यांना मारहाण
सकाळ वृत्तसेवा
Friday, April 15, 2011 AT 01:15 AM (IST)
 

मुंबई -  ठाण्यातील एका परप्रांतीय पाणीपुरीवाल्याने केलेल्या गलिच्छ प्रकाराचा फटका आज मुंबईतील अनेक परप्रांतीय पाणीपुरी, भेळपुरी आणि लिंबू सरबतवाल्यांना बसला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज अनेक ठिकाणी सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना चोप देऊन त्यांना पळवून लावले. काही फेरीवाल्यांच्या गाड्याही संतप्त कार्यकर्त्यांनी उलटून टाकल्या. त्यामुळे शहरातील मोक्‍याची ठिकाणे अडवून पाणीपुरी, भेळपुरी व लिंबू सरबत विकणाऱ्या परप्रांतीयांच्या असंख्य गाड्या संध्याकाळपासून दिसेनाशा झाल्या.

ठाण्यात नौपाडा येथील परप्रांतीय पाणीपुरीवाला त्याच्या ठेल्याजवळच लोट्यात लघुशंका करून, त्याच लोट्याचा वापर खवय्यांना पाणी देण्यासाठी करीत असल्याचा किळसवाणा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला. या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध होत होता. प्रसिद्धिमाध्यमांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसांपूर्वी उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या, तसेच अस्वच्छता ठेवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंबंधी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता; परंतु त्यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यातच ठाण्यातील प्रकार घडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. दादर, कबुतरखाना, गिरगाव, छत्रपती शिवाजी टर्मिनस, खाऊ गल्ली, कुलाबा, गोरेगाव या परिसरात बसणाऱ्या पाणीपुरी, भेळपुरी व लिंबू सरबतवाल्या फेरीवाल्यांना दुपारी साडेतीन वाजल्यापासून त्यांनी व्यवसाय करण्यास मनाई केली. काही फेरीवाल्यांना वारंवार बजावूनही त्यांनी आपल्या गाड्या न हटविल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी या फेरीवाल्यांना बेदम चोप दिला. याशिवाय काही गाड्याही उलटून टाकल्या. या आंदोलनामुळे सायंकाळपर्यंत संपूर्ण शहरातून पाणीपुरी, भेळपुरी व सरबतवाल्या परप्रांतीय फेरीवाल्यांच्या गाड्या गायब झाल्या.
या संदर्भात बोलताना मनसेचे दादर विभागप्रमुख संदीप देशपांडे म्हणाले, ""महापालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार केल्यावरही उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळेच मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलन केले.'' दरम्यान, अशा कोणत्याही आंदोलनाची पोलिसांकडे नोंद नाही; मात्र कायदा हातात घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिस प्रवक्ते व पोलिस उपायुक्त राजकुमार व्हटकर यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें