...आता कोण? (हेमंत देसाई)
हेमंत देसाई hemant.desai001@gmail.com
Sunday, November 25, 2012 AT 03:30 AM (IST)
शिवसेनेचं
नेतृत्व उद्धव ठाकरे हेच करतील व ते कदाचित पक्षाच्या ध्येय-धोरणांत
आमूलाग्र परिवर्तन आणतील. 2014 पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला
पसारा वाढवू पाहील. निवडणुकीत दोन्ही पक्ष जागावाटपात समझोता करतील. या
निवडणुकांत समजा दोघांपैकी एकजण अगदीच फिका पडला, तर एकत्रीकरणाची
प्रक्रिया कदाचित गतिमान होईल. अशा वेळी "मर्ज्ड' पक्षात कार्याध्यक्षपदंही
दोन निर्माण करता येतील. उद्धव व राज ठाकरे यांनी आपापला "इगो' विसरून
हस्तांदोलन केलं, तर महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलेल. सत्तेशिवाय आपापली
पक्षांतर्गत सत्ता गोंजारत बसायचं की व्यक्तिगत त्याग करून एकत्रित
पक्षाची सत्ता राज्यात आणायची, याचा निर्णय शेवटी या दोघांनीच घ्यायचा आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळं केवळ एक
कुटुंब व पक्षच पोरका झाला नसून, आपली काळजी वाहणारा एक ज्येष्ठ माणूस
हरपला असल्याची सार्वत्रिक भावना मराठी समाजात निर्माण झाली आहे.
बाळासाहेबांचा करिश्मा सर्वांनाच ठाऊक असला, तरी गर्दीचा इतका महापूर
येईल, याची कल्पना कट्टर ठाकरेसमर्थकांनाही नव्हती. दक्षिणेत अण्णादुराई,
एम. जी. रामचंद्रन, राजकुमार आदींच्या निधनानंतर छाती पिटत, धाय मोकलून
आक्रोश करणारे लोक आपण पाहिलेले आहेत. तसेच एरवी रांगडे दिसणारे हजारो
कार्यकर्ते शिवसेनाप्रमुखांच्या वियोगामुळे ढसढसा रडत होते. शिवसेनेच्या
कट्टर टीकाकारालाही याची दखल घ्यावी लागेल.
बंद पडत असलेल्या
मुंबईतल्या कापडगिरण्या, विस्कटलेली कम्युनिस्ट चळवळ आणि वाढती बेरोजगारी
या पार्श्वभूमीवर शिवसेनेची वाढ झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीनं दारुण
अपेक्षाभंग केला असला, तरी मुंबईवर व महाराष्ट्रावर अन्याय होत आहे, या
भावनेनं मूळ धरलं होतं. या पोकळीतच शिवसेनेची वाढ झाली.
आर्थिक
वंचना होत असल्याच्या वन्हीस फुंकर घालत सांस्कृतिक-भाषिक अस्मिता
जागवण्याचं कार्य बाळासाहेबांनी कधी प्रखरपणे, तर कधी "मार्मिक'तेनं केलं.
यासाठी विजयादशमी अर्थात् दसरा मेळाव्यातून वार्षिक इशारे देऊन आणि
रस्त्यावर राडेबाजी करून, आम्ही कॉंग्रेस वा समाजवाद्यांप्रमाणं मवाळ नाही,
हे दाखवून दिलं जात होतं. महागाईचा वणवा पेटलेला असताना रॉबिनहूड
स्टाइलमध्ये
"धारा' तेलाचं वाटप करणं, वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडणं, व्हॅलेंटाइन
डेच्या विरोधात राडा करणं, 1992-93 मध्ये हिंदूंच्या रक्षणकर्त्याची
भूमिका घेणं, महाआरत्यांचं आयोजन... या सगळ्यांत एक नाट्यमयता होती.
समूहाला खेचून घेणारं धक्कातंत्र, ऍक्शन आणि ड्रामा हे "बाळासाहेबी
राजकारणा'चं आद्य वैशिष्ट्य होय. दिलीपकुमारची अभिनयशैली अमिताभनं अधिक
विकसित करावी, त्याप्रमाणं काकांची शैली पुतण्यानं आणखी पुढं नेली.
द्रविड
मुन्नेत्र कळघम, अकाली दल, तेलुगू देसम, मुलायम सिंगांचा समाजवादी पक्ष,
बिजू जनता दल यांनीही अस्मितावादी राजकारण केलं; परंतु एका टप्प्यानंतर
त्यांनी सर्व समाजघटकांना सामावून घेणारं धोरणही स्वीकारलं; परंतु
शिवसेनेनं आपला पीळ शेवटपर्यंत सोडला नाही. लोकांनी मतं दिली नाहीत, तेव्हा
मराठी माणसाला शिव्या देण्यासही बाळासाहेबांनी मागं-पुढं पाहिलं नाही.
ग्रामपंचायती,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून शिवसेनेची घसरण होत राहिली.
मुंबई-ठाण्याचे गड कसेबसे राखले गेले. बाळासाहेबांशी निष्ठावंत असलेले अनेक
नेते पक्ष सोडून गेले, तरीही बाळासाहेबांचं व्यक्तिगत अपील कमी झालं नाही.
उलट प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बाळासाहेबांच्याच सभा ठेवाव्या
लागल्या वा त्यांची व्हिडिओफित दाखवावी लागली. हे सर्व काय होतं?
करिष्म्या-करिष्म्यातही फरक असतो. बाळासाहेबांचा करिष्मा अधिक "पर्सनल'आहे.
कार्यकर्त्यांबद्दल ममत्व बाळगणारा हा नेता. तो आपल्यासारखाच दिसणारा,
वागणारा, बोलणारा, चिडणारा, डिवचणारा, मारणारा आणि माघार घेणारा...हे
कार्यकर्त्यांना ठाऊक होतं. आपल्या फटकाऱ्यांनी प्रतिपक्षाला घायाळ करणारा
आणि शब्दांनी वचक निर्माण करणारा हा माणूस समाजात कुठलीही प्रतिष्ठा
नसलेल्यांचा नेता होता! बाळासाहेबांच्या राजकारणात, भूमिकांत अनेक विसंगती
असूनही, त्यांना आपल्या राजकारणाबद्दल आत् मविश्वास होता. कम्युनिस्टांशी
दोन हात करायचे असल्यामुळंच शिवसेनेला उजवा पक्ष म्हणायचं एवढंच. अन्यथा
शिवसेनेनं कॉंग्रेसशी दोस्ती केली, आणीबाणीचं समर्थन केलं आणि नंतर जनता
पक्षात विलीन होण्यापर्यंतचाही विचार झाला होता. त्यानंतर भारतीय जनता
पक्षाशी हिंदुत्ववादी संबंध प्रस्थापित करण्यापर्यंत मजल मारण्यात आली.
बाबरी मशीद पाडण्याचं समर्थन आणि त्याच वेळी अयोध्येत पाडलेल्या मशिदीच्या
जागी सार्वजनिक रुग्णालय उभारण्याची सूचना, संयुक्त पुरोगामी आगाडीला
एकीकडं लाखोली आणि त्याच वेळी त्यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला
पाठिंबा, अशी भूमिका घेऊनही शिवसैनिकांचं त्यांच्यावरचं वा संघटनेवरचं
प्रेम तसूभरही कमी झालं नाही, हे विलक्षण आहे.
कोणत्याही विषयाच्या
खोलात न जाता, त्याची सांगोपांग मांडणी न करताही, विशिष्ट आर्थिक-सामाजिक
विचारसरणी नसूनही माणसाळलेल्या या "वाघा'वर शिवसैनिक नसलेलेही लुब्ध होते.
सलमान रश्दी (द मूर्स लास्ट साय्) व खुशवंतसिंग यांच्यासारख्यांनी कितीही
टीका केली, तरी बाळासाहेब आपल्या विचारांपासून मागं हटले नाहीत.
कॉंग्रेसच्याच दुधावर पोसलेल्या या "वाघा'नं बघता बघता कॉंग्रेसविरोधी
अवकाश व्यापला आणि आता बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरही (पृथ्वीराज चव्हाण
यांनी तसं भाकीत केव्हाच केलं होतं) शिवसेना संपणार नाही.
बाळासाहेबांच्या
नेतृत्वाचं स्थलांतर कुणाकडं होणार, उद्धवकडं की राजकडं, अशी चर्चा सुरू
असतानाच राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापना केली. "उद्धवला
शिवसेनेचा कार्याध्यक्ष करण्याचा ठराव राजनं मांडला, मी काही केलं नाही,'
असं बाळासाहेबांनी वारंवार सांगितलंय; पण "उद्धवला आणि आदित्यला सांभाळा,'
असंच शेवटचं आवाहन करून त्यांनी जणू आपली अं तिम इच्छाच प्रकट केली. हे
आवाहन करताना त्यांनी राज यांचा उल्लेख टाळला. शिवाय, "उद्धव व आदित्य
यांना एकाकी पडू देऊ नका,' अशी साद घालताना, हीच विनंती त्यांनी राज
यांनाही खासगीत केली असल्यास कळायला मार्ग नाही; पण त्यांचा वारस उद्धव
असून, उद्या त्यांची प्रकृती नरम-गरम राहिल्यास नेतृत्व आदित्यकडं जावं,
अशीच बाळासाहेबांची इच्छा होती, असं दिसतं.
बाळासाहेबांच्या
अंत्ययात्रेतही राज यांच्या वाट्याला उपेक्षा आल्याच्या बातम्या आहेत.
मात्र, समाचाराला येणाऱ्यांच्या सांत्वनाचा स्वीकार उद्धव व राज एकत्रितपणे
करत असल्याचंही दृश्य शिवाजी पार्कवर दिसलं. वयानं राज हे उद्धव
यांच्यापेक्षा लहान असले, तरी राजकारणात ते "सीनिअर'आहेत. राज हे भारतीय
विद्यार्थी सेनेचे नेते होते आणि बेरोजगार तरुणांचे मोर्चे वगैरे काढत असत.
1990 च्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडं
आलं नि विदर्भ-मराठवाड्यात दौरे करून पक्ष रुजवणारे छगन भुजबळ साहजिकच
रुसले. पुढच्याच वर्षी ते समर्थक आमदारांसह कॉं ग्रेसमध्ये गेले. म्हणजे
एकीकडं शिवसेना विस्तारत होती व त्याच वेळी तिला संघटनात्मक प्रश्नांनाही
तोंड द्यावं लागत होतं. उद्धव व राज यांचा शिवसेनेत नेते म्हणून उदय झाला,
तो या पार्श्वभूमीवर. घराणेशाहीविरुद्ध पक्षात नाराजी असल्याच्या बातम्या
प्रसिद्ध झाल्या, तेव्हा ठाकरे फॅमिलीच शिवसेनेचा त्याग करत असल्याची
धक्कादायक घोषणा बाळासाहेबांनी केली. त्यामुळं सैनिक तापले व जुने- जाणते
नेते थंड पडले. त्यातून राज-उद्धवच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं; परंतु
1999 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारांच्या तिकीटवाटपाच्या वेळी
उभयतांत मतभेद होते. तेव्हापासून राज यांचे पंख कापण्यास सुरवात झाली.
2001-2002 च्या महापालिका निवडणुकीत मतभेद चव्हाट्यावर आले, तेव्हा मग
राज-गटानं मुंबईत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना धूळ चाखण्यास भाग पाडलं.
यथावकाश उद्धव कार्याध्यक्ष झाले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीचं तिकीटवाटप
उद्धव यांच्या इच्छेनुसार झालं. संघटनेवर उद्धव यांची पकड व बहुसंख्य
आमदारही त्याच्याच गटाचे. त्यामुळं नारायण राणे व राज यांच्या बंडानं तरही
शिवसेनेत उभी फूट पडली नाही; परंतु शिवसेनेची संघटनात्मक ताकद मात्र नक्कीच
कमी झाली.
करिष्म्याचा
वारसा आपल्याकडेच असल्याचं राज यांनी पक्षाबाहेर पडल्यावर सिद्ध करून
दाखवलं. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर मुकेश व अनिल अंबानी
वेगवेगळे झाले. त्यांच्यातली कटुता मात्र आता कमी झालेली आहे.
उद्धव
व राज यांच्यातलं वैमनस्य बाळासाहेबांच्या नजरेसमोरच प्रकटलं आणि उद्धव व
बाळासाहेबांच्या आजारपणापासून राज हे भावनिकदृष्ट्या "मातोश्री'च्या जवळ
आले आहेत; परंतु भावना वेगळ्या व राजकारण वेगळं.
मुकेश व अनिल
यांच्या मनोमीलनानंतरही त्यांच्या कंपन्यांचं एकमेकांत विलीनीकरण झालेलं
नाही. कॉंग्रेसबाहेर पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना करण्यात
आल्यानंतर दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले; पण तरीही राष्ट्रवादीनं आपली
वेगळी "आयडेंटिटी' जपली आहे; "राष्ट्रवादीनं मूळ पक्षात विलीन व्हावं,' अशी
इच्छा विलासराव देशमुखांपासून ते दिग्विजयसिंग यांच्यापर्यंत अनेकांनी
व्यक्त केलेली असली, तरीही! त्यामुळं तूर्तास तरी महाराष्ट्र नवनिर्माण
सेना आपलं अस्तित्व कायम ठेवेल. "मर्जर' झालं तर केडरमधील सत्तापदांच्या
वाटणीचा मोठा पेच तयार होईल. काहींना तिकिटं व पदं मिळणार नाहीत. शिवाय,
स्थानिक पातळीवर शत्रुत्व मिटवणं सोपं नसतं.
शिवसेनेची व मनसेची
मतपेढी एकच असली, तरी दोघांची स्टाइल अलग अलग आहे. शाळेत जशी नापासांची
यादी असते, तशी राजकीय निरीक्षकांकडंही एक यादी असते. बहुतेकांनी उद्धव
यांना नापास केलंय! उद्धव भले "अमिताभ' नसेलही; पण तो "भारतभूषण'ही नाही,
हे लक्षात घ्यायला हवं. उद्धव यांनी मुंबई पालिकेत शिवसेनेला सलग दोनदा
विजय मिळवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वीजटंचाई, कुपोषण अशा
प्रश्नांवर त्यांनी ग्रामीण भागांत जोरदार आंदोलनं केली आहेत.
ऊस,
कापूस, कांद्याचा आधारभाव, निर्यातबंदी, दुष्काळ यांसारखे विषय त्यांनी
हाताळले आहेत. जुन्यांपैकी दिवाकर रावते यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याला
उद्धव यांनी जवळ केलंय; तर महिलांच्या तसंच सामाजिक समस्या प्रभावीपणे
मांडणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे, पक्षाची व्यवस्थापकीय सूत्रं सांभाळणारे अनिल
देसाई, पालिकेतले संयमी नेते सुनील प्रभू, आरोग्य व अन्य प्रश्न नेटानं
लावून धरणारे डॉ. दीपक सावंत आणि ग्रामीण वेदनांना तोंड फोडणारे विजय
शिवतारे असे नेते उद्धव यांच्या काळात पुढं आले आहेत.
बाळासाहेबांच्या
स्मारकावरून वादाची काडी पेटवली ती मनोहर जोशी यांनी. उलट, "हा वाद
थांबवावा,' असं संयमी आवाहन उद्धव यांनी केलं आहे. "मी मुंबईकर' असं
सर्वसमावेशक आवाहनही त्यांनीच केलं होतं.
"अमुकला हाणा', "तमुकला
अद्दल घडवा' अशी भाषा उद्धव यांनी कधीच केलेली नाही. बाळासाहेब हयात असताना
उद्धव यांना शिवसेनेचा मूळ स्वभाव बदलता येणं शक्य नव्हतं. आजही या
गोष्टी लगेच होणार नाहीत; परंतु मुळातच आनंद दिघे यांचा मृत्यू, छगन भुजबळ,
नारायण राणे, गणेश नाईक, राज यांचा शिवसेनात्याग यामुळं शिवसेना आधीच
निवळलेली आहे.
राज यांनी राडेबाजी आणि इतरांचा द्वेष करत मराठी
मतांची मोळी बांधली; पण त्यांनी मनसे स्थापन होऊन सहा वर्षं उलटली तरीही
राज्याच्या विकासाचा आराखडा जाहीर केलेला नाही. मागास विभागांचा अनुशेष,
सिंचनाचे प्रश्न, सहकारी संस्थांचा कारभार, महिला, दलित यांची होत असलेली
वंचना हे प्रश्न मनसेनं हातीच घेतलेले नाहीत.
शिवसेनेनं 1966
पासून पहिली पाच-सात वर्षं "ड्रामेबाजी' करून "सही रे सही' सारखे हिट
प्रयोग केले. मनसे तोच कित्ता गिरवत आहे; परंतु जिथं हाती सत्ता आली,
तिथंही या पक्षानं अपवादात्मक प्रमाणातच यश मिळवलंय. सत्तेत भागीदार असताना
वा विरोधात असताना मनसेच्या नगरसेवकांनी फारशी चमक दाखवलेली नव्हती.
नाशिकमध्ये व इतरत्र मनसेनं अन्य पक्षांसारख्याच तडजोडी केल्या आहेत.
शिवसेनेला आता एका सळसळणाऱ्या संघटनेपासून सर्वसाधारण राजकीय पक्षाच्या
दिशेनं वाटचाल करायची आहे; तर प्रस्थापितांसारखा व्यवहार करूनही मनसेला
"रंग माझा वेगळा' असं दाखवायचंय!
शिवसेना ग्रामीण भागात घुसली तरी
आहे; तर मनसे शहरकेंद्रित, त्यातही "सुवर्णचतुष्कोना'तच (मुंबई, पुणे,
नाशिक, औरंगाबाद) भिरभिरत आहे. वास्तविक बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई,
शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर, शिरीष पारकर, राम कदम, वसंत गीते, संदीप
देशपांडे असे कितीतरी "तेजतर्रार' मोहरे मनसेकडं आहेत; परंतु महिला,
शेतकरी, दलित, आदिवासी, मागासांमधील नेतृत्व पुढं आणलं गेलेलं नाही. उद्धव
भरपूर फिरले आहेत; राज त्यामानानं कमीच. तरुणांमधली राज यांची लोकप्रियता
लक्षात घेऊन उद्धव यांनी आदित्यच्या नेतृत्वाखाली "युवा सेना' काढली आहे.
बाळासाहेबांइतकेच राज हे आक्रमक, अस्मितावादी आणि थेट कृतीवर भर देणारे
आहेत. उद्धव यांच्यापेक्षा राज यांच्याकडं मराठी बाणा अधिक आहे. उद्धव हे
सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे नाहीत; राज यांचं उलट आहे. त्यामुळं
बाळासाहेबांचा नैसर्गिक वारसा राज यांच्याकडं येतो. उद्धव कुटुंबात रमणारा
माणूस आहे. मात्र, तरीही संघटनाबा ंधणी, विकासाच्या समस्यांचं भान, जिद्द,
कष्ट करण्याची व कठोर टीका सोसण्याची तयारी हे त्यांचे गुण आहेत. 1966 च्या
वेळी मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. आता शिकल्या-सवरल्या
मराठीजनांना पर्यटन, आयटी, हॉटेल व्यवस्थापन, निर्यातक्षेत्रात नोकऱ्या
मिळत आहेत. ते व्यवसाय-उद्योगही करत आहेत. त्या वेळी कारखानदारी हे एकच
क्षेत्र मुख्य होतं. आता सेवाक्षेत्रानं अर्थव्यवस्थेचा अर्धा-अधिक वाटा
व्यापला आहे. तेव्हा लायसन्स-परमिट राज होतं, आज उदारीकरण येऊनही दोन दशकं
लोटली आहेत. स्त्रियांना बऱ्यापैकी मोकळं आकाश मिळालं आहे. सांस्कृतिक
संकल्पना बदलल्या आहेत. शेजारी देशांशी व राज्यांशी सौहार्द जपण्याचा हा
काळ आहे. त्यामुळंच "एकही मारा, लेकिन सॉलिड मारा की नही?' यापेक्षा "करून
दाखवलं'चा हा समय आहे! शिवसेनेचं नेतृत्व उद्धव हेच करतील व ते कदाचित
पक्षाच्या ध्येयधोरणांत आमूलाग्र परिवर्तन आणतील. 2014 पर्यंत मनसे आपला
पसारा वाढवू पाहील. निवडणुकीत दोन्ही पक्ष जागावाटपात समझोता करतील. या
निवडणुकांत समजा दोघांपैकी एकजण अगदीच फिका पडला, तर एकत्रीकरणाची
प्रक्रिया कदाचित गतिमान होईल. अशा वेळी "मर्ज्ड' पक्षात कार्याध्यक्षपदंही
दोन निर्माण करता येतील. उद्धव व राज यांनी आपापला "इगो' मागं ठेवून
हस्तांदोलन केलं, तर महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलेल. सत्तेशिवाय आपापली
पक्षांतर्गत सत्ता गोंजारत बसायचं की व्यक्तिगत त्याग करून एकत्रित
पक्षाची सत्ता राज्यात आणायची, याचा निर्णय शेवटी या दोघांनीच घ्यायचा आहे.
एकाधिकारशाहीवादी पक्ष असल्यानं सैनिकांच्या हातात मान डोलावण्याखेरीज
दुसरं काही नाही...
-----------------------------------------------------------
शिवसेनाप्रमुखांच्या
स्मारकाचा वाद घालण्याची ही वेळ नाही. स्मारकावरून वाद घालणाऱ्यांनी आणि
टीकेचा सूर काढणाऱ्यांनी आमच्या सगळ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. ठाकरे
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेना परिवार या धक्क्यातून
सावरलेला नसताना स्मारकाचा हा वाद का निर्माण व्हावा?
- उद्धव ठाकरे -----------------------------------------------------------
पुढच्या
पंधरा-वीस वर्षांनंतर जेव्हा कधी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या देशात येईल,
तेव्हा त्याच्या अजेंड्यावर एक गोष्ट नक्की पाहिजे, की मला महाराष्ट्रात
जायचं आहे. तिकडं विदर्भात असं असं झालंय, तिकडं मराठवाड्यात असं असं
झालंय...मला तिकडं जायचं आहे, भेट द्यायची आहे, हे अमेरिकेच्या
राष्ट्राध्यक्षाला वाटलं पाहिजे...इथंपर्यंत माझा महाराष्ट्र मोठा झाला
पाहिजे.
- राज ठाकरे