शनिवार, 13 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत उद्धव-राज हातमिळवणी

कल्याण-डोंबिवलीत उद्धव-राज हातमिळवणी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 14, 2010 AT 12:15 AM (IST)
 

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महापौरपद व विरोधी पक्षनेतेपदासाठी हातमिळवणी झाल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा असताना मनसेकडे घाईघाईने विरोधी पक्षनेतेपद कसे देण्यात आले, असा सवालही त्यांनी केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती, मनसे व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत झाली. निवडणुकीत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 29 नगरसेवक निवडून आले व मनसेने 27 जागा जिंकल्या. शिवसेनेने भाजप व अपक्षांच्या मदतीने महापौरपदावर दावा केला. आघाडीकडे बहुमत नव्हते. त्यामुळे कुणी अपक्ष उमेदवार पुढे आला तर त्याला पाठिंबा देण्याची रणनीती दोन्ही कॉंग्रेसने आखली; तर मनसेने महापौरपद निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेवर तोफा डागणाऱ्या राज ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन शिवसेनेला महापौरपद मिळण्याचा मार्ग मोकळा केला. तरीही आघाडीचे संख्याबळ दुसऱ्या क्रमांकाचे असल्याने आमच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद यायला हवे होते, असे माणिकराव ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेला हे पद कसे देण्यात आले असा सवालही त्यांनी "सकाळ'शी बोलताना केला. महापालिकांमधील विरोधी पक्षनेतेपदाचा घोळ वर्षभर चालतो. कल्याण-डोंबिवलीत मात्र घाईघाईने मनसेला हे पद देण्यात आले, त्यामुळे महापौरपद व विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची पडद्यामागे हातमिळवणी झाल्याचे स्पष्ट होते, असा दावाही त्यांनी केला.

1 टिप्पणी:

  1. आम्हला काय करायचेय त्याचे कॉंग्रेस ला विरोधी पक्षनेते पद भेटले नाही हेच चांगले

    जवाब देंहटाएं