सोमवार, 6 सितंबर 2010

'ठाकरे जोडो अभियाना'चा पुन्हा निर्धार

'ठाकरे जोडो अभियाना'चा पुन्हा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:24 AM (IST)

गोविंद येतयेकर - सकाळ वृत्तसेवामुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनासाठी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा'च्या संस्थापकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले नसले तरी केवळ मराठीच्या अस्मितेसाठी चळवळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठी जनमताचा रेटा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी माणसाला लागलेला दुहीचा शाप नष्ट करण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर या "दुहीच्या रावणा'चे दहन करण्याचा विडा चळवळीचे सदस्य उचलणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून दुरावलेल्या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, मराठी अस्मिता, मराठी माणसाला एकजुटीने वाचविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काही महिन्यांपूर्वी ही चळवळ सुरू झाली. गेल्या काही महिन्यांत जनमताचा कानोसा घेतल्यानंतर काल (ता. 5) या चळवळीचे सदस्य प्रथमच रस्त्यावर उतरले. या मनोमिलनाला राज ठाकरे यांनी चकवा दिला, तर मराठी जनमानसात संदेह निर्माण करू नका व शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र येऊन मराठीची ताकद वाढवा, असे आवाहन करीत उद्धव ठाकरे यांनी "ठाकरे जोडो'च्या प्रयत्नांना बगल दिली; परंतु यानंतरही मोहिमेची धुरा सांभाळणारे सतीश वळंजू यांची लढाई संपलेली नाही. मराठीच्या अस्मितेसाठी याप्रकारची लढाई अशी यशस्वी होणार नाही. कारण, मराठ्यांना दुहीचा शाप आहे. हे जाणून या दुहीच्या रावणरूपी शापाचे विजयादशमीच्या दिवशी दहन करण्यात येणार असल्याची माहिती वळंजू यांनी "सकाळ'ला दिली.

"ठाकरे जोडो'साठी काल झालेल्या प्रयत्नांना यश आले नाही; तरीही मराठी जनमताचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न अजून किमान पाच महिने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी म्हणजेच 23 जानेवारी 2011 रोजी भव्य जाहीर सभा घेऊनच या मोहिमेची निर्णायक लढाई लढली जाणार आहे. या पाच महिन्यांत आमची मोहीम आम्ही प्रभावीपणे राबविणार आहोत. "मनसे'ची लोकप्रियता वाढली आहे. मराठी माणसाचे विभाजन झाले आहे व भविष्यातही होणार आहे. त्यात शिवसेनेचे व पर्यायाने मराठी माणसाचे नुकसान होत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
उद्धव व राज यांच्यातील दुहीमुळे मुंबई महापालिकेची सत्ता हातातून निघून जाईल व अमराठी लोकांच्या हाती पालिकेची सत्ता जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें