गुरुवार, 26 जुलाई 2018

मराठी तरुणांनी आत्महत्या करू नये: राज ठाकरे

मुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते. काल मात्र काकासाहेब शिंदे ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडले. अर्थात असे असले तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की ह्यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल, कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला 'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही.
एक लक्षात घ्या, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक "मराठा समाज" म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारने ह्यावर तत्परतेने भूमिका घ्यायला हवी होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीने करायला हवी होती. पण त्यांनी तसे केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले.
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई - वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून. जी बाहेरची माणसं महाराष्ट्राकडे फक्त लुटायचं केंद्र म्हणून पहातात त्यांच्याकडून. आपले शिवाजी महाराज म्हणाले होते की “हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा”, आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं: “आपण जातीजातीत भांडत रहावे, ही तर परप्रांतीयांची इच्छा”. त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे. हो, प्रत्येकाची ! आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका.
ह्याचवेळी सरकारला एक इशारा. सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचे आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात. नाहीतर आमची मुलं उगाच आशा लावून बसायची आणि हकनाक बळी जायची. दुसरं असे की सरकारला  "शांतता आणि सुव्यवस्था" सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसते आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत. आता पुन्हा काही आश्वासने देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचे कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे. वास्तविक प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचे काय काम? ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारने सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये.

मंगलवार, 26 जून 2018

लोकां सांगे...' राज ठाकरेंचा मोदींवर निशाना

मुंबई : देशात 1975 साली लादलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पुर्ण झाली. या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टिका केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्याशी केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटनेला फारसे महत्त्व दिले नाही, त्यांनी राज्यघटनेचा वापर करून लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत करण्याचा प्रयत्न केला. असे वक्तव्य जेटली यांनी केले केले होते.
आणीबाणीवर भाजप जोरदार टिका करत असताना त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर निशाना साधला. 'लोकां सांगे...' या व्यंगचित्रात निवडणूक आयोग, माध्यमे, रिझर्व बँक, उद्योगपतींना मोदी पायदळी तुडवत असल्याचे दाखवले आहे. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीवर टिका करताना लोकशाहीची मुल्य जपणाऱ्या संस्थांना पायदळी तुडविताना दाखवून लोकां सांगे... या व्यंगचित्रातून आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत.

मंगलवार, 12 जून 2018

राज ठाकरे यांच्या जन्मदिनी पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त

प्रभादेवी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला 14 जून रोजी मुंबईतील 36 पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना एक दिवस पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. मनसेच्या वरळी विधानसभा विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबईत दादर, वरळी नाका, वडाळा, शिवडी, भायखळा, ताडदेव, मलबार हिल, भांडुप, कालिना, विलेपार्ले, अंधेरी, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, दहिसर, मुलुंड, विक्रोळी, वाशी नाका, मुंबादेवी, कुलाबा, कुर्ला आदी पेट्रोल पंपांवर पेट्रोल त्या दिवसाच्या दरांपेक्षा चार रुपयांनी स्वस्त मिळणार असल्याचे धुरी यांनी सांगितले.
ही सवलत फक्त दुचाकीस्वारांसाठी असून 14 तारखेला मध्यरात्री 12 वाजल्यापासून दिवसभरात कधीही पेट्रोल भरू शकतात. त्या दिवशी पेट्रोलचा जो दर असेल त्याप्रमाणे दुचाकीस्वारांनी भरलेले पेट्रोलचे प्रति लिटर 4 रुपयाप्रमाणे होणारे पैसे मनसैनिक भरणार असल्याची माहिती धुरी यांनी दिली.
पेट्रोल पंपांवर गर्दी होणार
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना मिळणारी भेट आणि सध्याचे पेट्रोलचे भडकलेले दर पाहता ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपांवर गर्दी होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

शनिवार, 26 मई 2018

भाजपला दुटप्पीपणाचे परिणाम भोगावे लागतील - राज ठाकरे

चिपळूण : कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला नेऊन पुन्हा फडणवीस व मुनगंटीवार स्वंतत्र विदर्भाच्या घोषणा देत आहेत. या दुटप्पीपणाचे परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागतील असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
शनिवारी (ता.26) माधव सभागृहात मनसेच्या वतीने आयोजीत कार्यक्रमाच्या वेळी ते पत्रकाराशी बोलत होते. मत्स्यवसाय तंत्रज्ञान महाविद्यालय ही किनारपट्टीच्या विकासाची गरज आहे. स्थानिक गरजा ओळखून विकासाच्या संधी देण्याचे काम राज्याच्या नेतृत्वाचे आहे. पण मुख्यमंत्री हे महाविद्यालय नागपूरला पळवून नेत आहेत.

शासनाच्या सर्व योजना विदर्भात नेऊन पुन्हा फडवणवीस व मूनगुंटीवार स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत असल्याच्या क्लीपींग फीरत आहेत. या संकुचित विचाराने महाराष्ट्राचे काय भले होणार याचा विचार येत्या निवडणुकीत लोक नक्कीच करतील.पालघरमध्ये भैय्ये लोकांच्या मतासाठी भाजप नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मूख्यमंत्री आदीत्यनाथांना बोलावले. शेवटी मोदी हे एकच नाव वापरून व खोट बोलून किती दिवस चालणार. मोदी व शहा यांना निवडणुकीपूर्वी लोक ओळखत होते का हा प्रश्‍न आहे.
म्हणून आता पाहण्यामध्ये भाजपच्या जागा शंभरने कमी होणार हे स्पष्ट पणे मांडले जात आहे.जागा वाढवण्यासाठी भाजपावाले दंगली घडवून आणतील. पण गूजराथमध्ये पैसा व सत्ता असून काय झाले हे उदाहरण समोर आहेच.
पर्यायी नेतृव नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मनमोहनसींगापासून  नरसींहाराव, देवगौडा पंतप्रधान होतील याचा अंदाज कूणालाच नव्हता.त्यामूळे पर्यायी नेतृत्व समोर येतच असते.
ईव्हीएम मशीनबद्दल पहिला आक्षेप आपण नोंदवला होता. शेवटी बटन दाबण्याची प्रक्रिया चुकू शकते. एका पक्षासमोरील बटन दाबल्यानंतर भाजपला मत नोंदवले जाते याचे क्लीपींग व्हायरल झाल्यावर आणखी काय पुरावे हवेत. काही वर्षापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ईव्हीएम मशीनबद्दल भरपुर टीका केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत भांडण गेले होते. आता तेच किरीट सोमय्या सत्ता आल्यापासून कुठे गायब आहेत असा टोला त्यांनी लगावला.या वेळी श्री.ठाकरे यांच्या समवेत पक्षाचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई व पदाधिकारी उपस्थित होते.
येत्या  निवडणुकीत भाजपच्या शंभर जागा कमी होणार. गुजरातमध्ये सत्ता आणि पैसा असून काय झाले हे सर्वाना माहीत आहे. शेवटी मोदी या एकाच नावावर लोकांना किती दिवस फसवणार.या पूर्वी देशाच्या राजकारणात मोदी व शहा यांचे नाव तरी होते का हे लोकांना समजते. त्यामूळे हे लोक पर्यायी नेतृत्व दिल्या शिवाय राहणार नाहीत,असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.
ईव्हीएम मशीनच्या खोटेपणाबद्दल भाजपचे किरीट सोमय्या किती तरी वर्ष ओरडत होते. अगदी सर्वोच्च न्यायालयात भांडण पोहोचले होते.आता किरीट सोमय्या अचानक सत्ता आल्यापासून ईव्हीएम बद्दल गप्प का बसले आहेत असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.