मंगलवार, 24 अक्तूबर 2017

चार दिवस संप करून ही परिस्थिती बदलणार नसेल तर त्याला काय अर्थ? : राज ठाकरे

कल्याणः कामगारांनी एकाच ठिकाणी ठाम राहिले पाहिजे एकदा इकडे सत्ता आली की तिकडे, असेच वागलात तर जो तो तुम्हाला लूटेल. चार दिवस संप करून ही परिस्थिती बदलणार नसेल तर त्याला काय अर्थ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला केला. यावेळी एसटी कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन ही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
सोमवार (ता. 23) महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने एसटी कामगारांच्या संपाच्या पाश्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईच्या दादर मधील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. संपात सहभागी झालेल्या एसटी कामगारांवर होणारी संभाव्य कारवाई संदर्भात एसटी प्रशासनाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत चर्चा करू, वेळप्रसंगी पत्र ही देऊ असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी दिले. यावेळी एसटी कामगारांच्या संघटनाबाबत ही ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. कामगारांनी कुठे तरी एकाच जागेवर ठाम राहण्याची गरज आहे. अन्याथा प्रत्येकाकडून असेच लुटले जाल, असा टोला लगावत पुढे म्हणाले की, 'सतत घरंगळत जायला एकदा इकडे सत्ता आली की तिकडे असेच राहणार असाल तर लुटले जाल. आता ही तेच होईल चार दिवसाचा संप करूनही परिस्थिती बदलणार नसेल तर मग काय अर्थ आहे.'

परिवहनच्या संघटनात्मक बदलांकडे ही आपण जातीने लक्ष घालू, असे आश्वासन ठाकरे यांनी शिष्टमंडळास दिले. या प्रसंगी सरचिटणीस मोहन चावरे, कार्याध्यक्ष विकास अकलेकर, हरी माळी, ठाणे विभागाचे सचिव महादेव मस्के, विजय नांगरे आणि विभाग कल्याण, धुळे, नाशिक, रायगड, बुलढाणा, रत्नागिरी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें