सोमवार, 11 फ़रवरी 2013

मराठीच्या मुद्द्यावर सत्ता आणू - राज ठाकरे

मराठीच्या मुद्द्यावर सत्ता आणू - राज ठाकरे

- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 12, 2013 AT 01:15 AM (IST)
कोल्हापूर - मराठीच्या मुद्द्यावर एकहाती सत्ता आणू. त्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्याची गरज आहे, असे वाटत नाही, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले.

श्री. ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज तिसऱ्या दिवशी सायंकाळी ते कोल्हापुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले, ""मराठीच्या मुद्द्यावर सत्ता येऊ शकत नाही, म्हणून मी हिंदुत्वाचा मुद्दा जवळ केला, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. म्हणजे मी त्यांचा मुद्दा खोडून काढत आहे, असा अर्थ घेऊ नका; पण आता काळ खूप बदलला आहे. आजची पिढी खूप स्मार्ट आहे. "बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल,' असे ठणकावणारी आजची पिढी आहे. या तरुणाईच्या पाठबळावरच मी हा दावा करीत आहे. आज सत्तेवर येण्यासाठी युती, आघाड्या दिसतात; पण उद्या हेही चित्र बदलेल. सत्तेसाठी त्याची गरज भासणार नाही, यावर माझा विश्‍वास आहे.''

तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर उद्याच्या सभेत मिळेल, असे सांगून खोचक प्रश्‍नांना त्यांनी बगल दिली व सभेची उत्सुकता अधिक ताणली. तरीही पत्रकारांनी दुष्काळासंदर्भात छेडले असता ठाकरी बाण्यातच त्यांनी पत्रकारांना फटकारले. ते म्हणाले, ""पन्नास वर्षांनंतरही राज्यातील दुष्काळ हटत नाही. इतकी वर्षे राज्य केले त्यांना याचा जाब न विचारता मला प्रश्‍न विचारता, हे संयुक्तिक वाटते का?''

ते म्हणाले, ""माझा हा दौरा दुष्काळी भागासाठी नाही. दुष्काळ पडला की दौरा करून दुःखी चेहरा घेऊन मी भेटत नाही. दुष्काळ असो वा बॉम्बस्फोट होवो; काही जण दौरा काढतात आणि दुःखी चेहरा करून खोटी सहानुभूती दाखवतात. तशी मला सवय नाही. मला जी मदत करायची असते, ती गाजावाजा न करता पोच करतो. आजपर्यंत ज्यांना निवडून दिले, त्यांना बंद करा; आपल्याला संधी द्या. सत्ता आली तर माझ्याकडे दुष्काळावर कायमस्वरूपी पर्याय आहे.''

गेल्या पन्नास वर्षांत रुजलेली दोन्ही कॉंग्रेसची मुळे कशी तोडणार, या प्रश्‍नावर श्री. ठाकरे म्हणाले, ""साखर कारखाना असो वा दूध संघ, शेतकऱ्यांनी पिकवलेच नाही किंवा उत्पादनच घेतले नाही तर त्यांचे अस्तित्व राहील का? कधी तरी उलटा विचार करायला हवा. शेतकऱ्यांनाही कधीतरी निर्णय घ्यावाच लागेल. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. ते काम मी करीन.''

ते म्हणाले, ""प्यायला पाणी नाही, प्रेमाने वाढवलेल्या जनावरांना चारा नाही, शेतकरी आत्महत्या करताहेत, यापेक्षा पुढचे टोक आणखी काय असू शकते? मी सर्वज्ञ नाही; पण अनेक तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क करून पर्याय शोधणे शक्‍य आहे. गरज आहे ती सत्ता हातात येण्याची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच माझे विठ्ठल आहेत. त्यांची आणि माझी तुलना होऊच शकत नाही.''

महालक्ष्मी अंगात येणार
श्री. ठाकरे यांची येथील गांधी मैदानात उद्या (ता. 13) सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. त्या संदर्भात विचारताच ते म्हणाले, ""उद्या महालक्ष्मी अंगात कशी येते, याचे प्रात्यक्षिकच पाहा. स्थानिक प्रश्‍नांचाही उद्या उलगडा करू.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें