गुरुवार, 26 अक्तूबर 2017

याच 'पप्पू'ला घाबरून मोदी गुजरातला का जाताहेत- राज ठाकरे

मुंबई : भाजपच्या नेत्यांनी आधीपासून राहुल गांधींना लक्ष्य करून 'पप्पू पप्पू' म्हणून चिडवले. तेच राहुल गांधी आज गुजरातमध्ये जाऊन 'झप्पू' होत आहेत. राहुल यांच्या सभेला लोकांची जेवढी गर्दी होत आहे त्याला घाबरून मोदी नऊ-नऊ वेळा गुजरातमध्ये जात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
ज्या राहुल गांधींना तुम्ही आतापर्यंत अपमानित करत होता. तीच व्यक्ती आज गुजरातमध्ये जात आहे तेव्हा तुम्हाला एवढी भीती का वाटत आहे, असा राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. 
इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्यानंतर विरोधी पक्षाचे सरकार आले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत जी विरोधी पक्षांची सरकारे येतात त्यांनी शत्रूंची गरजच पडत नाही. ते स्वतःसाठीच खड्डा खोदून ठेवतात. तसेच हे मोदी सरकार करत आहे. राजीव गांधींच्या नंतर या देशात पहिल्यांदाच एवढे मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळवून केंद्रातील सरकार सत्तेत आले आहे. मात्र, तरीही नोटाबंदी आणि जीएसटीसारखे जीवघेणे निर्णय मोदी सरकार घेत आहे, अशा शब्दांत राज यांनी मोदी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.  
राज ठाकरे म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री असताना देशाला हलाखीच्या आर्थिक स्थितीतून सावरले. मात्र, मोदी सरकार पुन्हा आर्थिक स्थिती बिघडवत आहे. 
EVM यंत्रांमध्ये गडबड
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कसा फेरफार केला जातो याचे प्रात्यक्षिक देण्यास तयार होते. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांना प्रात्यक्षिक देण्याची संधीच दिली नाही. किरीट सोमय्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. मग एवढ्या वर्षांत कधीच भाजपला एवढी मते मिळाली नाहीत, आणि आता कशी मिळत आहेत. याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. 
परतीचा पाऊस
सोशल मीडियावर मोदी सरकारविरोधात टीका होत असल्याबद्दल बोलताना राज म्हणाले, सोशल मीडिया वापरून मोदी सरकार सत्तेत आले. त्यावेळी सोशल मीडियावर काहीही केलं तरी चालत होतं. आता तोच सोशल मीडिया आता त्यांच्याविरोधात जात आहे तेव्हा मात्र सरकारविरोधात कोणी लिहिले तर त्याच्याविरोधात लगेच गुन्हे दाखल केले जातात. मला मोदींनी गुजरातमधील केवळ ठराविक गोष्टी दाखवल्या, सांगितल्या. त्यामुळे तेच देशाचा विकास करू शकतील असे सुरवातीला मला वाटले. मात्र, आता तीन वर्षे झाली तरी ते केवळ खोटंच बोलत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें