मंगलवार, 12 फ़रवरी 2013

टाळी देण्यात स्वारस्य नाही - राज ठाकरे

टाळी देण्यात स्वारस्य नाही - राज ठाकरे

- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 12, 2013 AT 08:09 PM (IST)
कोल्हापूर -  मला टाळी देण्यात कोणतेही स्वारस्य नाही. जे काही करेन ते स्वबळावरच. राज्यात संपूर्ण सत्ता द्या, महाराष्ट्राचे नवनिर्माण करून दाखवितो, असा विश्‍वास आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे झालेल्या सभेमध्ये दिला. राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आज कोल्हापुरातून दणक्‍यात प्रारंभ झाला.

आपल्या एक तासाच्या भाषणात राज यांनी सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली; तसेच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या टाळीला सध्यातरी प्रत्युत्तर देणार नसल्याचे त्यांचा नामोल्लेख न करता सांगितले. या विषयावर वर्तमानपत्रांतून चर्चा सुरू आहे ते पाहता आपली "एकला चलो रे'चीच भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महालक्ष्मी मंदिर विकासासाठी राज्य शासनाने एक हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणीही राज यांनी या वेळी केली.

तरुणाईने तुडुंब भरलेल्या ऐतिहासिक गांधी मैदानात राज ठाकरे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिली सभा गाजवली. राज ठाकरे म्हणाले, ""राज ठाकरेला मिळाली की मराठी मते फुटतात अशी ओरड होते. ते अत्यंत चुकीचे आहे. ही कुठली पद्धत. कोल्हापूर महापालिकेत कोणाची सत्ता आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची. कोल्हापुरात सर्वांत जास्ती लोक कोण राहतात. त्यांना मतदान कानड्यांनी केले काय? तुमच्यासमोर गैरसमज पसरवून तुम्हाला फसविले जात आहे.'' अल्पसंख्याक भाषक टक्का असेल त्या भाषेत परीक्षा देण्याची मुभा दिली आहे. मराठीबरोबर हिंदी, उर्दूमध्येही परीक्षा देण्याची तयारी सुरू आहे. येथून पुढे त्यांचा टक्का वाढून त्यांना नोकऱ्या मिळणार, याला मनसेचा विरोध असल्याचे राज ठाकरे यांनी बजावले.

टोलनाक्‍यांविरोधातील आंदोलनाला आपल्याला यश मिळाल्याचे सांगून त्यांनी कर्नाटकातील रस्त्यांचे उदाहरण दिले. स्मारकांचे विषय समोर ठेवून मराठी जनतेला भुलविले जात आहे. महाराजांचे समुद्रात स्मारक बांधण्याऐवजी किल्ल्यांची डागडुजी केल्यास शिवछत्रपतींचा इतिहास जगासमोर मांडता येईल, असा मुद्दा राज यांनी मांडला.

आबांची हजेरी
मनसेची शाखाबांधणी करण्यास निघालेल्या कार्यकर्त्यांना आर. आर. पाटील यांचे कार्यकर्ते धमक्‍या देतात. त्यांना काम करू देत नाहीत. इतकेच नव्हे; तर त्यांच्या आई-वडिलांनाही धमक्‍या देतात. हा प्रकार मी यापुढे सहन करणार नाही. यापुढे असे झाल्यास केवळ आर. आर. पाटील यांनाच नाही; तर त्यांच्या घरच्यानांही धमक्‍या देण्यास माझे कार्यकर्ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें