सोमवार, 8 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत "मनसे' विरोधी बाकावर बसणार

कल्याण-डोंबिवलीत "मनसे' विरोधी बाकावर बसणार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 09, 2010 AT 12:28 AM (IST)
 

डोंबिवली - 'कल्याण-डोंबिवली महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधी पक्षाचे काम करणार आहे. विरोधी पक्ष म्हणजे विरोधक नव्हे; तर पालिकेतील सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याची भूमिका मनसे चोख बजावेल,'' अशी भूमिका या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जाहीर केली.

पालिकेच्या निकालानंतर 27 जागांवर विजय मिळविलेली मनसे सत्तास्थापनेत निर्णायक भूमिका बजावणार, अशी चर्चा होती. महापालिकेत महापौर "मनसे'चाच असेल, असे राज यांनी निवडणुकीपूर्वी आणि प्रचारात सांगितले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेविषयी तर्कवितर्क सुरू होते. निकालानंतर प्रथमच भूमिका जाहीर करताना राज ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

'महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहील. घोडेबाजारात सहभागी होणार नाही. सत्ता स्थापनेसाठी मी स्वत:हून कोणत्याही राजकीय पक्षाशी संपर्क साधलेला नाही. जे काही वर्तमानपत्रातून वाचले, त्या सगळ्या अफवा होत्या. राजकीय अफवांवर माझा विश्‍वास नाही. त्यामुळे त्याविषयी मी काही खुलासा करणार नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सोबत घेऊन मनसे सत्ता स्थापन करणार, असे गणित मांडले जात होते. मात्र, मनसेने या दोन्ही कॉंग्रेसला धक्का दिल्याने ते मनसेसोबत येणे कसे शक्‍य आहे, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. आमच्यापुढे दुसरा पर्याय शिवसेनेचा होता; पण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले, विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांची आकडेवारी पाहता, मागच्या वेळी शिवसेना आणि पुरस्कृत नगरसेवक धरून 34 जागा होत्या. यंदा त्यांना 31 जागा मिळाल्या, म्हणजे त्या कमी झाल्या. शिवसेनेच्या मागच्या वेळच्या 11 जागी मनसेचे उमेदवार निवडून आले आहेत.'' मनसेमुळे त्यांचे मावळते महापौर आणि उपमहापौर पराभूत झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'कल्याण-डोंबिवलीचा महापौर "मनसे'चा व्हावा, ही माझी इच्छा होती. जनतेने मला तसा पाठिंबाही दिला. मात्र, मी मनसेच्या हाती पूर्ण सत्ता देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. पूर्ण सत्ता हाती नसली तरी ही शेवटची निवडणूक नाही. यापुढेही निवडणुका होणार आहेत. मी काही सत्तापिपासू नाही,'' असा टोलाही त्यांनी लगावला.

महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या 11 जणांपैकी चार अपक्षांचा एक गट तयार करण्यात आला असून, त्यापैकी एका अपक्षाने मला पत्र पाठवून महापौरपदासाठी मनसेने पाठिंबा द्यावा, असे विनोदी पत्र पाठविले आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. तो अपक्ष नगरसेवक कोण, याचा तपशील त्यांनी दिला नाही.

नगरसेवकांची संख्या आता 28अपक्ष नगरसेविका सरोज भोईर यांनी आज मनसेत प्रवेश केल्याने त्या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 28 झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रनगरमधून शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने नगरसेवक प्रकाश भोईर यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वामन म्हात्रे यांच्याविरोधात बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मात्र भोईर यांचा पराभव झाला. भोईर हे पूर्वीपासून मनसेच्या वाटेवर होते. त्यांच्या पत्नी सरोज भोईर देवीचा पाडा प्रभागातून अपक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. भोईर यांनी पत्नीसाठी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. त्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे भोईर पती-पत्नींनी आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें