शनिवार, 18 फ़रवरी 2012

किंग’ नाही; पण ‘हिरो’ नक्की!


altशिवसेना,भाजप व रिपाईची महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यांचे आव्हान स्वीकारत केवळ एकटय़ाच्या बळावर लढूनही मनसेचे आध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक येथे मिळवलेल्या जागा पाहाता, ‘किंग’ न बनताही राज ठाकरे हे हिरो बनले आहेत. मुंबईत मनसेला तब्बल २८ जागा मिळाल्या तर नाशिकमध्ये ३४ जागा मिळवून प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला. पुण्यातही राज यांना २६ जागा मिळाल्या असून अवघ्या सहा वर्षांच्या मनसेने केवळ राज ठाकरे यांच्या करिष्म्याच्या जोरावर यश मिळविले आहे. मनसेची २००६ साली स्थापना झाल्यानंतर शिवाजी पार्कवर सभा घेण्याचे दाखवलेले धाडस, शिवसेनाप्रमुखांसारखे आक्रमक भाषण करण्याची शैली, खळ्ळ खटॅक आणि नेमकी वेळ साधण्याचे कौशल्य या जोरावर पहाता पाहाता राज यांनी मनसेला लोकप्रियता मिळवून दिली. राज यांच्या शैलीदार भाषणांनी प्रामुख्याने तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाला. पालिका निवडणुकीत राज यांनी केलेले रोड शो आणि आक्रमक भाषण याच्या जोरावर मुंबईत गेल्या वेळेपेक्षा चौपट जागा मिळवण्यात मनसेला यश आले. मुंबईत गेल्यावेळी मनसेला सात जागा मिळाल्या होत्या तर यावेळी एकटय़ाच्या जोरावर २८ जागा मिळवून दाखवल्या. शिवसेनेने आपली सर्व ताकद मुंबई व ठाण्याची सत्ता राखण्यासाठी एकवटली असताना राज यांनी नाशिक व पुण्यातही जोरदार मुसंडी मारली. नाशिकमध्ये शिवसेनेला चारीमुंडय़ा चीत करत तब्बल ३७ जागा मिळवून मनसे हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला तर पुण्यातही त्यांनी २६ जागा मिळविल्या. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मनसेची येथे संघटनात्मक बांधणी फारशी नसतानाही मनसेला सात जागी विजय मिळाला. पिंपरी-चिंचवड,उल्हासनगरसह राज्यातील अन्य महापालिकांमध्येही मनसेने खाते उघडले असून या ठिकाणी तर राज ठाकरे प्रचारालाही गेले नव्हते. शिवसेना, आघाडीप्रमाणेच त्यांचेही लक्ष मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिकेवर होते. मनसेकडे स्टार प्रचारक हे केवळ राज ठाकरे असल्यामुळे या चार महापालिकांमध्ये त्यांना चौफेर प्रचार करावा लागला. पुणे व नाशिक येथील राज यांच्या सभांना जमलेली गर्दी पुरेशी बोलकी होती तसेच ‘रोड शो'लाही जागोजागी प्रंचंड प्रतिसाद मिळाला. माझ्या सभांना गर्दी होते मग मते जातात कोठे असा सवाल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा उपस्थित केला होता. मात्र आपल्या सभांना गर्दीही होते आणि मतांमध्ये त्याचे रुपांतरही होते हा राज ठाकरे यांचा अनुभव पालिका निवडणुकीतही पुन्हा दिसून आला. विश्वास सार्थ करीन- राज ठाकरे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक महापालिकेत लागलेल्या निकालाबाबत मी समाधानी आहे. मतदारांनी मनसेवर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करीन असे मनसेचे अध्यक्ष राज ठाक रे यांनी आज कृष्णभुवन या आपल्या निवासस्थानी सांगितले. मुंबईत गेल्यावेळी आमच्या अवघ्या सात जागा होत्या त्या चौपट होऊन २८ जागी विजय मिळाला असून शिवसेनेला विजय मिळावा यासाठी आतून कोणी मदत केली का, हे तपासून पाहावे लागेल, असेही ते म्हणाले. युतीमध्ये रिपाईंला घेतल्यानंतर शिवसेनेने भाजपकडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्यानंतरही भाजपला ३२ जागा मिळाल्यामुळेच सेनेला सत्तेपर्यंत पोहोचणे शक्य झाल्याचा टोला राज यांनी लगावला. मुंबईतील मतदानाचा व मिळालेल्या जागांचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांची महायुतीला मदत झाली का, ते कळेल, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात राज म्हणाले. आज जरी मनसेचा जोर मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक येथे दिसत असला तरी आगामी का़ळात आपण संपूर्ण महराष्ट्रात जाऊन पक्ष बांधणी बळकट करणार असल्याचे ते म्हणाले



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें