मंगलवार, 15 फ़रवरी 2011

मुंडेंचा मनसे युतीचा प्रस्ताव योग्यच

मुंडेंचा मनसे युतीचा प्रस्ताव योग्यच
सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, February 16, 2011 AT 12:45 AM (IST)
 
मुंबई - भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेण्याचा मांडलेला प्रस्ताव योग्यच असल्याचे मत शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांनी खासगीत व्यक्‍त केले आहे. मुंबईत मराठीपेक्षा हिंदी भाषकांचे प्रमाण अधिक असल्याने सत्तेच्या चाव्या राखण्यासाठी उद्धव आणि राज या दोन्ही भावांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे; मात्र त्यांच्यातून विस्तव जात नसल्याने हा प्रस्ताव पुढे न्यायचा तरी कसा, असा प्रश्‍न शिवसेना नेत्यांना पडला आहे.

मुंबई महापालिका हाती राखणे शिवसेनेसाठी आवश्‍यक आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने खेचलेल्या मतांमुळे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. मनसेचा जोर आजही कायम आहे का, याचा विचार करायला हवा; मात्र तो वस्तुनिष्ठपणे व्हावा, असा दृष्टिकोन सेनेत दबक्‍या आवाजात मांडला जात होता. त्यातच मुंडे यांनी तीन पक्षांची मोट बांधण्याचे विधान केले. शिवसेनेने "सामना' या मुखपत्रात अग्रलेख लिहून मुंडे यांचा प्रस्ताव धुडकावून लावला असला तरी भाषा नेहमीप्रमाणे जहाल नाही. मराठी मते एकत्र आल्याशिवाय सत्ता राखणे कठीण असल्याचे मत या पार्श्‍वभूमीवर शिवसेनाप्रमुखांसमोर मांडणे अगदीच अशक्‍य नसल्याचे मानले जाते आहे.

शिवसेनेतील मैत्रीवादी गटाने मराठी टक्‍क्‍यांची; तसेच लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी तयार केली आहे. हा विषय समोर आणणे आवश्‍यक असल्याचे मत समविचारी नेत्यांच्या कानी घातले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्यातून विस्तव जाणेही अशक्‍य असल्याने हा प्रस्ताव मान्य होणार नाही, याची कल्पना असली तरी मतांचे राजकारण लक्षात घेता तो मांडण्याशिवाय पर्याय नसल्याचे एका नेत्याने नमूद केले.

योग्य वेळी हा प्रस्ताव शिवसेनाप्रमुखांसमोर एखाद्या वरिष्ठ नेत्यामार्फत मांडावा, अशा विचारात ही मंडळी असतानाच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीरपणे एकीकरणाची भूमिका मांडल्याने दोन्ही भावांना सावध होता आले. त्यामुळे आता ही मांडणी पूर्वीपेक्षा काहीशी कठीण झाल्याचे बोलले जाते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत तीव्र आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतरही दोघांच्याही जागांत वाढ झाली ही भूमिका दोघे बंधू घेतील, अशी अपेक्षा पक्षातील नेते व्यक्त करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें