राज ठाकरे यांनी अनुभवला ‘डोंबिवली फास्ट’चा प्रवास |
चार फुटाचा अरुंद फलाट, लोकलसाठी प्रवाशांची गर्दी, पोलीस बंदोबस्त, बघ्यांनी तीन-चार-पाच क्रमांकाच्या फलाटावर केलेली गर्दी. असे वातावरण आज दुपारी डोंबिवली रेल्वे स्थानकात होते. निमित्त होते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकलने प्रवास करणार असल्याचे.डोंबिवली रेल्वे स्थानकात अचानक पोलीस बंदोबस्त वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचा सूर उमटू लागला. फलाटावर कोण येणार म्हणून चर्चा सुरू झाली. प्रवाशांची ही उत्सुकता ताणली असतानाच आपल्या लवाजम्यासह डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या अरुंद फलाटावरून राज ठाकरे प्रथम श्रेणी डबा जेथे थांबतो, त्या मधल्या जागेत हजर झाले. कल्याणहून डोंबिवली रेल्वे स्थानकात येणारी २ वाजून ४० मिनिटांची लोकल. या जलदगती लोकलने ठाकरे दादरला रवाना होणार होते. यासाठी कार्यकर्त्यांनी प्रथम श्रेणी प्रवासाची पन्नास तिकिटे काढली. मगच ठाकरे यांनी फलाटावर प्रवेश केला.
लोकलच्या मधल्या भागातील प्रथम श्रेणी डब्याने राज ठाकरे प्रवास करणार असल्याने कल्याणलाच मनसे कार्यकर्त्यांनी या डब्यात कोणाला चढू दिले नाही. लोकल डोंबिवली स्थानकात येईपर्यंत समोरील फलाट क्रमांक चारवर तरुणांची मोठय़ा संख्येने गर्दी जमा झाली. त्यात प्रवासी सहभागी झाले. राज ठाकरे यांचे मोबाईलवरून फोटो काढण्यासाठी चढाओढ लागली. काही तरुण फलाटावरील खांबावर चढले तर काही फलाटाच्या किनाऱ्याला येऊन वेगळ्या पोझचे फोटो घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना ठाकरे आपल्या हाताने अरे मागे व्हा म्हणून खुणा करत होते. मध्येच एक मोबाईल आला. त्याला त्यांनी हसून उत्तर दिले. स्वारी आज एकदम खुशीत होती, असे एकूण वातावरणावरून दिसून येत होते. महिलांच्या डब्याजवळ मात्र या वाढत्या गर्दीने नाराजी होती.
जलद लोकल फलाटात येताच प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रथम मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी चढले. ठाकरे यांना बसण्यासाठी जागा ठेवण्यात आली. मग हळूच राज ठाकरे चढले. तोपर्यंत एकाही प्रवाशाने या डब्यात चढण्याचे धाडस केले नाही. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना, उतरा उतरा म्हणत पिटाळण्यात आले. त्यामुळे ते बिचारे दुसऱ्या डब्यातून प्रथम श्रेणीचा पास असून लटकत प्रवास करू लागले. अखेर लोकल सुटताना तरुणाईला ठाकरे यांनी गर्दीतून डोकावून टाटा केला आणि त्यावेळी एकच जल्लोष झाला.
‘‘२६ वषार्ंनंतर प्रथमच रेल्वेने प्रवास करतोय. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हार्बर मार्गाने वांद्रे ते शिवाजी टर्मिनस असा प्रवास केला आहे. आता रेल्वे प्रवास करताना अजून तरी रेल्वे ट्रॅकवर आहे हे दिसले,’’ अशी मार्मिक टिपण्णी ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलताना केली.
दोन वर्षे बसने पण प्रवास केला आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर असतो. वाहतुकीचा कोठे प्रश्न निर्माण होत नाही, त्यामुळे बरा वाटतो. बाहेरचे लोंढे वाढत आहेत, त्या प्रमाणात गर्दीही वाढत आहे. लोकल वाढत आहेत तरी लोंढय़ांमुळे गर्दी वाढतच आहे, असेही ते म्हणाले.
माझ्या खिशात पैसे असल्याने मला एटीएममध्ये जाऊन पैसे काढून तिकीट काढण्याची आवश्यकता भासली नाही, अशी टिपण्णीही त्यांनी राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळून केली. या प्रवासात त्यांच्यासोबत आ. नितीन सरदेसाई, आ. बाळा नांदगावकर होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें