मंगलवार, 21 जनवरी 2014

कामगिरी सुधारा, अन्यथा घरचा रस्ता धरा-राज

बुधवार, 22 जानेवारी 2014 - 02:00 AM IST
मुंबई- मागील निवडणुकांप्रमाणेच आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्येही विजयी घोडदौड करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी राज्यभरातील नगरसेवकांना मुंबईत पाचारण करून महापालिकेमध्ये ज्यांची कामगिरी दिसून येत नाही, अशा नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली असून कामगिरी सुधारा; अन्यथा घरचा रस्ता धरा, अशा शब्दांत राज यांनी सुनावल्याचे समजते.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच चार-सहा महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यभरातील जनतेने भरभरून मते दिली. नाशिक महापालिकेतील सत्तेची चावी जनतेने मनसेकडे सोपवली. पुण्यासह अन्य महापालिकांच्या निवडणुकीतही मनसेला चांगले यश मिळाले; मात्र काही महिन्यांपासून पालिकेतील मनसेच्या कारभारावर टीका होऊ लागली. या पार्श्‍वभूमीवर मनसे नगरसेवकांच्या कामांचा आढावा घेण्यास राज यांनी सुरुवात केली आहे. गेल्या शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी "परेड' राजगडवर पार पडली. यापाठोपाठ आज नाशिकच्या नगरसेवकांच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी तक्रारी असलेल्या आणि कामगिरीत कमी पडलेल्या नगरसेवकांची त्यांनी कानउघाडणी केल्याचे समजते. राज उद्या (ता. 22) पुण्यात; तर गुरुवारी (ता. 24) मुंबईतील नगरसेवकांचे प्रगती पुस्तक तपासणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोमवार, 20 जनवरी 2014

राज ठाकरेंसमोर आज नगरसेवकांची अग्निपरीक्षा

मंगळवार, 21 जानेवारी 2014 - 03:15 AM IST
 
 नाशिक - गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेत सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांची आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे स्वतः परीक्षा घेणार असून, त्यात केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. परीक्षेसाठी मनसेचे नगरसेवक सकाळी एकत्रितरीत्या एका खासगी बसने रवाना होणार आहेत.

मुंबईतील आजच्या बैठकीत "राज' यांच्या मूडवर सारे काही अवलंबून असल्याचे नगरसेवकांमधून सांगितले जात आहे. नगरसेवकांनी तक्रारींचा सूर आळवला तर कदाचित "राज' यांनी दोन दिवसांत सत्ता सोडण्यासाठी तयार राहण्याचे केलेले सूतोवाच प्रत्यक्षात उतरण्याची शक्‍यता मनसेच्या गटातून व्यक्त केली जात असल्याने नगरसेवकांची धडधड वाढली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यात तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान पक्षांतर्गत वाढत्या कुरबुरी व दोन वर्षांच्या सत्ताकाळात विकासकामे न झाल्याने श्री. ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करीत मला सत्तेची गरज नाही. दोन दिवसांत सत्ता सोडण्यास तयार राहा, असा इशारा दिला होता.

ठाकरे मुंबईत पोचल्यानंतर "कृष्णकुंज'वरून नगरसेवकांना मुंबईत बोलविण्यात आले. उद्या (ता. 21) सकाळी सहाच्या सुमारास मनसेचे सर्व नगरसेवक एका खासगी बसने रवाना होणार आहेत. दरम्यान, ठाकरे यांच्या बैठकीत नगरसेवकांना किती वेळ देतील व मिळालेल्या वेळेत कामांचा सारीपाट कसा सादर करता येईल, या विवंचनेत नगरसेवक असल्याचे दिसून येत आहे.

तक्रारींचा सूर अधिक..!

पक्षाध्यक्ष राज ठाकरे वेळ देणार असल्याने मनसेच्या सर्वच नगरसेवकांनी दोन वर्षांत केलेल्या कामांची उजळणी
केली. ठाकरे यांच्यासमोर विकासकामे सादर करताना दोन वर्षांत कुठे अपयश आले याचीही माहिती तक्रारीच्या स्वरूपात दिली जाणार असल्याचे मनसेच्या गोटातून सांगण्यात येत आहे. महासभेत भूमिका मांडताना आलेले अपयश, केलेल्या कामांची व्यवस्थित माहिती जनतेसमोर न गेल्याने त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर झालेला परिणाम, महापालिकेत सत्ता असताना न झालेली कामे व त्यास कारणीभूत असलेले पक्षाचे पदाधिकारी यांच्या तक्रारी ठाकरे यांच्याकडे होणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे लक्ष

मनसेच्या नगरसेवकांची आज पक्षाध्यक्षांसमोर होणारी परेड व त्यानंतर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे  महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे यांनी सत्ता सोडण्याचे निर्देश दिल्यास दुसरीकडे महापालिकेतील सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे शिवसेनेच्या गटातून बोलले जात आहे. त्यासाठी सत्तेची गणिते जुळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेच्या आजच्या बैठकीनंतर निर्णय घेण्याची वेळ आल्यास आगामी निवडणुका, महापालिकेतील पक्षीय बलाबल याचाही विचार करून मनसेकडून निर्णय होण्याची शक्‍यता बोलून दाखविली जात आहे./

शुक्रवार, 17 जनवरी 2014

नवआकांक्षावादी खेळाडूचे "मनसे'समोर आव्हान

जनतेच्या इच्छा-आकांक्षांची जाण राज ठाकरे यांना आहे, हे मध्यमवर्ग निष्ठेने मानत राहिला. मराठीच्या आग्रहाने, उत्तम भाषणाने आणि प्रचलित पक्षांना मोजत नाही, या गुर्मीने राज मध्यमवर्गाला जिंकत गेले. नेमक्‍या याच वर्गात आता शिरलेल्या "आप' या नव्या भिडूशी सामना हे मनसेसमोरचे मोठे आव्हान आहे
निकाल लागले दिल्ली विधानसभेचे, पण परिणाम झाले अवघ्या देशाप्रमाणेच मुंबईवर. अरविंद केजरीवाल यांच्या यशाने सारेच राजकारणी गडबडले. पर्यायी पक्ष म्हणून समोर येणाऱ्या मनसेसारख्या पक्षांसमोर तर मोठेच आव्हान उभे राहिले. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत गुंतले असताना मनसेचे मौन बोलके ठरते आहे. नाशिकहून मुंबईत परतल्यावर राज ठाकरे महत्त्वाच्या भेटीगाठी घेत आहेत असे समजते. अगोदर स्वत:च वंदनीय ठरवलेले नरेंद्र मोदी आणि नवेनवेले अरविंद केजरीवाल हे नेते आज मनसेच्या कुंडलीतले राहू-केतू ठरले आहेत. त्यांचा प्रभाव क्षीण करीत पुढचा मार्ग कसा शोधायचा याचे आव्हान राज यांच्यासमोर आहे. त्यातून ते कसा मार्ग काढतात याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

शिवसेनेत नेतृत्वाला वाव नाही, हे लक्षात येताच राज बाहेर पडले. केवळ त्याच विचारांची दुसरी चूल मांडून न बसता त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतःसाठी जागा निर्माण केली. ही किमया त्यांनी केवळ काही वर्षांत साधली. प्रतिकूल वातावरणात वडिलांच्या पुण्याईवर शिवसेनेचे संघटन राखून ठेवण्याचे कसब उद्धव यांनी दाखवले. पण राज मात्र झपाट्याने वेगळ्या मतदारांना आकर्षित करू शकले. मतदारांना पर्यायी राजकीय व्यवस्था हवी होतीच. विशिष्ट परिघात फिरणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये राम नाही हे मानणाऱ्यांची पिढी सज्ञान झाली होती. त्या पिढीवर, त्यांच्या भावनांवर राज स्वार झाले. मनसेच्या वाढीचे श्रेय "खळ्‌ळ खट्‌टॅक'वर श्रद्धा असणाऱ्या नाकागुंडांपेक्षाही नवे काहीतरी घडविण्याची ऊर्मी असलेल्या निम्न ते उच्च मध्यमवर्गीयांना द्यावे लागेल. नाशिक, कल्याण- डोंबिवली, पुणे अशा महापालिकांत याच वर्गाने मनसेच्या पारड्यात भरभरून मते टाकली. प्रचलित पक्षांपेक्षा वेगळा नवा पर्याय हे या निवडीमागचे कारण होते. राज यांच्या व्यक्‍तिमत्त्वाला, वक्‍तृत्वाला निवडून आलेले बहुतांश लोकप्रतिनिधी उत्तम कामाची जोड देऊ शकले नाहीत. पण अशी निराशा वाट्याला आली, तरी नव्या ठिकाणी नवी जनता राज यांच्या रसवंतीला भुलत राहिली. नागरिकांच्या इच्छा-आकांक्षांची जाण राज यांना आहे, हे महाराष्ट्रातील मध्यमवर्ग निष्ठेने मानत राहिला. मराठीच्या आग्रहाने, उत्तम भाषणाने आणि प्रचलित पक्षांना मोजत नाही या गुर्मीने राज मध्यमवर्गाला जिंकत गेले. नेमक्‍या याच वर्गात आता नवा भिडू शिरला आहे. परिवर्तनाची आस असलेल्या मध्यमवर्गीयांना सुशासनाची स्वप्ने दाखवणारा. किंबहुना, सरकार या प्रक्रियेचे मायबाप तुम्ही आहात याची कायम जाणीव देणारा. आकांक्षा पेरणारा. काही वर्षांपूर्वी याच दिशेने मनसे जात होती. मुंबई म्हणजे दिल्ली नाही हे मान्य. महाराष्ट्राच्या पंचधृवीय राजकारणात "आप' वेगळी जागा निर्माण करू शकणार नाही हेही मान्य. पण नवमतदारांचा हा पक्ष एखाद्याच्या जागेत घुसखोरी करू शकेल. ही जागा मनसेची तर नसेल? कोपराने जागा करून घेणाऱ्या या नवआकांक्षावादी खेळाडूशी सामना हे मनसेसमोरचे आव्हान ठरणार आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे यावे असा मनसेचा "रोडमॅप'. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा दोघांना "रडार'वर ठेवण्याची गरज होती. प्रादेशिक पक्षांच्या सुवर्णकाळाचा लाभ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना झाला. आता परिस्थिती बदलली आहे. वेगळ्या वांशिक भावनांमुळे दक्षिणेत द्राविडी प्राणायाम यशस्वी होतीलही, पण महाराष्ट्राचे तसे नाही. राष्ट्रीय बाण्यापासून आपण कायम फटकून वागत नाही. येथे प्रादेशिक अभिनिवेश केवळ तोंडी लावण्यापुरता असतो. त्यामुळे मनसेला या मुद्‌द्‌याचा अस्तित्वासाठी कितपत वापर करता येईल शंका आहे. "एण्ड ऑफ आयडिऑलॉजी'चा हा काळ आहे काय? खोऱ्याने पैसा ओढणारे राजकारणी निवडणुकीत हात मोकळे सोडतात, मग का न त्यांच्याकडून सोसायटीला रंग देऊन घ्या, अशा मानसिकतेपर्यंत गेलेल्या मतदारांना आता मूल्याधारित राजकारणाची स्वप्ने पडू लागली आहेत. भाषा-प्रांत-जात यापेक्षा आमच्या आकांक्षांची दखल घ्या, असे मानणारा वर्ग वाढला आहे. आकांक्षापूर्ती हीच आयडिऑलॉजी. कायम पर्यायाच्या शोधात असलेल्या मतदाराला असा ध्येयवाद भावतो. ध्येयवाद हरवलेले नेते ही जनतेची समस्या होती. आता पर्याय उभा आहे. राष्ट्रवादी भावनांना हाकारत समृद्ध भविष्याची हमी देणारे मोदी आणि भ्रष्टाचारावर झाडू मारणारे केजरीवाल हे सध्या तेजीत आहेत. व्ही. पी. सिंहांचे जे झाले तेच कदाचित केजरीवालांचेही होईल, पण त्याला अजून वेळ आहे. नेमक्‍या याच कालावधीत राज यांना पक्ष पुढे न्यायचा आहे. मोदींना नामोहरम करणारे विषय त्यांनी शोधून काढले आहेत खरे, पण त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा भाजपतला मोठा वर्ग नाराज होईल. मोदींच्या निवडणूक तयारीचा मान राखत उद्धव यांनी पडते घेतलेले दिसते. महायुतीत आता स्वाभिमानी पक्षासारख्या नव्यांचा समावेश करत शिवसेना बेरजेचे राजकारण करते आहे. त्यांना मुख्यमंत्री करायला निघालेल्या नवागत सुपुत्र आदित्यला ते युक्‍तीच्या चार गोष्टी सांगतील का माहीत नाही. पण प्रश्‍न त्यांचा नाहीच. ते बचाव फळीचे खेळाडू आहेत, तर राज विस्ताराच्या. सोनिया गांधी कॉंग्रेसजनांच्या खुशामतखोरीला विनम्रपणाच्या बुरख्याआडून धूर्त लगाम लावत मुलाला पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर ठेवत असताना, इकडे मात्र मुलगा वडिलांच्या राज्याभिषेकाचा अश्‍वमेध सुरू करतो आहे. पण शिवसेनाप्रमुखांनंतरच्या शिवसेनेला बरेच गुन्हे माफ आहेत. राज यांचे तसे नाही. ते गादी सांभाळणारे नाहीत तर पीठ निर्माण करणारे नेते आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी केलेल्या धरसोडीचे हिशेब त्यामुळे मागितले जाणार आहेत हे निश्‍चित. अन्यायकारक टोलविरोधात महाराष्ट्रात सर्वप्रथम आवाज उठविला तो मनसेने. मग अचानक मुद्दा मागे पडला कसा? महायुतीत न जाता स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे असेल, तर कॉंग्रेस -राष्ट्रवादीला मदत करणारा पक्ष अशी टीका होईल, त्याचे उत्तर काय द्यायचे या प्रश्‍नाचे उत्तर मनसेला, पर्यायाने राज यांना द्यायचे आहे. मनसेची पुढची दिशा हा महाराष्ट्राच्या राजकारणात आज कळीचा मुद्दा झाला आहे.

बुधवार, 8 जनवरी 2014

मोदींनी संपूर्ण देशाचा विचार करावा - राज

गुरुवार, 9 जानेवारी 2014 - 12:09 PM IST 
नाशिक - ''भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामाचा मला आदरच आहे. परंतू त्यांनी आता गुजरातबाहेर पडून संपूर्ण देशाचा विचार करावा,'' असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (मनसे) राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये विकासकामांच्या आढाव्यासाठी आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ''मला वाटतेय की, भाजपने मोदींची पंतप्रधानपदासाठी घोषणा केल्यानंतर त्यांनी लगेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. पंतप्रधान हा देशाचा असावा, राज्याचा नाही. त्यांनी पूर्ण देशाकडे लक्ष देण्याची गरज असून, एका राज्यापुरते राहू नये. मुंबईत सभा घेऊन तुम्ही गुजराती बांधव आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी बोलता. त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल का बोलत नाही.''

आम आदमी पक्षाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, की काँग्रेसला दिल्लीत कामे न केल्यानेच फटका बसला. दिल्लीतल बदलांचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात 'आप'ची गरज नसून, येथे आम्ही आहोत. महाराष्ट्रात मनसेच बाप आहे. महाराष्ट्र आजही सर्वार्थाने पहिल्या स्थानावर आहे. राज्याचा प्रगतीचा आलेख उंचवायला हवा. वेळ निघून गेल्यानंतर निर्णय घेणे व्यर्थ आहे. यापुढे राज्यांतील विविध भागात बैठका घेणार आहे. नाशिकमधील विकासकामांबाबत मला पाच वर्षांनंतर विचारावे.
महाराष्ट्रात 'आप'चे आहे काय?

'देशाला बदलाची गरज आहे. मात्र महाराष्ट्रात 'आप'चे काय आहे. त्यांचा नेता कोण आहे, असा सवाल करून राज म्हणाले, 'सध्या देशात जे आप, आप चालू आहे, ते मी महाराष्ट्रात गेली सहा वर्षे बोलतोय. पण राज्य बदलण्यासाठी सत्ता हवी. मला सत्ता द्या मी महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवतो. हा माझा निर्धार आजही कायम आहे. इथे 'आप'ची गरज नाही.'

मोदींनी शिवरायांच्या पुतळ्याबद्दलही बोलावे!

मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या कामाबद्दल मला आदर आहे. पण त्यांनी स्वत:ला मर्यादित ठेवू नये. त्यांनी गुजरातमधून बाहेर पडून देशाचा विचार करावा. महाराष्ट्रात त्यांनी पटेलांच्या पुतळ्याबद्दल न बोलता शिवरायांच्या पुतळ्याबद्दल बोलायला हवे,' असेही राज म्हणाले. 'सभांना होणाऱ्या गर्दीचे म्हणाल तर ती माझ्याही सभांना होते,' असा टोलाही राज यांनी हाणला.

महाराष्ट्र 'नंबर वन' पण...

मुंबईतील भाषणात मोदींनी महाराष्ट्र व गुजरातच्या केलेल्या तुलनेबद्दल राज यांनी असहमती दर्शवली. 'महाराष्ट्र हा आजही प्रत्येक आघाडीवर गुजरातच्या पुढे आहे. पण इथे सध्या सुरू असलेल्या कारभाराला लोक विटले आहेत. त्या तुलनेत गुजरातमधील कारभार चांगला आहे. महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यांत जाताहेत ही चिंतेचीच बाब आहे. त्याची चिंता या राज्यकर्त्यांना नको का, असा संताप राज यांनी व्यक्त केला.

नाशिकबद्दल पाच वर्षांनी विचारा!

नाशिकच्या विकासाबद्दल विचारले असता राज यांनी पुन्हा एकदा गोलमाल उत्तर दिले. 'नाशिकमध्ये मला पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे काम करण्यात किती अडचणी येतात हे सर्वांना माहीतच आहे,' असे 'रडगाणे' राज यांनी लावले. सत्ता मला पाच वर्षांसाठी मिळाली आहे. तेवढे दिवस जाऊ द्या, मग मला विचारा,' असे सांगून राज यांनी हा प्रश्न टोलवला.

सोमवार, 23 दिसंबर 2013

अमिताभ- राज यांचा पुन्हा 'याराना'

मुंबई - उत्तर प्रदेशमधील गंगेवरही आमचे प्रेम असल्याचा दाखला देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आपला कोणताही वाद राहिला नसल्याचे जाहीर करून "झाले गेले "गंगे'ला मिळाले' असा जाहीर निर्वाळा देऊन बच्चन कुटुंबीयांबरोबर सुरू असलेल्या वादाला आज पूर्णविराम दिला.

विकासाच्या मुद्‌द्‌यावर विशेष यश मिळत नसल्याने मराठीच्या विषयावरून राज ठाकरे यांनी आक्रमक आंदोलन सुरू केल्याच्या काळात अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशची जाहिरात केली होती. तसेच, या राज्यात शाळाही सुरू केली होती. त्यावेळी राज यांनी त्यांच्यावर टीका करून अशी कामे करावयाची असल्यास यूपीमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. अखेर अमिताभ यांनी माफी मागून हा विषय संपविला होता. या पार्श्‍वभूमीवर राज या सर्व वादावर कोणती भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता होती; पण त्यांनी षण्मुखानंद सभागृहात मनसेच्या चित्रपट सेनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून वादावर पडदा टाकला.

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांच्यावर देशभरातील लोक प्रांतापलीकडे जाऊन प्रेम करतात. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर हिंदीवरील प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अमिताभ असल्याची स्तुती राज यांनी या वेळी केली.

अमिताभ यांनी मराठीतून भाषणाला सुरवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले, ""स्टारडम हे क्षणिक असते. सत्तर- ऐंशीच्या दशकातील एक गोष्ट. त्यावेळी मी गाडी घेऊन निघालो होतो. तेव्हा चाळिशी- पन्नाशीतील एका सुपरस्टारला बसस्टॉपवर उभे असलेले पाहिले. त्यांनी फाटके कपडे परिधान केलेले होते. त्यांना पाहिल्यानंतर मी माझी गाडी थांबविली आणि त्यांना तुम्हाला कोठे सोडू असे विचारले; परंतु त्यांनी त्याकरिता नकार दिला. ते म्हणाले, मला प्रेक्षकांनी जेवढे प्रेम केले तेवढ्याचा मी धनी झालो. आता या परिस्थितीला मलाच तोंड द्यायचे आहे. त्यांनी माझ्याकडून मदत नाकारली. त्याच वेळी स्टारडम किती क्षणिक आहे याची प्रचिती मला आली.''

सचिन पिळगावकर यांनीदेखील महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले.

बुधवार, 20 नवंबर 2013

विचारांची भाषा समजत नसल्याने मी ठोकतो


गुरुवार, 21 नोव्हेंबर 2013 - 03:00 AM IST

नागपूर - प्रत्येक राज्याची स्वतःची अस्मिता असते. ती प्रत्येकाने जपलीच पाहिजे. याकरिता माझा आग्रह असून विचारांची भाषा समजत नसल्याने मी ठोकतो, असे रोखठोक मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात येऊन परप्रांतीयांनी स्वतःचे मतदारसंघ निर्माण केल्यास मी आडवा येईनच, असा इशारही त्यांनी यावेळी दिला.

मारवाडी फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार ग्रामगीताचार्य तुकारामदादा बेलूरकर यांना आज, बुधवारी राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज ठाकरे म्हणाले, "आजोबांनी एका लेखाला "दगलबाज शिवाजी' असे शीर्षक दिले. दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी त्यांचे व्याख्यान होते. आयोजकांनी त्यांना विरोध केला. प्रबोधनकार म्हणाले, "मला बोलू द्या, मग ठरवा.' ते व्यासपीठावर गेले आणि "मी दगाबाज नाही दगलबाज म्हणालो. दगलबाजचा अर्थ हुशार किंवा शूर असा होतो.' त्यावेळी शब्दसंपदा होती. वसंत कानेटकरांसारखे लेखन होत नाही आज. "हिंदू धर्मातील चुका परखडपणे मांडल्यामुळे पुण्यात प्रबोधनकारांची खोटी प्रेतयात्रा काढण्यात आली होती. तो प्रतीकात्मक निषेध होता; मात्र तोच विचार मांडणाऱ्या नरेंद्र दाभोलकरांना पुण्यात खरोखर मारण्यात आले आणि खरीच प्रेतयात्रा निघाली. यावरून कोणता समाज खरा पुरोगामी होता हे लक्षात येतं,' असेही ते म्हणाले.

रामकृष्णदादा बेलूरकर यांचा सत्कार करताना राज ठाकरेंनी त्यांना वाकून नमस्कार केला. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "माझ्या हस्ते सत्कार करू नका, कुणीतरी मोठा माणूस बोलवा असे आयोजकांना सांगितले होते; पण ऐकतील ते नागपूरकर कसले? पण बेलूरकर यांचा सत्कार करायला मिळणे, हा माझा सन्मान समजतो. "या जगात पाया पडावे असे पायच उरलेले नाहीत,' असे पु. ल. देशपांडे कुसुमाग्रजांच्या पाया पडताना म्हणाले होते. मला आज तसेच वाटले.' खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर खा. अजय संचेती, आमदार उल्हास पवार, गिरीश गांधी, रमेश बंग, सत्यनारायण नुवाल, मितेश भांगडिया, श्रीकृष्ण चांडक, अनिल राठी, विजय मुरारका यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.

सर्व भाषणे मराठीत...
गिरीश गांधी आणि उल्हास पवार अशा कार्यक्रमांमध्ये मराठीतच भाषण करतात, याचा सर्वांना अनुभव आहे; पण राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविल्यानंतर नितीन गडकरी अलीकडे जाहीर सभेत हिंदीत बोलतात. अजय संचेती यांच्या भाषणांना मोठ्या प्रमाणात हिंदीचा स्पर्श असतो. राज ठाकरे यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीमुळे मात्र एकाही वक्‍त्याच्या भाषणात हिंदी वाक्‍ये आली नाहीत. सर्व भाषणे मराठीतच झाली. याला "राज ठाकरे इफेक्‍ट'च म्हणावा लागेल.

"राजलीला'
* प्रत्येक वक्ता व्यासपीठावरील पाहुण्यांची नावे का घेतो? (शांतता)
* ही "नाव' घ्यायची जागा आहे का? (हशा)
* विचारांची भाषा समजत नाही, म्हणून मी ठोकतो (टाळ्या)
* मी मारले तर "का मारलं?'; सचिनने मारले तर "काय मारलं !' (हशा)
* "मारवाडी फाउंडेशन'चे "मराठी फाउंडेशन' करा (टाळ्या)
* परप्रांतीय मतदारसंघ तयार करतील, तर मी आडवा येणारच
* मराठीबद्दल मी बोललो तर संकीर्ण, दुसरे बोलले तर व्यापक?
* मराठवाड्यापेक्षा भुजमधील भूकंपग्रस्तांना महाराष्ट्रातून जास्त मदत (खंत)
* परखड बोला आणि माझ्यावरील केसेस तुम्ही घ्या