बुधवार, 30 जनवरी 2013

आपण सारे भाऊ भाऊ?

आपण सारे भाऊ भाऊ?
 

-
Thursday, January 31, 2013 AT 01:00 AM (IST)
सत्तेचा वाटा मिळावा म्हणून उद्धव यांच्या "आवतणा'चा विचार करून, राज यांनी काही पावलं उचलली तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखं काही नाही; पण असा निर्णय त्यांनी घेतलाच, तर त्यातून आणखी कठीण प्रश्‍न निर्माण होतील.

शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून पुन्हा एकदा संघटनेची सूत्रं आपल्या हाती घेतल्यानंतर लगोलग "सामना' या मुखपत्राला दिलेली मुलाखत बघता उद्धव ठाकरे यांनी थेट वडलांच्या पावलावर पाऊल टाकून वागायचं ठरवलेलं दिसतं! अन्यथा, त्यांनी अप्रत्यक्षरीत्या राज ठाकरे यांना "आवतण' दिलंच नसतं. अर्थात, आता हे आवतण आहे की नाही, याची चर्चा मीडियामध्ये प्रदीर्घ काळ सुरू राहील! पण बाळासाहेबांची नेमकी हीच पद्धत होती. "सामना'मध्ये मुलाखत द्यायची आणि त्यात वादग्रस्त विधानं करून जनमानसात गोंधळ उडवून द्यायचा, त्याच वेळी प्रसारमाध्यमांनाही मोठं खाद्य पुरवायचं आणि सारा प्रकाशझोत आपल्यावरच राहील, अशी काळजी घ्यायची... हे सारं उद्धव यांनी थेट त्याच पद्धतीनं केलं आहे.


अर्थात, शिवसैनिकांसाठी त्या पलीकडचा एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे उद्धव-राज पुढच्या निवडणुकीआधी एकत्र येतील काय? बाळासाहेबांच्या निधनापूर्वी आणि त्यांच्या अंत्ययात्रेला लोटलेल्या अलोट गर्दीनंतर हाच प्रश्‍न चर्चेत होता. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा तपशिलात जाऊन विचार केला, तर आकडे असं सांगतात की राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेचं बरंच नुकसान केलं. एवढंच नव्हे, तर राज यांची सेना मैदानात नसती, तर कदाचित शिवसेना-भाजप युतीच्या हाती राज्याची सत्ता जाण्याची शक्‍यताही निर्माण झाली असती. बाळासाहेबांच्या निधनानंतर केवळ शिवसैनिकच नव्हे, तर मराठी माणसाच्या अन्य गट-समूहांमध्येही एका वेगळ्या प्रकारानं विचार सुरू झाला आहे, हे कोणी नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या आजारपणाच्या शेवटच्या काळात आणि विशेषत: त्यांच्या निधनानंतर, अंत्ययात्रेच्या वेळी "मातोश्री'कडून राज यांच्या झालेल्या अवहेलनेच्या आणि अवमानाच्या ज्या काही बातम्या आल्या होत्या, त्या बघितल्या तरीही आता बदलत्या परिस्थितीत राज नव्याने काही विचार करणारच नाहीत, असं समजण्याचं काहीच कारण नाही.

पण यामुळे आता लगोलग "मनसे' विसर्जित करून राज हे शिवसेनेत दाखल होतील आणि पुन्हा तीच तथाकथित अभेद्य शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा "फोर्स' म्हणून उभी राहील, असं तर्कट लढवून कोणी राजकारणाचा विचार करू लागेल, तर ते मूर्खांच्या नंदनवनातच वावरत आहेत, असंच म्हणावं लागेल. तरीही या संदर्भात महाराष्ट्रातलंच एक ठळक उदाहरण देता येतं. सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार यांनी 1999 मध्ये कॉंग्रेसमधून हकालपट्टी ओढवून घेतली. पुढे विधानसभेची निवडणूक त्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात लढवली; पण कोणाचंच सरकार बनू शकलं नाही. तेव्हा अनेक पवारविरोधक, आता ते शिवसेना-भाजप युतीशी हातमिळवणी करतील, अशी भाकितं करत होते; पण पवारांची सेक्‍युलॅरिझमवरची श्रद्धा अधिक होती. त्यांनी कॉंग्रेसबरोबर जाणं पसंत केलं आणि सरकार बनवलं. एवढंच नव्हे, तर पुढच्या निवडणुका या दोन कॉंग्रेसनी जागावाटप करून लढवल्या. याचा अर्थ ते दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन झाले, असा लावायचा का? उलट आजमितीला हेच सत्ताधारी आघाडीतील दोन पक्ष खऱ्या अर्थानं एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या या जाहीर आवतणानंतर भाजप राज यांच्याशी बोलणी करण्याबाबत नव्यानं पुढाकार घेऊ शकतो. नव्यानं म्हणायचं कारण एवढंच, की राजसेनेनं युतीत यायला हवं, ही भाजपची जुनी भूमिका आहे. गोपीनाथ मुंडे यांनी तर राज युतीत असतील, असं फार पूर्वीच जाहीर केलं आहे. पण राज यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं आजवर टाळलं आहे. उद्धव आणि राज, दोघांनाही आपल्या मर्यादा ठाऊक आहेत. शिवाय, आपण कोणत्याही कॉंग्रेसबरोबर कधीही जाऊ शकत नाही, हे राज यांना ठाऊक आहे. त्यामुळे सत्तेचा वाटा मिळावा म्हणून उद्धव यांच्या या "आवतणा'चा विचार करून, राज यांनी काही पावलं उचलली तर त्यात आश्‍चर्य वाटण्याजोगं काहीच नसेल. पण असा काही निर्णय त्यांनी घेतलाच, तर त्यातून आणखी अनेक कठीण आणि सहजासहजी न सुटणारे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात, हेही लक्षात घ्यावं लागेल.

आज युतीतील जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला विधानसभेच्या 171 जागा आल्या आहेत, तर भाजपकडे 117 आहेत. दोन वर्षांपूर्वी या युतीत रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष दाखल झाला आहे. त्यात राज आलेच तर त्यांच्यासाठी किती जागा सोडायच्या, त्या नेमक्‍या कोणी म्हणजे शिवसेना व भाजप यांनी किती सोडायच्या... त्यासाठी नेमक्‍या कोणत्या निवडणुकीतील मतांचे आकडे हे आधार धरायचे, हे सारं अत्यंत कठीण आणि कोणत्याही "गाईड'मध्ये उत्तरं नसलेले प्रश्‍न आहेत. अर्थात, त्याची उत्तरं आपल्याला द्यायची नाहीत, हे एक बरं आहे. ती ज्याला द्यायची आहेत, तो देईल की "वेट ऍण्ड वॉच'चा आपला जुनाच डाव पुढे सुरू ठेवील, हाच लाखमोलाचा प्रश्‍न आहे. पण एक मात्र खरं, की आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातही राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली आहे



राज-उद्धवना मुंडेंची एकीकरणाची हाक

राज-उद्धवना मुंडेंची एकीकरणाची हाक

- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, January 31, 2013 AT 03:30 AM (IST)

मुंबई - बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले आहे.

शिवसेनेशी पुन्हा संबंध प्रस्थापित करायचे असतील, तर राज यांनी तसा निर्णय घ्यावा, असे आवाहन उद्धव यांनी केले असतानाच मुंडे यांनी पुन्हा एकदा एकीकरणाची हाक दिली आहे. महाराष्ट्रात सत्तेत परतायचे असेल, तर भाजप-सेना युतीत तिसरा भिडू हवा, असे विधान गोपीनाथ मुंडे यांनी यापूर्वी केले होते. आज पुन्हा एकदा त्यांनी या विधानाचा पुनरुच्चार केला.

उद्धव आणि राज यांच्या वादात भाजपने मध्यस्थाची भूमिका बजावावी, असे मुंडे यांचे प्रारंभापासून प्रयत्न होते. आज एका हाताने टाळी वाजेल कशी, असा प्रश्‍न उद्धव यांनी करताच भाजपनेते पुन्हा एकदा कामाला लागले. राज या प्रयत्नांना प्रतिसाद देतात काय, याकडे भाजपचे लक्ष लागले आहे.

बाळासाहेबांचे आजारपण आणि उद्धव यांच्यावर करावे लागलेले उपचार या दरम्यान दोन्ही भाऊ एकमेकांशी बोलू लागले हीदेखील एखाद्या मोठ्या प्रक्रियेची सुरवात असू शकते, असे मत भाजपत व्यक्‍त केले जाते आहे. राज यांच्याशी माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे जवळचे संबंध आहेत. आज दोन्ही भावांनी एकत्र येणे अशक्‍य वाटत असले, तरी भाजप यासंदर्भात पावले उचलू शकेल, असा विश्‍वास या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विशेषत: मुंडे यांना आहे.

राज ठाकरेंशी चर्चा करण्याची उद्धव यांची तयारी

राज ठाकरेंशी चर्चा करण्याची उद्धव यांची तयारी
 

- वृत्तसंस्था
Wednesday, January 30, 2013 AT 10:24 AM (IST)
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.

'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध झाली असून, या मुलाखतीतून राज ठाकरेंशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. मुलाखतीत टाळी एका हाताने वाजत नाही असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले, की शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकतात का? या प्रश्‍नाचे उत्तर तुम्ही फक्त माझ्याकडेच कसे मागू शकता. मी उत्तर द्यायला तयार आहे, पण उत्तरच हवे असेल तर त्यासाठी तुम्ही दोघांना एकत्र आणून समोरासमोर बसविले पाहिजे. मग, तुम्ही हा प्रश्‍न दोघांना विचारला तर बरे होईल. या प्रश्‍नाचे उत्तर दोन बाजूंवरती अवलंबून आहे. एका बाजूवर नाही. शिवसेनेसोबत कोणी मनापासून येणार असेल तर त्यांचे मी स्वागतच करेन.

शुक्रवार, 25 जनवरी 2013

विधानसभेच्या 110 जागा "मनसे' जिंकणार

विधानसभेच्या 110 जागा "मनसे' जिंकणार

-
Friday, January 25, 2013 AT 01:15 AM (IST)
देवरूख- ""मनसेने राज्य सरकारची 35 कोटींची जागा वाचवली. त्याबदल्यात त्यांनी आम्हाला अटकेचे बक्षीस दिले. आता त्यांचे दिवस भरले आहेत. चालू विधानसभेत आमची संख्या 11 वर आली असली तरी येत्या विधानसभेत आम्ही हाच आकडा 110 नेणारच. त्यासाठी कार्यकर्त्यांनो जीवाचे रान करा आणि राजसाहेबांच्या स्वप्नातील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी सज्ज व्हा'', असे आवाहन "मनसे'चे ज्येष्ठ आमदार शिशिर शिंदे यांनी येथे केले.

संगमेश्‍वर तालुका "मनसे'च्या वतीने शहरातील माटे-भोजने सभागृहात आयोजित रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसेचे दादरचे आमदार नितीन सरदेसाई, पक्षाचे सरचिटणीस जयप्रकाश बाविसकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख संजय नाईक, कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिर्के, खेडच्या नगराध्यक्षा गौरी पुळेकर, उपनगराध्यक्ष किशोर चिखले, संगमेश्‍वरचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

खचाखच भरलेल्या सभागृहाचा जोश पाहून सुरवातीपासूनच शिंदे यांनी आक्रमक भाषण केले. गटबाजी करणे, एकमेकांच्या तंगड्या ओढणे ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मक्‍तेदारी आहे. ती त्यांच्याकडेच राहू दे. आपल्या कार्यकर्त्यांनी हे न करता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून काम करा. मध्यंतरी आलेली मरगळ आज दूर झाली आहे, हेच अफाट उपस्थितीचे लक्षण आहे. जनतेच्या घरापर्यंत पोहचा,त्यांचे प्रश्‍न मांडा, ते सोडविण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरा, प्रशासनाशी हुज्जत घाला, ही जनताच आपली शक्‍ती आणि संपत्ती असल्याचे प्रत्येकाने मनावर ठसवा. येत्या विधानसभेत आमदारांची सेंच्युरी मारण्यासाठीची सुरवात आपण देवरुखातून करत आहोत. मुंबईत परप्रांतीयांचे आक्रमण कळीचा मुद्दा बनला आहे.

कोकणातही आता केरळी घुसू लागले आहेत. त्यांची दादागिरी मोडून काढा आणि त्यांना कोकणातून कायमचे हाकलून द्या. कॉंग्रेसच्या राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे दिल्लीतील बलात्कार प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या पक्षाचा चिटणीस दिग्विजय सिंग हा अतिरेक्‍यांना साहेब म्हणतो. अशांना चपलांचा मार द्या, प्रत्येकवेळी मारझोड, जाळपोळ करणे गरजेचे नाही. जनतेच्या मनात शिरून त्यांच्या मनात, घरात आपले पक्‍के स्थान निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.

सरचिटणीस जयप्रकाश बाविसकर यांनीही संपर्कप्रमुख संजय नाईक यांच्या कामाचे कौतुक करून यापूर्वी खेड झाले आता देवरूख नगरपंचायतीवर "मनसे'चा चौरंगी झेंडा फडकवायचाच असा निर्धार करण्याचे आवाहन केले. राज्याची आघाडी सरकारने पुरती वाट लावली आहे. त्यांची मान आता शरमेने खाली जाईल, असा देदिप्यमान विजय मिळवायचा असेल तर "मनसे'च्या प्रत्येक कार्यकर्त्याने आजपासून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनीही खेडनंतर देवरूख नगरपंचायतीवर "मनसे'चा झेंडा फडकून राज्यातील दुसरी नगरपंचायत "मनसे'कडे येण्याचा विक्रम घडणार असल्याचे आजच्या उपस्थितीवरून स्पष्ट झाल्याचे सांगितले. यापुढे हलगर्जीपणा चालणार नाही तर प्रत्येकाने काम करा असा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा "मनसे'तर्फे खेडच्या नगराध्यक्ष गौरी पुळेकर, तसेच उपनगराध्यक्ष चिखले यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यासाठी परिश्रम घेणारे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमातंर्गत संगमेश्‍वर तालुक्‍यातील काटवली, विघ्रवली, सायले, चोरवणे, साखरपा भागातील तसेच लांजा तालुक्‍यातील शेकडो कार्यकर्त्यांनी "मनसे'त जाहीर प्रवेश केला. मेळाव्यानंतर संगमेश्‍वर-लांजा-राजापूर, संगमेश्‍वर-चिपळूण, संगमेश्‍वर-रत्नागिरी अशा तीन विधानसभा मतदारसंघाप्रमाणे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. मेळाव्याला जिल्हाभरातून सुमारे 3 हजार मनसैनिक उपस्थित होते

बुधवार, 16 जनवरी 2013

मोर्चाचा प्रयत्न केल्यास मनसे ताकद दाखवेल- राज

मोर्चाचा प्रयत्न केल्यास मनसे ताकद दाखवेल- राज

- सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, January 16, 2013 AT 12:45 AM (IST)

मुंबई - अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एसीपी वसंत ढोबळे यांच्यावर बदलीची कारवाई का केली असा प्रश्‍न करतानाच फेरीवाल्यांनी त्यांच्या विरोधातील कारवाईसाठी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यास मनसे आपली ताकद दाखवेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत फेरीवाला धोरण राबविताना मराठी फेरीवाल्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करतानाच अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कृष्णकुंज येथे आज पत्रकार परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करणे कठीण झाल्याची टीका राज यांनी केली. अनधिकृत फेरीवाल्यांना हटविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. फेरीवाल्यांच्या मतांवर राजकारण करणाऱ्या कॉंग्रेसचे आमदार कृपाशंकरसिंह यांच्यामुळेच फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही. परप्रांतीय फेरीवाले मराठी फेरीवाल्यांवर दादागिरी करतात. अनधिकृत गोष्टी विरोधात पक्षभेद विसरुन सर्व राजकीय पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे. फेरीवाले धोरण राबविताना शहरातील लोकांना त्यामध्ये सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन करतानाच उद्या दोन लाख फेरीवाल्यांना तुम्ही बसविणार कोठे असा प्रश्‍न राज यांनी उपस्थित केला.

भाजप दुतोंडी
हुतात्मा हेमराज यांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी कॉंग्रेस सरकारवर टीका केली आहे. पण याच भाजपच्या काळात पाकिस्तानमध्ये जाणारी समझोता एक्‍सप्रेस सुरु करण्यात आली होती. तुम्हाला कोणी सांगितले होते की, अशी गाडी सुरु करायला असा प्रश्‍न राज यांनी भाजपच्या नेतृत्वाला विचारला आहे. आधी अशा बसगाड्या सुरु करायच्या आणि नंतर पाकिस्तानच्या नावाने आकांडतांडव करायचे अशी नीती भाजपची असल्याची टीका राज यांनी केली.



सोमवार, 14 जनवरी 2013

गैरव्यवहाराविरोधात बार उडविणार- राज ठाकरे

गैरव्यवहाराविरोधात बार उडविणार- राज ठाकरे
  <    

- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, January 15, 2013 AT 02:45 AM (IST)
मुंबई- "सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या माध्यमातून माझ्या हातात दारुगोळा दिला आहे. त्याचा बार 10 फेब्रुवारीपासून उडवू'', अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. राज्याचा दौरा फेब्रुवारीत सुरू केल्यावर 10 जिल्ह्यांत सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कांदिवलीत प्रवीण दरेकर यांच्या आमदार निधीतून होणाऱ्या विकासकामांचा आरंभ आज राज ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी राज यांनी दौऱ्याची घोषणा केली. ""आघाडी सरकारच्या राजवटीत भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. गैरव्यवहारांची रांगच लागली आहे. हे गैरव्यवहार नागरिकांपुढे मांडण्यासाठी दौरा करणार आहे. हा दौरा मत मागण्यासाठी नसून मत मांडण्यासाठी असेल'', असे ते म्हणाले. ""मी बरेच दिवस बोललो नाही, पण आता बोलणार आहे. त्याची सुरुवात पुढील महिन्यात होईल. तुमचे आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहावेत'', असे आवाहनही यावेळी राज यांनी केले.



गुरुवार, 10 जनवरी 2013

नववर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव व राज 'ऍक्‍शन'मध्ये

नववर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव व राज 'ऍक्‍शन'मध्ये

राजेश मोरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, January 11, 2013 AT 02:45 AM (IST)
मुंबई- शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच अधिक जोमदारपणे पक्षात आक्रमक झाले आहेत. उद्धव यांनी पक्षशिस्त धाब्यावर बसविण्याचा ठपका ठेवून नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला आहे; तर राज यांनी रस्ते आणि आस्थापना संघटनेनंतर मनसेच्या नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बरखास्तीचा मार्ग दाखविला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत कोणत्या पद्धतीने निर्णय होणार, याकडे शिवसैनिकांसह इतरांचेही लक्ष आहे. कोकणातील शिवसेनेचा एक चेहरा असलेले परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, पण उपरकर यांनी जाहीरपणे अद्याप त्यांची भूमिका मांडली नसल्याने ते शिवसेनेतच असल्याचे मानले जात आहे. तसेच आज शिवसेनाभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत विधिमंडळ नेते सुभाष देसाई यांनी उपरकर यांच्याशी आमचा संवाद असल्याने हा विषय तूर्त थांबविल्याचे संकेत दिले.

नाशिकमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनी नाशिकच्या जिल्हाप्रमुख आणि महापालिकेतील नेत्यांसह पक्षनेतृत्वाबद्दलही आक्रमक भाषा वापरल्याची माहिती "मातोश्री'वर पोहोचली होती. नाशिकमध्ये मनसेचा वारू चौफेर उधळून थेट महापौरपद मनसेकडे गेल्याने आधीच शिवसेनेत चिंतेचे वातावरण असताना या गटातटाचा फटका पुढे ऐनवेळी बसू नये यासाठी या विषयाचा थेट "निक्काल' लावून भविष्यात मीडियाच्या साक्षीने पक्षनेतृत्वाला लक्ष्य केल्यास त्यांना याच मार्गाने जावे लागणार असल्याचा इशारा यानिमित्ताने उद्धव यांनी पक्षातील नेत्यांना दिल्याचे मानले जात आहे.

राज ठाकरे यांनीही पक्षबांधणीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. फेब्रुवारीत राज्याचा दौरा सुरू करण्याबरोबरच त्यांनी पक्षामधील वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखविला आहे. एकीकडे हर्षवर्धन जाधव यांनी पक्षनेतृत्वावर थेट टीका करीत मनसेचा राजीनामा दिल्यावरही त्याची दखल राज यांनी घेतली नाही. त्याच वेळी पक्षांतर्गत तक्रारीची दखल घेऊन रस्ते आस्थापनेनंतर वाहतूक सेनेच्या अध्यक्षांचा अपवाद सोडून इतरांना घरचा रस्ता दाखविला आहे. तसेच यापुढील कोणतीही नेमणूक परस्पर न करण्याचा आदेश दिला आहे. काही दिवस शिवसेनेसह मनसेच्या गोटातही शांतता होती, पण आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही पक्षांनी नवी सुरुवात पक्षातून आक्रमकपणे केल्याचे दिसते आहे.