विधान परिषद निवडणुकीवर मनसेचा बहिष्कार!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
संजय मिस्कीनमुंबई - विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे मनसेचे विधानसभेतील 13 आमदार आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी विधान परिषदेसाठी होणाऱ्या मतदानात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आघाडी आणि शिवसेना यांच्या उमेदवारांत सरळसरळ लढत होत असल्याने मनसेची मते कोणाच्या पारड्यात जातात, याची उत्सुकता दाटली होती. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांपैकी कोणालाही मतदान केले, तरी मनसेला राजकीय टीकेला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चेला रोखत "झाकली मूठ' कायम राहावी यासाठी मनसेने मतदानावर बहिष्कार घालण्याची सावधगिरी बाळगल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीच्या प्रयत्नांवर पाणी
या निवडणुकीत मनसेच्या मतांना खेचण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. काही मनसे आमदारांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दूरध्वनी करून आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याची विनंतीही केल्याचे समजते. मनसेच्या 13 आमदारांनी आघाडीचे उमेदवार किरण पावसकर यांना मतदान करावे, असे साकडे घालण्यात आले होते; मात्र मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र संताप मनसे आमदारांमध्ये आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मनसेने सहभागी होऊ नये, अशी भूमिका काही आमदारांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडली होती. तसाच निर्णय राज यांनी घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें