रविवार, 14 नवंबर 2010

कॅटरिंग कॉलेजना अखेर मराठी ठसका!

कॅटरिंग कॉलेजना अखेर मराठी ठसका!
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:15 AM (IST)
 
शर्मिला कलगुटकर
मुंबई - नागपूरचा वडाभात, कोल्हापूरचा तांबडा रस्सा, खानदेशातील शेवभाजी अन्‌ अवघ्या महाराष्ट्राच्या पुरणपोळीकडे पाठ फिरवून मेक्‍सिकन, थाई, पंजाबी फूडला शाही मान देणाऱ्या कॅटरिंग महाविद्यालयांना झणझणीत मराठी ठसका बसला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून तत्कालीन तंत्र व उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी या महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्राच्या रसपूर्ण खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पाककृती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठी पाट्यांनंतर आता ताटवाट्यांतील पदार्थांनाही न्याय मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या संपन्न खाद्यसंस्कृतीच्या नुसत्या आठवणीनेही रसना तृप्त होते. खमंग काकडी, दही खावडी, ज्वारीची भाकरी, गरमागरम पिठले, झणझणीत खर्डा, पांढऱ्या वांग्यांचे भरित, तीळकुटाची चटणी, भरलेल्या मिरच्या, साजूक तुपाची रवदार धार असलेले वरण, मुगाची खिचडी... अशा जिभेस रग अन्‌ पोटास तड लागेपर्यंत चापण्याच्या असंख्य पाककृती आहेत. दुर्दैवाने राज्यातील एकाही कॅटरिंग कॉलेजमध्ये त्या शिकवल्या जात नाहीत. चीझ, पनीर, बटरमध्ये लोळणाऱ्या पंजाबी फूडने थेट हॉटेलांच्या स्वयंपाकघरात वर्णी लागली. हे पाहून "दिवा महाराष्ट्र'चे डॉ. सुहास अवचट यांनी ही सारी परिस्थिती कथन करणारे विस्तृत पत्र तत्कालीन मंत्रिमहोदयांना लिहिले होते. मराठीच्या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही महाराष्ट्रातल्या या जिव्हाळ्याच्या पदार्थांची यादीही पेश केली होती. इतकेच नव्हे, तर "अन्नपूर्णा' या संस्थेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेलमध्ये देण्यात येणाऱ्या पदार्थांमध्येही गावागावांतली खासियत असावी यासाठी पाठपुरावा केला होता. या साऱ्याची खमंग फोडणी बसली असून या महाविद्यालयांना अभ्यासक्रमात महाराष्ट्रीय पाककृतींचा समावेश करणे सक्तीचे झाले आहे. त्याबद्दलचा विस्तृत पत्रव्यवहारही या महाविद्यालयांशी करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर शासनदरबारी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्येही चायनीज, थाई फूडचा वरचष्मा असतो. या पाककृती पेश करणाऱ्या बल्लवाचार्यांनाच अनेकदा त्या कशा बनवायच्या हे ठाऊक नसते. मुगाच्या डाळीचे वरण अन्‌ मसुरीच्या डाळीला द्याव्या लागणाऱ्या लसणाच्या फोडणीमध्ये वैविध्य असते, इतके मूलभूत ज्ञानही या विद्यार्थ्यांना अनेकदा नसल्याची खंत अनेक मराठमोळे हॉटेल व्यावसायिकच व्यक्त करतात. या अभ्यासक्रमामध्ये दहीतुपात
मुरवलेल्या पदार्थांइतक्‍याच अन्य प्रांतांतील रेसिपीही घोळवून घेतलेल्या असतात, पण घडीच्या पोळीचे पदर मात्र सुटता सुटत नाहीत. केरळमध्ये सांबार, भात, इडली, डोशांचे उदंड पीक असताना वरण दृष्टीलाही पडत नाही; तर गोव्यातील शाकाहारी खानावळीतल्या ताटालाही सागुतीचा गंध असतो. आपल्याकडे मात्र कोथिंबीर वडी, उपीट, साबुदाण्याची गरमागरम खिचडी देणाऱ्या हॉटेलांसाठी शोधयात्रा काढावी लागते; तर गिरगावातला अनंताश्रम बंद झाल्यामुळे खवय्ये अनंतकाळ हळहळतात... इतिहासाच्या पानावर मराठी खाद्यसंस्कृती विराजमान होण्यापूर्वी ती हॉटेलातल्या पानांवर पुन्हा डावीकडून लागू लागली हेही नसे थोडके!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें