आवाज कुणाचा... मराठी माणसाचाच!
मृणालिनी नानिवडेकर
Friday, February 17, 2012 AT 09:55 PM (IST)
मराठी माणसाच्या वैभवाची एकमेव खूण म्हणजे मुंबई. अठरापगड भाषकांनी कर्मभूमी केलेल्या मुंबईतला मराठी टक्का कमी झाला; तो उपनगरात ढकलला गेला. मात्र अल्पसंख्येतल्या, जेमतेम 40 टक्के भरणाऱ्या मराठी माणसाला हे महानगर आजही आपले वाटते. महानगराचे अर्थकारण हातात नाही, उच्चभ्रू श्रीमान वस्त्यांमध्ये भूखंड तर सोडाच, साधी सदनिका घेण्याचे बळ नाही, अशा दारुण स्थितीत मराठी माणूस "मुंबईत आमची सत्ता आहे, येथला आवाज आमचा आहे,' या रुबाबात जगत असतो. पानिपतात पराभव झाला तरी अटकेपार झेंडे फडकावले होते ना बच्चमजी! हा इतिहास मराठी माणसाला मुंबईसारख्या अफाट आणि कराल महानगरात जगण्याची झिंग मिळवून देतो. या मानसिकतेची नस सापडलेल्या बाळासाहेबांनी या महानगरावर सत्ता गाजवली. कॉंग्रेसमधील नेतृत्वाच्या बेदिलीमुळे स. का. पाटील, वसंतराव नाईकांपासून ते वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत सर्वांनाच शिवसेनेच्या या यशाचे श्रेय दिले जाते. या अपश्रेयापासून दूर होण्यासाठी या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसशी आघाडी केली. मतांची बेरीज आपल्याला तारून नेईल,अशा फाजील विश्वासात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोठाली विधानेही करून टाकली. मात्र शिवसेनेच्या हातून मुंबई जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आपण कफल्लक होणे आहे, हे मुंबईकरांनी ताडले. कॉंग्रेसप्रणीत आघाडीकडे चाणाक्ष नेते नसल्याने, मराठी माणसाचा हा भयगंड कुणाच्या लक्षातच आला नाही. दुसरीकडे शिवसेना चाणाक्षपणे निवडणुकांना सामोरी गेली. मतांच्या गलबल्यात मराठी टक्का मोठा नाही. त्यामुळे शिवसेनेने मराठी माणसाने एक होण्याचे भावनिक आवाहन उघडपणे केले नाही. चतुर राज ठाकरेंनीही मराठीचे नाणे उघडपणे चालवले नाही. प्रत्यक्षात महापलिकेची निवडणूक मराठी विरुद्ध अमराठी धृवीकरणाभोवतीच फिरली. शिवसेना- मनसेने कुशल खेळी केली.भाजपचे गुजराती वोटही दिमतीला होते. कृपाशंकरसिंह, संजय निरूपम, प्रिया दत्त, नरेंद्र वर्मा असे अमराठी चेहरे हाच आघाडीचा आधार. मात्र जनतेला मतदानाला बाहेर काढण्याची जबाबदारी आघाडीने नेमक्या एका खांद्यावर टाकली नाही. त्यामुळे झोपडीत राहणारा मुंबईतला कॉंग्रेसचा परप्रांतीय मतदार या वेळी बाहेर पडलाच नाही. मराठी माणूस स्वत:हून बाहेर पडला. त्यासाठी उपाययोजना करण्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांचे.ठाकरेंच्या दोन्ही कुळशाखांना मुंबई-ठाणेकरांनी स्वीकारले. संघटनेच्या बाहेर पडून राज यांनी मिळवलेले यश लक्षणीय ठरले आणि शिवशक्तीला भीमशक्तीची जोड देणारी उद्धव यांची कूटनीतीही. दोघांनाही मिळालेली मते हा मराठी माणसाचा आवाज आहे. लगतच्या ठाण्यात शिवसेना सत्तेत परतत असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात मिळवलेले यश म्हणजे नव्या मराठी चेहऱ्याला मिळालेली पसंती तर नाही ना, हे तपासून पाहायला हवे.
या कौतुकातच काही प्रश्नही दडले आहेत. पाणी नाही, जागा नाही, स्वच्छता नाही अशा नरकयातनांतील मुंबई जागतिक दर्जाचे महानगर होण्याची भाषा करते आहे. शिवसेनेला हे आव्हान पेलायचे असेल, तर उघड किंवा छुप्या अस्मितेने भागायचे नाही. खरी गरज कृतीची आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें