पोलिसांचे निलंबन झालेच पाहिजे - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 13, 2011 AT 12:45 AM (IST)
औरंगाबाद - "आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचे निलंबन झालेच पाहिजे,'' अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (ता. 12) येथे केली. "निलंबन झाले नाही, तर विधानसभेत काय करायचे ते बघून घेऊ,' असा इशारा देत या मारहाण प्रकरणामागे गृहमंत्री आर. आर. पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मनसेतर्फे आमदार जाधव मारहाण प्रकरणी आयोजित निषेध सभेत श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार जाधव यांच्या मातुःश्री माजी आमदार श्रीमती तेजस्विनी जाधव यांच्यासह आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले की, हर्षवर्धन यांचे वडील आणि आईदेखील कॉंग्रेसच्या आमदार होत्या. मात्र, हर्षवर्धन मनसेत आले. सध्या मनसेची ताकदही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा राग आर. आर., अजित पवार यांना होता. तो त्यांनी आमदार जाधव यांच्यावर काढला. कन्नड तालुक्यातील एका गावात दारूबंदी करा, अशी महिलांची मागणी होती. ती घेऊन आमदार जाधव काही महिन्यांपूर्वी आर. आर. पाटील यांना भेटायला गेले होते. तेथेही त्यांच्याविरुद्धच गुन्हा नोंदविण्यात आला, वाहने जप्त करण्यात आली. त्यावेळी हर्षवर्धनला मारहाण करणारे कोकणे, पवार हे पोलिस अधिकारी कन्नड तालुक्यात कार्यरत होते. त्याचवेळी दारूबंदीची मागणी मान्य केली असती तर हा पुढचा संघर्ष टळला असता. त्या दिवशीही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन हर्षवर्धन जाधव मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यात त्यांचे काय चुकले? मुख्यमंत्र्यांसोबत फुटकळ लोक फिरतात. त्यांच्याऐवजी एक आमदार सोबत असला तर चालत नाही का? लोकांचे म्हणणे, त्यांच्यावरील अन्याय आमदाराने मांडायचा नाही का? खरे तर आमदार जाधव यांना मारझोड करण्याचा निर्णय पोलिस स्वतः घेऊच शकत नाहीत. त्यांना आर. आर. किंवा अजित पवार यांचा आदेश असल्याशिवाय मारहाण होणारच नाही. आमदार जाधव यांना पोलिस ठाण्यात पाऊण तास बसवून ठेवण्यात आले. हा पाऊण तास पोलिस अधिकारी आदेशाचीच वाट पाहत होते. अजित पवार यांनी कालच "कायदा हातात घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे काय झाले ते पाहा' असे वक्तव्य केले. याचा अर्थ आमदार जाधव यांना मारहाण करण्याचे आदेश तुमचे होते, असा होतो.
भिवंडीत पोलिसांना ठेचून मारणाऱ्यांवर कारवाई झाली नाही. पोलिस अधिकारी, नागरिकांचे बळी घेणाऱ्या अतिरेकी कसाबला भेटायला आर. आर. पाटील तुरुंगात जातात. त्याची विचारपूस करतात. अजित पवारांच्या सभेत प्रश्न विचारणाऱ्या शिक्षकाला पोलिस ठाण्यात बदडून काढले जाते. हे कायद्याचे राज्य आहे का? बाहेरच्या राज्यांतून अनधिकृतपणे जे लोंढे येतायत, त्यांना हाकलण्याऐवजी घरे दिली जात आहेत.
शिवनेरी किल्ला येथे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर फक्त गुन्हे नोंदवून सोडले जाते. कारण या संघटना आर. आर. पाटील, अजित पवार यांच्या आहेत. या संघटनांना हाताशी धरून जातीपातीचे विष पेरण्याचा, राजकारण करण्याचा उद्योग सुरू आहे.
दादोजी कोंडदेव पुतळ्याचा संदर्भ देत श्री. ठाकरे म्हणाले की, इतिहासात काही दोष असतील तर ते चळवळीने सोडवा. पुरावे समोर आणा, तपासा आणि ठरवा. पण केवळ काही नगरसेवकांच्या ठरावावरून पुतळा हलविण्यात आला. शिक्षक कोणत्या जातीचा असावा, हे ठरवून कुणी शिक्षण घेते का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक ब्राह्मण होते, हा इतिहास बदलणार का?
आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे चांगले काम केले. अजित पवारही मला चांगले वाटले होते. रोखठोक माणूस आहे. काही तरी चांगले करतील, असे वाटले होते. पण हे तर आमदारालाच मारहाण करत आहेत. आता त्यांनी जास्त अंगावर येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. आतापर्यंत मी नेहमीच पोलिसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. पोलिसांनीही हे लक्षात ठेवावे. सरकारच्या नादी लागून आमच्यावर अत्याचार करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले
mauka hame bhi milega
जवाब देंहटाएं