मराठी चित्रपटांचे खेळ : शिवसेना आणि मनसेत अहमहमिका! |
चित्रपटगृहांमध्ये वर्षभरात किमान ५०० खेळ मराठी चित्रपटांचे दाखविले गेलेच पाहिजेत असा शिवसेनेचा आग्रह असून गेल्या तीन महिन्यांपासून यासाठी शिवसेनेची महाराष्ट्र सिने आणि टेलिव्हिजन सेना न्यायालयीन लढाई लढत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. न्यायालय उद्या याबाबत आपला निर्णय देणार आहे.
मराठी रसिकांना मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता यावा आणि मराठी निर्मात्यांना आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून व्यावसायिक नफा मिळविता यावा, अन्य राज्यांप्रमाणे राज्यातील चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखविणे बंधनकारक करण्यात यावे, यासाठी जून २०१० पासून लढाई सुरू आहे.
केवळ प्रसिद्धीचे तंत्र अवलंबून आणि पत्रव्यवहार करून हा विषय सुटणारा नसल्याने यासाठी न्यायालयीन मार्गाने यश मिळवावे लागेल, याची शिवसेनेला जाणीव आहे. त्यामुळेच या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेने हा विषय न्यायालयात उपस्थित केला आहे. आता या बाबत कोणाला न्यायालयीन मार्ग अवलंबिण्याची उपरती झाली असेल तर ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी उपहासाने म्हटले आहे.हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांनाही समान न्याय मिळावा आणि चित्रपटगृह मालकांनी मराठी चित्रपटांसाठी भाडय़ात पूर्णपणे सूट द्यावी अशी मागणीही शिवसेना करणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें