गुरुवार, 9 अक्टूबर 2014

वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ - राज ठाकरे

मुंबई - वेळप्रसंगी आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ, असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात कोणता पक्ष कुणासोबत आघाडी करेल, याबाबत आतापासून चर्चा सुरू झाली आहे.

जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुती तुटल्याच्या दिवशी राज ठाकरे आजारी असल्याने रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारणा केली होती. तब्येतीची विचारपूस केली त्यात गैर काय, अशा शब्दांत उद्धव यांनी त्यांच्यातील संभाषणाची कबुलीही दिली होती. तसेच उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी "कृष्णकुंज‘वर जाऊन राज यांची भेट घेतल्याची चर्चा होती. आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना राज आणि उद्धव यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष केल्याने शिवसेना-मनसे एकत्र येणार का, या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच राज यांनी वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ, असे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंगलवार, 7 अक्टूबर 2014

...मोदी देश कधी चालविणार ?

डोंबिवली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात सगळीकडे जाहीर प्रचार सभा घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत, तर ते देश कधी चालविणार ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.

येथील डीएनसी मैदानावर मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका येतील. त्यानंतर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्याचाही प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी फिरणार आहेत का ? कारण भाजपकडे महाराष्ट्रात एकही चेहरा असलेला नेता नाही. याचा दाखला देण्यासाठी ठाकरे यांनी मोदी यांच्याच विधानाचा आधार घेतला. त्यांनी सांगितले की, मुंडे असते, तर मला प्रचारासाठी येण्याची गरज भासली नसती. यावरून त्यांनी राज्यातील भाजप नेत्याची लायकीच काढली आहे. मोदींनी कितीही सभा घेतल्या, तरी मला काही फरक पडत नाही. भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचे उमेदवार आयात केले आहेत. त्यांच्या नावाची जंत्रीच ठाकरे यांनी वाचून दाखविली. त्यामुळे मोदी हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात फिरत आहेत. ज्या लोकांनी राज्याच्या विकासावर वरवंटा फिरविला. त्याच लोकांच्या हाती सत्ता देण्यासाठी मोदी त्यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. हा भाजपचा प्रचार नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचाच प्रचार आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. राज यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांची नक्कल करून सभेत एकच हशा पिकविला. खडसे विधानसभेत सहा तास बोलतात. विधानसभा ही काय प्रवचन देण्याची जागा आहे का ? त्यांची जागा आस्था चॅनेलवर आहे, असा सल्लाही राज यांनी खडसे यांना दिला आहे.

सोमवार, 6 अक्टूबर 2014

नरेंद्र मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान?

"मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले आहेत, त्यांची मी जाहीर प्रशंसा यापूर्वी केली आहे. मात्र, ते अद्याप गुजरातमध्येच रमले आहेत. मला वाटले पंतप्रधान झाल्यावर ते बदलले असतील; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला. या वेळी राज यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा तीव्र करीत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावरही हल्ला केला. 

मुंबईतील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज यांची घाटकोपर येथे सभा झाली, या वेळी ते बोलत होते. राज म्हणाले की, मोदींनी राज्यातील भाजप नेत्यांची लायकी काढली आहे. "मुंढे असते तर मला महाराष्ट्रात यायची गरज पडली नसती,‘ असे मोदी यांनी बीड येथील सभेत विधान केले होते. तो धागा पकडत राज म्हणाले, की स्वतःची ताकद नसतानाही स्वबळाच्या बेटक्‍या भाजप फुगवत आहे. भाजपला स्वतःचे उमेदवार नाहीत, सगळे बाहेरून आयात केलेले आहेत. 

या वेळी राज यांनी भाजपने कोणत्या पक्षांचे उमेदवार आयात केले याची यादी वाचून दाखवली. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावरही त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

बुधवार, 1 अक्टूबर 2014

रस्ते, पाणी, वीज हे विकासाचे त्रिशूळ : राज ठाकरे

वणी (जि. यवतमाळ) : "रस्ते, पाणी आणि वीज हे विकासाचे त्रिशूळ आहे. ही कामे केली तर विकास होतो. पण आजवर सत्तेत असलेल्यांना तेच जमले नाही. याकरिता आम्ही उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला काही करण्याची संधी द्या,‘‘ असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले.

मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारासाठी राज ठाकरे आज वणीत आले होते. यावेळी शासकीय मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 
ब्ल्यूप्रिंटविषयी माहिती देताना म्हणाले राज ठाकरे, "गेल्या 60 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात रोजीरोटी व पाणी या मुख्य समस्या सुटल्या नाहीत. म्हणून माझ्यासारख्या चित्रकाराला राजकारणात उतरावे लागले. माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझा लढा आहे. आम्ही सत्तेत आलो; तर सर्वसाधारण माणसाच्या समस्या सोडविण्याकरिता कार्य करू.‘‘
ते म्हणाले, "सणावाराच्या काळात आमच्या परंपरांचा विचार न करता आमच्यावर निवडणूक लादली गेली. आम्ही किंवा कोणताही राजकीय पक्ष यावर काही बोलत नाही. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीप्रश्‍न, बेरोजगारी आदी विषयांवर कोणताच राजकीय पक्ष बोलला नाही. केवळ युती व आघाडी टिकेल की नाही, याचीच चर्चा करीत होते. तुमच्या समस्यांशी यांना काही घेणे देणे नाही. यांनी दिलेले आमदार-खासदार आपल्या क्षेत्रात न राहता मुंबई-दिल्लीत राहतात. यांनाही नागरिकांच्या समस्यांशी काहीच आपुलकी नाही.‘‘

मंगलवार, 30 सितंबर 2014

विदर्भातील नेत्यांनीच विदर्भाकडे दुर्लक्ष केले-राज

अमरावती- विदर्भातील नेत्यानींच विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक जमिनींचा वाळवंट केला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) केला.

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मनसेची दुसरी प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘विदर्भाचा विकास न करण्यामागे येथील नेतेच जबाबदार आहेत. विदर्भात पर्यटनाला चांगला वाव आहे, मात्र दुर्दैवाने राज्यात पर्यटन खाते म्हणजे सर्वांत खालचे खाते समजले जाते. राजकीय नेत्यांनी कसदार जमिनींचे अक्षरशः वाळवंट केले आहे. महाराष्ट्रातील युवकांना मी रोजगार मिळवून देणार आहे. परप्रांतातील युवक महाराष्ट्रात येऊन पैसे मिळवताना दिसतात. पण, स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही. सरकार दुसऱ्याच्या मुलाला जवळ करत असून, आपल्या मुलाला मारतो आहे. पोलिस भरतीवेळी युवकांना जीव गमवावा लागला आहे, सरकारला याचे काहीही वाटत नाही. माझ्या हातात सरकार द्या सगळी परिस्थिती बदलून दाखवतो.‘

‘महाराष्ट्रामध्ये फक्त इच्छाशक्तीची कमतरता आहे. जनतेने सर्व राजकीय पक्षांना गाडून मनसेला संधी द्यावी. महाराष्ट्रातील शेतकरी पाण्याविना मरताना दिसत आहे. पण, राज्याचे उपमुख्यमंत्री बेजबाबदार विधान करत आहेत. गेल्या साठ वर्षात महिलांना शौचालय बांधून देऊ शकलो नाही हे मोठे दुर्दैवच आहे. मुख्यमंत्री कामच करत नाही, म्हणूनच त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे,‘ असेही ठाकरे म्हणाले.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. तामिळनाडूमधील नेते जयललिता यांच्या समर्थनार्थ येतात, पण आपल्याकडे तसे चित्र दिसत नसल्याचेही ते म्हणाले.

सोमवार, 29 सितंबर 2014

भाजप बेभरवशाचा, तर शिवसेनेचा भंपकपणा -राज


मुंबई - भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवताच येणार नाही, त्यांचा काय भरवसा, असा सवाल करून दुसरीकडे शिवसेनेचा केवळ भंपकपणा सुरू असल्याची कडवट टीका राज ठाकरे यांनी केली. कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज येथे आयोजित केलेल्या मनसेच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाल्याने मनसेच्या प्रचाराचा शुभारंभ राज यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार प्रवीण दरेकर, बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी संपुष्टात आलेल्या शिवसेना- भाजप युती आणि कॉंग्रेस आघाडीच्या घडामोडींवर राज ठाकरे यांनी मार्मिक टिप्पणी केली. भाजप नेते अतुल भातखळकर आणि नगरचे माजी आमदार सदाशिव लोखंडे मनसेत प्रवेश करण्यासाठी आले असता त्यांना प्रवेश न देता ही बाब नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणल्याचा गौप्यस्फोट राज यांनी केला. मी तुमच्याशी प्रामाणिकपणा दाखवला, तुम्ही मात्र माझा आमदार पळवता, असा सवाल करून भाजप नेत्यांवर विश्वासघातकी असल्याची टीका त्यांनी केली. युती- आघाडी तुटल्याच्या दिवशी भाजप नेत्यांना शरद पवार यांचा फोन गेला होता. तुम्ही युती तोडा, मी अर्ध्या तासात आघाडी मोडतो, असे पवार म्हणाल्याची माहिती असताना शिवसेना नेते भाजपशी चर्चा का करत होते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर महिन्याभरापूर्वीच युतीला लाथ मारली असती. युती तोडता आणि केंद्रातील मंत्रिपद आणि मुंबई महापालिकेतील युती ठेवता, हा कसला भंपकपणा आणि ढोंगीपणा, असा सवाल करून राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. ""भाजप हा पक्ष वाळवीसारखा कोपऱ्याकोपऱ्याने पोखरत असताना उद्धवना हे कळले कसे नाही, मी तिथे असतो तर भाजपवाल्यांना लाथ मारून हाकलले असते,‘‘ असा टोलाही त्यांनी लगावला.

सत्तेवर आल्यास ब्लू प्रिंटमधील विकास करून दाखवणार, हे माझे वचन असल्याचे राज म्हणाले. सत्तेवर आल्याचा पहिला दिवस म्हणजे झोपडपट्ट्यांचा शेवटचा दिवस असेल, असे सांगून राज यांनी परप्रांतीयांनाही इशारा दिला. मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्या वाढण्यास परप्रांतीय लोंढे आणि बिल्डर लॉबी जबाबदार असून, त्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल, सत्तेवर आल्यास बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रत्येकावर माझी करडी नजर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

तर राज्य 15 वर्षे मागे जाईल

राज्यात सुरू असलेल्या नेत्यांच्या पक्षांतरावर राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ""निवडणुका झाल्यावर विधानसभेत कुणालाच बहुमत न मिळाल्यास राज्य 15 वर्षे मागे जाईल, त्यामुळे या पक्षांना पर्याय म्हणून मी आणि मनसे तुमच्यासमोर ठामपणे उभा आहे. मला एक संधी देऊन बघा.‘‘