मल्टिप्लेक्ससाठी 'मनसे'चे आंदोलन योग्यच
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 18, 2010 AT 12:15 AM (IST)
कोल्हापूर - मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध होत नाहीत. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शनाचा नियम असताना तो पाळला जात नाही आणि मुंबईसारख्या शहरात तर मराठी चित्रपटांची पोस्टर्स लावण्यासाठी परवानगी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाची घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे स्पष्ट मत अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केले.
"पुन्हा सही रे सही' नाटकाच्या येथील पहिल्या प्रयोगासाठी श्री. जाधव काल येथे आले होते. त्यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने त्यांच्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम झाला. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे विशेष सहकार्य लाभले.
मराठी नाटक, चित्रपट, कोल्हापूरची चित्रनगरी अशा विविध अंगांनी हा संवाद रंगला. श्री. जाधव म्हणाले, ""सही रे सही नाटकाला रसिकांनी डोक्यावर घेतले. त्याच्याही पेक्षा "पुन्हा सही रे सही' नाटक रसिकांना अधिक भावेल. कारण हे नाटक अतिशय वेगाने पुढे सरकते. चार व्यक्तिरेखा साकारताना टाईम मॅनेजमेंट येथे महत्त्वाची आहे. त्यामुळे काही क्षणात एकापाठोपाठ एक व्यक्तिरेखा नाटकात सादर होतात. कोल्हापूरच्या चित्रनगरीसाठी नेहमीच पाठपुरावा केला. त्याचवेळी वृद्ध कलाकार, तंत्रज्ञांसाठी आश्रम आणि एक छोटा स्टुडिओ साकारण्यासाठी एक एकर जागेसाठी मागणी केली आहे. मात्र "सरकारी काम आणि...' असा अनुभव येत आहे. कोल्हापुरात चित्रपटांची निर्मिती वाढावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.''
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, सीमा जोशी, रणजित पाटील, मनोहर कुईगडे, माजी अध्यक्ष प्रफुल्ल महाजन, प्रा. डॉ. शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें