गुरुवार, 9 सितंबर 2010

हेलिकॉप्टरमधून उडाल्याने महाराष्ट्र कळत नाही

हेलिकॉप्टरमधून उडाल्याने महाराष्ट्र कळत नाही
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 10, 2010 AT 12:30 AM (IST)
 

मुंबई - हेलिकॉप्टरमधून चार उड्या मारल्या म्हणजे महाराष्ट्र कळत नाही. मराठी जनतेला काय हवे हे जाणून घ्यायला शिका, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा राहुल गांधी यांच्यावर केली. महागायिका, विश्‍वगायिका वैशाली माडे हिच्या "भरारी' अल्बमचे प्रकाशन केल्यानंतर श्री. ठाकरे बोलत होते.

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात अल्बमच्या प्रकाशनावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. राज यांनी राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, "मी नेहमीच महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना बोलून दाखवतो. महाराष्ट्रातील जनता कोणाच्या मागे जायला काही मूर्ख नाही. मी जे बोलतो ते त्यांच्या हिताचे बोलतो आणि ते बोलतच राहणार. कायदे मोडणाऱ्या मल्टिप्लेक्‍सवाल्यांना "खळ्ळ', "फटाक' भाषा कळते; ते कायद्याचा वापर करीत नाहीत, त्यामुळे त्यांना त्याच भाषेत समजवावे लागते. मल्टिप्लेक्‍समध्ये रंगभूमीसाठी जागा असावी, हे कायद्यात असूनही त्याचे पालन होत नाही. त्यामुळे माझ्या पद्धतीने काम केले, की सगळे काही व्यवस्थित होते.'' यापुढेही आपण मराठी जनतेसाठी बोलतच राहणार. आपण उचललेला मुद्दा कोणीही उचलला तरी चालेल, पण तो प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आहे, असेही राज म्हणाले.

अक्कल शिकविण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा - राज

अक्कल शिकविण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा - राज
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 09, 2010 AT 12:30 AM (IST)
 
मुंबई - एक दिवस महाराष्ट्रात येऊन चार उड्या मारण्यापेक्षा, वर्षानुवर्षे ज्या उत्तर प्रदेशातील मतदारांच्या मेहेरबानीवर गांधी कुटुंब निवडून आले व त्यांनी देशाचे पंतप्रधानपद उपभोगले, त्याच उत्तर प्रदेशाचा विकास इतकी वर्षे का झाला नाही, याचे प्रथम स्वतः आत्मपरीक्षण करा व नंतरच दुसऱ्याला अक्कल शिकवा, असा मुँहतोड जबाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना दिला.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी काल (ता. 7) राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांचा आवाज फक्त मुंबईत असल्याचा टोला राहुल यांनी लावला होता. राज यांनी खास "सकाळ'शी बोलताना राहुल यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की हेलिकॉप्टरने हवेत फिरण्यापेक्षा जमिनीवर फिरा व मगच बोला. कॉंग्रेस सरकारच्या कारकिर्दीत लोकांना चपला बाहेर काढून ठेवाव्या लागतात. कारण, या दळभद्री कॉंग्रेसच्या नाकर्तेपणावर लोक चपला फेकून मारतील, त्याला हे घाबरतात.''

ते म्हणाले, ""राहुल गांधी यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे उत्तर प्रदेशातून निवडून आले. ते सुमारे 16 ते 17 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांची आजी इंदिरा गांधी या निवडून आल्या, त्यासुद्धा उत्तर प्रदेशातून. त्याही सुमारे 15 वर्षे पंतप्रधानपदी होत्या. त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी बसलेले त्यांचे वडील राजीव गांधी हेसुद्धा उत्तर प्रदेशातून निवडून आले. त्यांची आई सोनिया गांधी यासुद्धा उत्तर प्रदेशातील मतदारसंघातून निवडून आल्या व हेसुद्धा उत्तर प्रदेशाच्या मतदारांच्या मेहेरबानीमुळे निवडून आले. जर हे सर्व गांधी कुटुंबीय उत्तर प्रदेशातून निवडून आले, तर इतकी वर्षे उत्तर प्रदेशाचा विकास का झाला नाही? तेथून सुमारे 20 ते 25 लाख लोक नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येतात, याचा आधी विचार करा व मगच विकासाच्या गप्पा मारा. तेथील लोकांचा भार आमच्या महाराष्ट्रावर टाकायचा व येथे येऊन अक्कल शिकविण्याची गरज नाही

सोमवार, 6 सितंबर 2010

'ठाकरे जोडो अभियाना'चा पुन्हा निर्धार

'ठाकरे जोडो अभियाना'चा पुन्हा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:24 AM (IST)

गोविंद येतयेकर - सकाळ वृत्तसेवामुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनासाठी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा'च्या संस्थापकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले नसले तरी केवळ मराठीच्या अस्मितेसाठी चळवळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठी जनमताचा रेटा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी माणसाला लागलेला दुहीचा शाप नष्ट करण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर या "दुहीच्या रावणा'चे दहन करण्याचा विडा चळवळीचे सदस्य उचलणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून दुरावलेल्या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, मराठी अस्मिता, मराठी माणसाला एकजुटीने वाचविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काही महिन्यांपूर्वी ही चळवळ सुरू झाली. गेल्या काही महिन्यांत जनमताचा कानोसा घेतल्यानंतर काल (ता. 5) या चळवळीचे सदस्य प्रथमच रस्त्यावर उतरले. या मनोमिलनाला राज ठाकरे यांनी चकवा दिला, तर मराठी जनमानसात संदेह निर्माण करू नका व शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र येऊन मराठीची ताकद वाढवा, असे आवाहन करीत उद्धव ठाकरे यांनी "ठाकरे जोडो'च्या प्रयत्नांना बगल दिली; परंतु यानंतरही मोहिमेची धुरा सांभाळणारे सतीश वळंजू यांची लढाई संपलेली नाही. मराठीच्या अस्मितेसाठी याप्रकारची लढाई अशी यशस्वी होणार नाही. कारण, मराठ्यांना दुहीचा शाप आहे. हे जाणून या दुहीच्या रावणरूपी शापाचे विजयादशमीच्या दिवशी दहन करण्यात येणार असल्याची माहिती वळंजू यांनी "सकाळ'ला दिली.

"ठाकरे जोडो'साठी काल झालेल्या प्रयत्नांना यश आले नाही; तरीही मराठी जनमताचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न अजून किमान पाच महिने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी म्हणजेच 23 जानेवारी 2011 रोजी भव्य जाहीर सभा घेऊनच या मोहिमेची निर्णायक लढाई लढली जाणार आहे. या पाच महिन्यांत आमची मोहीम आम्ही प्रभावीपणे राबविणार आहोत. "मनसे'ची लोकप्रियता वाढली आहे. मराठी माणसाचे विभाजन झाले आहे व भविष्यातही होणार आहे. त्यात शिवसेनेचे व पर्यायाने मराठी माणसाचे नुकसान होत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
उद्धव व राज यांच्यातील दुहीमुळे मुंबई महापालिकेची सत्ता हातातून निघून जाईल व अमराठी लोकांच्या हाती पालिकेची सत्ता जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

रविवार, 5 सितंबर 2010

मनोमीलन चळवळीकडे राजची पाठ

मनोमीलन चळवळीकडे राजची पाठ
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई  -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मनोमीलनासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांत आज दोन्ही बंधूंनी कोलदांडा घातला. त्यामुळे मनोमीलनाचा संदेश घेऊन आज "कृष्णकुंज' व "मातोश्री'वर गेलेल्या कार्यकर्त्यांची मने काहीशी खट्टू झाली. लेखी पूर्वकल्पना देऊनही राज यांनी घरी न राहणेच पसंत केले. दुसरीकडे उद्धव यांनी मात्र कार्यकर्त्यांची भेट घेतली; मात्र त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.

शिवसेना-"मनसे'तील दुहीमुळे हतबल झालेल्यांनी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा' याअंतर्गत आज सकाळी शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला हार घालून मूकमोर्चा काढला. राज व उद्धव यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा एकत्र यावे, यासाठी शिवाजी पार्क येथे स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली. त्यास शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी चांगला प्रतिसादही दिली. विशेष म्हणजे मोर्चाला ज्येष्ठ शिवसैनिकांची उपस्थितीही लक्षणीय होती. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार व माजी आमदार सुरेश गंभीर हेही मोर्चात सहभागी झाले होते; पण "प्रजा उत्साही मात्र, राजा उदासीन' असेच काहीसे चित्र या मोर्चादरम्यान पाहायला मिळाले. लेखी पूर्वकल्पना देऊनही राज यांनी घरी न राहणेच पसंत केले. दुसरीकडे उद्धव यांनी मात्र कार्यकर्त्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.

या वेळी बोलताना उद्धव म्हणाले, ""हे आंदोलक मॉंसाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून निघाले आहेत आणि घरी आलेल्यांचा सन्मान करणे ही "मॉं'चीच शिकवण असल्यामुळे मला यांची भेट घेणे भागच आहे. अन्यथा, हे कोणत्या उद्देशाने येथे आलेत यात मला रस नाही. राहिला भाग मराठी माणसाच्या हिताचा, तर शिवसेनेचा जन्मच मुळी मराठी माणसाच्या हितासाठी झाला आहे. मराठी माणसाने भगव्याखाली एकत्र यावे तरच मराठी माणसाची ताकद वाढेल.''

दरम्यान, आज आमची सहामाही परीक्षा असून त्यात आम्ही काठावर पास झालो. आंदोलनाचा दुसरा टप्पा दसऱ्याच्या दिवशी असून याची फायनल 23 जानेवारी, 2011 ला होणार आहे. तेव्हा आम्ही प्रचंड जाहीर सभा घेऊन या नेत्यांना एकत्र येण्यास भाग पाडू, असा विश्‍वास या चळवळीचे प्रवक्ते सतीश वळंजू यांनी व्यक्त केला.

'भगव्याखाली मराठी माणसाने एकत्र यावे'

'भगव्याखाली मराठी माणसाने एकत्र यावे'
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 02:51 PM (IST)

मुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्यासाठी आज (रविवार) मुकमोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मराठी माणसाच्या विकासासाठी भगव्या झेंडाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र चळवळतर्फे आज सकाळी शिवाजी पार्कपासून या मुकमोर्चाला सुरवात झाली. चळवळीचे प्रमुख सतीश वळंजू यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सुरवातीला मोर्चा राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' याठिकाणी गेला. राज ठाकरे बाहेर गेले असल्याने त्यांची राज ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. यानंतर मोर्चा 'मातोश्री'कडे रवाना झाला. तिथे त्यांची भेट उद्धव ठाकरे यांच्याशी झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मोर्चा काढून प्रयत्न वाया घालविता मराठी माणसाच्या कल्याणासाठी भगव्याखाली एकत्र येण्याचे सांगितले. तसेच त्यांनी शिवसेनेला कोणाची गरज नसल्याचे सांगितले.

शुक्रवार, 3 सितंबर 2010

"मातोश्री', "कृष्णकुंज'वर उद्या काढणार मूकमोर्चा

"मातोश्री', "कृष्णकुंज'वर उद्या काढणार मूकमोर्चा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:43 AM (IST)
 

मुंबई  -  शिवसेना-मनसेच्या दुहीमळे मराठी माणसाचे नुकसान होऊ नये व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनोमीलन व्हावे, यासाठी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा' ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्याची निर्णायक लढाई 5 सप्टेंबरला दिसणार आहे. राज आणि उद्धव यांच्या निवासस्थानी जाऊन चळवळीचे कार्यकर्ते भूमिका मांडणार आहेत.

चळवळीचे संस्थापक सतीश वळंजू यांच्यासह शशी सावंत, दीपक भोसले, अरविंद पावसकर, योगेंद्र चेंबूरकर व प्रतीक मंत्री हे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येतील. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्ते मूकमोर्चाने राज ठाकरे यांचे निवासस्थान "कृष्णकुंज'च्या दिशेने जाणार आहेत. याची पूर्वकल्पना आजच "कृष्णकुंज' निवासस्थानी निवेदनाद्वारे देण्यात आली. राज ठाकरे यांनी म्हणणे ऐकून घ्यावे, हीच आमची इच्छा असल्याचे श्री. वळंजू यांनी सांगितले.

"कृष्णकुंज'वरून मूकमोर्चा वांद्रे कलानगर येथील "मातोश्री' निवासस्थानी जाणार आहे. "मातोश्री'वरही आजच निवेदन पोहोचविण्यात आले आहे. या मोर्चात मराठीप्रेमी व मराठी अस्मिता कायम राहावी असा "पण' करणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मूकमोर्चात कुठल्याही रंगाचा झेंडा दिसणार नाही; तसेच कोणतीही घोषणा करण्यात येणार नाही. मात्र, "केवळ मराठी मनोकामना... हे चित्र पुन्हा दिसावे...' असे फलक प्रत्येकाच्या हाती देण्यात येणार असून याच माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

पत्रक, बॅनर, माध्यम, एसएमएस; तसेच सह्यांच्या मोहिमेद्वारे आमच्या चळवळीचे उद्दिष्ट मुंबईतच नव्हे; तर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात आले आहे. कालच्या दहीहंडीच्या निमित्ताने विविध गोविंदा पथकांशी संपर्क साधून हा विषय त्यांच्यापर्यंत नेण्यात आला आहे. आता पाच सप्टेंबरच्या निर्णायक मूकमोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहायचे आहे. नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, चिपळूण आदी ठिकाणांहून कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत. सुमारे 10 हजार लोक यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज वळंजू यांनी व्यक्त केला.

सोमवार, 30 अगस्त 2010

`राज्य "मनसे'च्या इशाऱ्यावर चालत नाही`

`राज्य "मनसे'च्या इशाऱ्यावर चालत नाही`
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 31, 2010 AT 12:15 AM (IST)


मुंबई -   राज्य "मनसे'च्या इशाऱ्यावर चालत नाही तर इथे कायद्याचे राज्य आहे. कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तर, त्याच्यावर कडक कारवाई करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज "मनसे'ला ठणकावले. "मनसे'च्या मराठीच्या आंदोलनावर प्रसिद्धिमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते.

शिवसेना आणि मनसे यांची मराठीच्या मुद्द्यावर श्रेयासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. मराठीच्या मुद्द्यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी सिनेमा प्राइम टाइमला लावण्याच्या मुद्द्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील इशाऱ्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्‍समध्ये "खळ्ळ खटॅक' केले. गणेशोत्सवातही प्रामुख्याने मराठी गाणी लावली जावीत यासाठीही सध्या आग्रह धरला जात आहे. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी राज्य "मनसे' चालवीत नाही. कायद्याचे राज्य आहे, असे सांगत मनसेच्या इशाऱ्यांबाबत कायदेशीर माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.