रविवार, 2 सितंबर 2012

राज्यातील आरोपी बिहारमध्येच का जातात?- राज

राज्यातील आरोपी बिहारमध्येच का जातात?- राज
- वृत्तसंस्था
Sunday, September 02, 2012 AT 01:41 PM (IST)

मुंबई - महाराष्ट्रात कोणताही गुन्हा घडल्यास पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्येच का जावे लागते? राज्यात घडणारे सर्वाधिक गुन्हे परप्रांतियांकडूनच घडत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) केले.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, ''अमर जवान स्मारकाची मोडतोड करणारा आरोपी बिहारलाच का गेला? महाराष्ट्रातील सर्व गुन्हे कोणी केले आहेत आणि ते कोठे जातात हे तपासा. या राज्यातील लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात येत आहेत. येथून येणाऱ्या नागरिकांची कोणतीही नोंद नाही. केरळ पोलिस परप्रांतियांची नोंदणी करून घेते, मग महाराष्ट्रातील पोलिस का करत नाही. पोलिस खात्यात काय सुरु आहे, याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांना नसते. त्यांना हे खाते समजत नाही आणि ते त्यांना कळतही नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

आशाताईंच्या विषयात मी काय चुकीचे बोललो, असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, की बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या कलाकारांना आपण का प्रोत्साहन देत आहोत? आपल्या देशात येऊन ते पैसे कमावितात. इतर वेळी रोखठोक भूमिका मांडणाऱ्या आशाताईंनी या मुद्द्यावर का रोखठोक भूमिका मांडली नाही. इकडे माणसे मारली जात आहेत आणि आपण मैत्रीचा हात पुढे करत आहोत. मी जातीचा मुद्दा उपस्थित करत नसून, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हा माझा मुद्दा आहे.

दिग्विजय सिंह यांच्या विषयी सडेतोड वक्तव्य करताना राज म्हणाले, ''काँग्रेस पक्षाने शिव्या खाण्यासाठी ठेवलेले व्यक्ती आहेत. तसेच ते काँग्रेसचे बुजगावणे देखील आहे. ठाकरे कुटुंबिय मुळचे बिहारचे आहे, असे म्हणणारे दिग्विजय यांचे कुटुंब सुलभ शौचालयातील आहे का? बिहारमधून आम्ही मध्य प्रदेशातील धार गावी आलो, असे म्हणणारे दिग्विजय यांची सवय धाड टाकण्याची आहे.

गुरुवारी बिहारी नागरिकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातील हिंदी चॅनेल्सचे पत्रकार आणि नेते कसे एकत्र येतात, हे यामुळे स्पष्ट झाल्याचे राज यांनी सांगितले. याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील नेते एकत्र का येत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज म्हणाले, की माझे म्हणणे समजून न घेता सर्व वृत्तवाहिन्यांवर चर्चा सुरु झाली. हिंदी चॅनेल्सवाल्यांनी आपला खेळ थांबवावा, नाहीतर मी तुमचा खेळ थांबवील. तुम्हाला मराठी समजत नसेल तर महाराष्ट्रातील पत्रकारांकडून समजावून घ्या. पण, चुकीचा अर्थ काढून चर्चा करू नका



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें