मंगलवार, 24 अगस्त 2010

शिवसेनेपुढे "मनसे'चे कडवे आव्हान

शिवसेनेपुढे "मनसे'चे कडवे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 24, 2010 AT 12:30 AM (IST)

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला आहे; परंतु विशेष मेहनत सत्ताधारी शिवसेनेला घ्यावी लागत आहे. कारण शिवसेनेपुढे मनसेचे कडवे आव्हान आहे. त्यासाठी शिवसेनेला सत्ता टिकविण्यासाठी महापालिका निवडणुकीत शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मनसेची जादू रोखणे शिवसेनेपुढे मोठी कसोटी असून त्याला तोंड देण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यासाठी सुरुवात केली आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या 2005 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती. शिवसेनेने 107 पैकी 60 जागा लढविल्या होत्या. त्यांपैकी 29 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. सहा जागांवर शिवसेना पुरस्कृत सहा नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे 16 नगरसेवक निवडून आले होते. कल्याण पूर्व-पश्‍चिम भागात शिवसेनेला 20 जागा मिळाल्या होत्या. डोंबिवलीत कमी जागा मिळाल्या होत्या. युतीला अपक्षांची साथ न मिळाल्याने सत्तेचे गणित चुकले होते. या वेळेसही शिवसेना-भाजपची युती होणार, असा सकारात्मक सूर दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडून व्यक्त केला जात असला तरी युती अद्याप झालेली नाही. प्रत्येक पक्ष सध्यातरी स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करीत असल्याने शिवसेना-भाजपही स्वबळाची ताकद जोखण्याची तयारी ठेवून आहे, असे स्थानिक नेतेमंडळींकडून सांगण्यात येत आहे.

अडीच वर्षानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची सत्ता उलथवून शिवसेना-भाजप युती पालिकेत सत्तेवर आली; परंतु 2009 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून शिवसेनेला विजय मिळाला. त्याच वेळी मनसेला मिळालेली मते लाखापेक्षा जास्त होती. कल्याणचा बुरूज राखण्यात शिवसेनेला यश आले होते. लोकसभेपाठोपाठ सहा महिन्यांनी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्‍चिम, कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण या तिन्ही मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत कल्याणचा बुरूजही ढासळला. पालिकेत सत्ता असूनही शिवसेनेला मिळालेले अपयश प्रकर्षाने सामोरे आले.

मनसेने दोन निवडणुकींत मिळालेल्या मताधिक्‍याच्या जोरावर महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेची काळी बाजू मांडणारी आंदोलने करण्याचा सपाटा लावला आहे. कल्याण पश्‍चिमचे आमदार मनसेचे आहेत. त्यांनी दोन अधिवेशनांत कल्याणचे कोणते प्रश्‍न मांडले आणि कोणत्या योजना मंजूर केल्या, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक सचिन बासरे यांनी उपस्थित केला आहे. प्रभाग आरक्षणाचा फटका सगळ्यात जास्त शिवसेनेला बसला आहे. प्रस्थापित नगरसेवकांना दुसऱ्या प्रभागात उभे राहावे लागणार आहे.

मनसेचा करिष्मा चालणार नाही!शिवसेनेचे डोंबिवलीचे शहरप्रमुख सदानंद थरवळ यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीत मनसेचा करिष्मा चालणार नाही. महापालिका निवडणूक व्यक्तिगत संबंध आणि नगरसेवकांनी केलेल्या कामांच्या जोरावर लढविल्या जातात. कल्याण शहरप्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की, मनसेची जादू चालणार नाही. शाखाप्रमुखांच्या बैठका घेऊन चाचपणी केली गेली आहे. युती झाल्यानंतरच उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें