सोमवार, 19 मार्च 2018

राजसाहब, बदल रहे है !

काँग्रेस मुक्त भारतची बेंबीच्या देटापासून भाजपनेही आरोळी ठोकली. तरीही भारत काँग्रेस मुक्त होऊ शकला नाही. काँग्रेसची परिस्थिीती नाजूक आहे हे खरे आहे. पण, तो भारत मुक्त होऊ शकणार नाही. तेच मोदीबाबतही म्हणता येईल. आज देशात सर्वाधिक राज्यात भाजप सत्तेवर आहे. राहुल गांधी किंवा राज ठाकरे म्हणतात म्हणून भारत मोदी मुक्त होईल का ? 
अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकारण बदलत आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर पुढे मिळेलच. आज ते सर्व घटकांना बरोबर घेऊनच जाण्याचा विचार करीत आहेत असे त्यांच्या भाषणावरून दिसून येत आहे. राज यांचे काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठीकडून हिंदुत्त्वाकडे वळले होते. त्यांचे हिंदुत्वही ज्वलंत होते. ते भाजपच्याही कधी कधी पचनी पडत नसे. राज हे शिवसेनेत असताना हे दोन्ही मुद्दे घेऊन लोकांपुढे गेलेले आहेत. त्यांनीही एैन उमेदीच्या काळात जोरदार बॅटींग करून शिवसेनेच्या पदरात कसे यश पडेल यासाठी कष्ट घेतले होते. राज यांना हिंदुत्वापेक्षा मराठी माणसाचे हित महत्त्वाचे वाटते. मराठी माणूस हा त्यांच्या राजकारणाचा कणा आहे. असे असले तरी केवळ उच्चवर्णिय मंडळींना राज खूप जवळचे वाटतात. आता ही प्रतिमा पुसण्यासाठी जे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
हा तेल्या तांबोळ्यांचा पक्ष बनला पाहिजे असे जर त्यांना वाटत असेल आणखी खूप कष्ट त्यांना घ्यावे लागतील. बीसी, ओबीसी, आदिवासी, माळीसाळी, तेलीतांबोळी, मुस्लीम, ख्रिश्‍चन, जैन, लिंगायत, धनगर आदी ज्या अठरापगड जातीपाती आहेत त्यांच्यापर्यंत पक्ष पोचला पाहिजे. शिवसेना घराघरात का पोचली हे ही त्याला एक कारण आहे. महाराष्ट्रात तरी शिवसेना आणि मनसे हे दोनच पक्ष असे आहेत की जेथे जातीला स्थान नाही. स्वत: ठाकरे हे "सीकेपी' आहेत म्हणून हे दोन्ही पक्ष "सीकेपीं'चे आहेत असे कोणी म्हणत नाहीत. इतर पक्षाचे तसे नाही.

भाजप हा भटाबामनांचा, काँग्रेस, राष्ट्रवादी मराठा, अल्पसंख्यांकाचा, आरपीआय दलितांचा असे आजही कमीअधिक प्रमाणात समजले जाते. मनसे तर पिऊर मराठी माणसाचा पक्ष म्हणून समजला जातो. मात्र राज्यात ज्या म्हणून काही मराठी जाती आहेत त्यामध्ये मनसेच अद्याप पोचला नाही. गावखेड्यात हा पक्ष पोचण्यासाठी मनसेला खूप मोठे जाळे विणावे लागेल.
2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता राज्यात काही नवीन समीकरणे उदयास येतील असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. दोन्ही कॉंग्रेस, शिवसेना, मनसेचे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी दीर्घकाळ सत्तेवर राहिले तर आपले काही खरे नाही ही भीती महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रादेशिक पक्षांना सतावत आहे. त्यामुळे ममता, चंद्राबाबू, उद्धव असोत राज ठाकरे ही मंडळी मोदींवर तुटून पडत आहेत.
मोदी हे भाजपला विजयश्री मिळवून देणारे एकमेव नेते आहेत. मोदी या दोन नावावर भाजपचा पताका पुढेही फडकेल असा विश्वास या पक्षातील नेत्यांनाच नव्हे तर ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांना वाटतो आहे. मोदीविरोधात सर्व विरोधक कितीही गरळ ओकत असले तरी त्यांच्यावर अद्यापही देशातील जनतेचा विश्वास आहे. आज कॉंग्रेस त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करीत असली तरी याच काँग्रेसवाल्यांनी आपला चेहरा पुन्हा एकदा आरशात पाहयला हवा.
काँग्रेस भ्रष्ट आहे हा जो डाग या पक्षाला लागला आहे तो लवकर पुसला जाणार नाही. कॉंग्रेस भ्रष्टाचाररूपी रावण जोपर्यंत गाडण्याची प्रतिज्ञा करीत नाही तोपर्यंत अवघड आहे. कोणत्याही राज्यात स्वच्छ प्रतिमेबरोबर विजय मिळवून देणारे खमके आणि तरूण नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. तसेही चित्र अद्याप कॉंग्रेसमध्ये दिसत नाही. ते केवळ मोदींनाच लक्ष्य करीत आहेत.
इमेज जितकी डॅमेज करता येईल तितके करण्याचा प्रयत्व प्रादेशिक पक्षही करीत आहेत. राज हे ही तेच करीत आहे. ऐरवी ते नेहमीच कॉंग्रेस, शिवसेना, भाजपवर टीका करीत असतात. कालमात्र तसे चित्र दिसले नाही. त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य केवळ भाजपच ठेवले होते. भाजप सरकार कसे वाईट आहे हेच ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जर्मनीत हिटलार वापरत असलेल्या क्‍लृप्ल्त्या केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार वापरत असल्याचेही ते म्हणाले. हा त्यांचा कट लक्षात घेतला नाही तर भविष्य खूप अवघड आहे. देशात आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती आणणारे हे सरकार पुन्हा येणार नाही याची काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. मोदींच्या झंझावातामुळे प्रादेशिक पक्षांचा पालापाचोळा होत आहे, की काय अशी भीती व्यक्त केली जात असताना यूपीतील पराभवाने विरोधकांना विशेषत: प्रादेशिक पक्षांना नवी उभारी मिळाली. त्यांच्या पंखात बळ आले आहे. भाजप विरोधात महाराष्ट्रात तरी विरोधकांनी मोट बांधली आणि शिवसेनाही सत्तेतून बाहेर पडली तर भाजपला सर्व विरोधकांशी सामना करताना दमछाक होणार आहे. मोदींची प्रतिमा जितकी म्हणून मलिन करता येईल तितकी केल्यास त्याचा राज्यात फायदा उठविता येईल हेच गणित सर्वच पक्ष मांडत असावेत. मात्र मोदी-फडणवीस हे ही कच्च्या गुरूचे खेळाडू नाहीत तेही विरोधकांशी तितक्‍यात ताकदीने उतरणार नाहीत का ? तसे अमित शहांनीही बोलून दाखविले आहेच.

तरीही महाराष्ट्रात भाजप सरकारला सत्तेवरून कसे खाली खेचता येईल याचाच विचार आतापासून सुरू आहे असे म्हणावे लागेल. ज्येष्ठ नेते शरद पवारांची मुलाखत घेणे, कालच्या जाहीरसभेच्या एकदिवस आधी त्यांची पुन्हा भेट घेणे, हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली घडविण्याचे षडयंत्र रचले जाईल. हे षडयंत्र ओळखा असे आवाहन ते दोन्ही धर्मियांना करतात. मनसे हा कोणत्याही धर्माचा पक्ष नाही. सर्व जातीधर्माना बरोबर घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतील असे दिसते. या सर्व घडामोडी लक्षात घेता राजसाहब, बदल रहे है ? असे कोणीही म्हणू शकतो.
हे सर्व असले तरी ज्या भाजपने काँग्रेस मुक्त करण्याची हाक देशवाशियांना दिली. तरीही भारत काँग्रेस मुक्त होऊ शकला नाही. तेच पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबतही म्हणता येईल. आज देशात सर्वाधिक राज्यात भाजप सत्तेवर आहे. राहुल गांधी किंवा राज ठाकरे म्हणतात म्हणून भारत मोदी मुक्त होईल का ?
-प्रकाश पाटील

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें