राज यांची टीका नैराश्यातून - उपमुख्यमंत्री
सकाळ वृत्तसेवा
Friday, January 14, 2011 AT 12:30 AM (IST)
मुंबई - आम्ही विकासाचे राजकारण करणारे लोक आहोत, ज्यांना लोकांच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही, असे लोक शिवराळ भाषा वापरतात, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला. राज यांनी नैराश्यातून आपल्यावर टीका केली आहे, मुख्यमंत्र्यांबद्दलही त्यांनी वाईट उद्गार काढले, अशी भाषा वापरल्याने तेच जनतेच्या मनातून उतरतील, अशी प्रतिक्रिया पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.
औरंगाबाद येथे काल (ता. 12) मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. मंत्रालयात आज त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी आपल्यावर नैराशातून आरोप केले, त्याची किती दखल घ्यायची? असा उलट सवाल केला. मात्र, एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला कमरेखालची शिवराळ भाषा वापरायची हे बरोबर नाही, मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी असंसदीय भाषेत टीका केली, त्यामुळे राज जनतेची सहानुभूती गमावून बसतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांच्या मारहाणीचे आपण कधीही समर्थन केलेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु जाधव यांनीही पोलिसांना मारहाण केली, हेही बरोबर नाही, असे पवार यांनी निदर्शनास आणले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें