शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात "मनसे'चा शिरकाव
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 18, 2012 AT 02:00 AM (IST)
नाशिक रोड - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
एकलहरे गटाचे सदस्य हेमंत गोडसे यांनी हा गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे
कायम राखताना स्वतः महापालिकेच्या विहितगाव प्रभागात विजयी होऊन "मनसे'चा
गट राखतानाच, विहितगाव प्रभागाचा गडही जिंकला आहे. नाशिक रोडला तीन नगरसेवक असलेल्या "मनसे'चा परफॉर्मन्स वाढला आहे. दत्तमंदिर प्रभागात रमेश धोंगडे पुन्हा विजयी झाले असून, त्यांच्या प्रभागात संगीता गायकवाड विजयी झाल्या. जेल रोडला एकमेव महिला नगरसेविका असलेल्या "मनसे'ला या वेळी अशोक सातभाई, शोभना शिंदे यांच्या रूपाने दोन जागा मिळाल्या आहेत. विहितगावची हेमंत गोडसे यांची जागा बोनस मिळाली आहे. एकाचवेळी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाव दाखवीत हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा नाशिक तालुक्यात शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या ठिकाणी राज करिष्म्याचा प्रभाव निर्माण केला आहे.
नाशिक रोडला प्रभागांची संख्या वाढूनही शिवसेनेची मात्र एक जागा घटली आहे. आमदारांच्या प्रभाव क्षेत्राखालील जागेवर शिवसेना-रिपब्लिकन महायुतीतील बेबनाव झाला. याउलट "मनसे'चे तिन्ही आमदार आपापल्या भागात एकेक डझन नगरसेवक विजयी करण्याच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी झटत असताना नाशिक रोडला मात्र मनसेच्या उमेदवारांना तुलनेने कमीच मदत मिळाली, अशाही स्थितीत "मनसे'ने सहा जागा जिंकल्या.
आठ ठिकाणी क्रमांक दोनवर
पंचक प्रभागात मंदाबाई ढिकले, चेहेडीला कल्पना बोराडे, शिवाजीनगरला सुरेंद्र शेजवळ, भीमनगरला भारती साखरे, जय भवानी रोड प्रभाग 55 मध्ये विक्रम कदम व दर्शना पगारे, सुभाष रोडला महिला गटात संगीता क्षीरसागर, विहितगाव प्रभागात दीपाली कोठुळे, क्रमांक दोनची मते मिळविलेल्या "मनसे'च्या अनेक उमेदवारांची कामगिरी प्रभावी राहिली आहे.
नऊ आजी, 11 माजी नगरसेवक पराभूत
नाशिक रोडला दिनकर आढाव, माया दिवे, सुनील बोराडे, रणजित नगरकर, संजय अडांगळे, सत्यभामा गाडेकर, संतोष साळवे, सीमा ताजणे, लता हांडोरे हे विद्यमान नऊ नगरसेवक, तर रतन बोराडे, सरस्वती भालेराव, निवृत्ती अरिंगळे, उमेश शेलार, रामदास सदाफुले, डॉ. राजेंद्र जाधव, सतीश मंडलेचा, शोभा गायधनी, जयश्री गायकवाड, रईस शेख, लंकाबाई हगवणे हे माजी नगरसेवक पराभूत झाले.
भावी महापौर "मनसे'चाच राहणार : आमदार गिते
आमदार वसंतराव गिते (मनसे, प्रदेश सरचिटणीस)ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच नाशिककरांनी पक्षाला भरभरून प्रेम दिले आहे. यातूनच विधानसभेच्या यशस्वितेनंतर आता महापालिका निवडणुकांतही नाशिककरांनी "मनसे'ला भरघोस प्रतिसाद दिला आहे. येणारा महापौर हा "मनसे'चाच असेल. पक्षाध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या उमेदवारांवरील विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. दिलेल्या आश्वासनांची पूर्ती, हे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले नगरसेवक सदैव जनतेच्या संपर्कात राहतील व त्यांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेतील. याबाबतचा माझ्याकडून वेळोवेळी पाठपुरावा होत राहील.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें