बुधवार, 11 सितंबर 2013

सर्वच पक्षांना 'मनसे'ची डोकेदुखी

 बुधवार, 11 सप्टेंबर 2013 - 04:00 AM IST

कणकवली - आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रभावी विरोधी पक्ष म्हणून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा संकल्प केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवेश जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. या निवडणुका आघाडी विरुद्ध महायुती अशा लढल्या जातील हे जवळपास निश्‍चित असले तरी या मतदारसंघामध्ये मनसेचा संभाव्य प्रवेश मतविभाजनाचे कारण ठरणार आहे. अर्थात पक्षाध्यक्ष राज ठाकरे ऐनवेळी काय निर्णय घेतील यावरच सर्व चित्र अवलंबून राहील.

राज्यात मनसेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. महायुतीने साद घालून राज ठाकरेंना जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवेल हे जवळपास निश्‍चित आहे. याची तयारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरा काढून सुरू केली आहे. कोकणातील खेडमधील त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र सिंधुदुर्गात राज ठाकरेंनी मोठी जाहीर सभा घेण्याचे टाळले.
मनसे स्थापनेपासून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राजन दाभोळकर यांनी पार पाडली. त्या काळापासूनच पक्षाचे वेगळे अस्तित्व त्यांनी टिकवले. अलीकडेच माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसेत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. श्री. उपरकर हे राज ठाकरे यांचे जवळचे मित्र मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यात मनसेची ताकद निश्‍चितच वाढली. पक्षाच्या वाढीसाठी श्री. उपरकर यांनी वेगवेगळे उपक्रम आणि आंदोलने हाती घेतली. त्याचा थेट परिणाम शिवसेना-भाजप युतीवर होऊ लागला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. श्री. उपरकर यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाची जबाबदारी विभागून देण्यात आली. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद श्री. दाभोळकर यांच्याबरोबर शैलेश भोगले यांच्याकडे विभागून देण्यात आले. त्यानंतर तालुकानिहाय आणि गाववार पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या. एकूणच गेल्या काही महिन्यांत मनसेने जिल्ह्यात संघटना वाढविण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर पक्षाने आपली भूमिका वेगळेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला. परिणामी पक्षाचा वेंगुर्ले नगर परिषदेत एक नगरसेवक निवडून आला. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये मनसेने उमेदवार उतरवून पक्षाचे चिन्ह घरोघरी पोचविण्याचा प्रयत्न केला. मनसेकडे जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी नसली तरी राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव येथील मतदारांवर पडतो. याचबरोबर मुंबईतील मनसेचे निम्म्याहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. या सर्व ताकदीचा वापर करून मनसे येत्या निवडणुकीत थेटपणे स्वतंत्र लढण्याची तयारी करेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. याचे कारण या खेपेस जरी मनसे सत्तेच्या आसपास पोचू शकली नसली तरी सत्तेची चावी मनसेच्या हातात राहील, अशी सध्या राजकीय स्थिती आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी आणि पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पायाभरणी करण्यासाठी मनसे निश्‍चितच प्रयत्नशील राहील.

लोकसभेसाठी मनसेने उमेदवार उतरविल्यास याचा परिणाम महायुतीच्या उमेदवारावर होईल. परंतु याचबरोबर आघाडीला याचे चटके बसतील. चिपळूणपासून बांद्यापर्यंत विस्तारलेल्या या मतदारसंघात मनसेच्या मराठीसारख्या मुद्द्यावर विचारधारा असणारे मतदार निश्‍चितच आहेत. याचा कितपत फायदा होईल हेही निश्‍चित होणार आहे. एकूण सात विधानसभा मतदारसंघ जोडलेल्या या लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पाठबळाचे चित्रही स्पष्ट होईल. त्यानंतरच मनसेला जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद आजमावावी लागेल. हे करत असताना श्री. उपरकर वगळता मनसेकडे स्थानिक पातळीवर प्रभावी उमेदवार नाही. त्यामुळे मुंबईहून उमेदवार आयात करण्याची पाळी मनसेवर येणार आहे. परंतु अद्याप तरी पक्षाने निवडणूक लढण्याची तशी तयारी केलेली नाही. पण ऐन वेळी राज्यात निर्माण होणारे प्रश्‍न आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून मनसे स्वतंत्रपणे विचार करून निवडणुकीला सामोरे जाऊ शकते. तशी चाचपणी वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. एखादा आर्थिक सक्षम कार्यकर्ता शोधला जात आहे. मधल्या कालावधीत अशा पद्धतीने काही कार्यकर्ते उतरविण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला म्हणावे तसे यश आले नाही. परंतु अलीकडच्या काही महिन्यांत मनसेने गावागावात पोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पारंपरिक पक्षाच्या विचारधारेला कंटाळलेला तरुण वर्ग मनसेच्या जाळ्यात अडकला जात आहे. याचा फायदा पक्षाला कितपत होईल हे निवडणुकीला सामोरे गेल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

'सिंधुदुर्गात मनसे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्ते पक्षाकडे येत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही पुऱ्या करत आहोत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास सर्व निवडणुका स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. विरोधी पक्ष म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रश्‍न आम्ही रस्त्यावर उतरून सोडवत आहोत. त्यामुळे पक्षाकडे तरुण, महिला कायकर्त्यांची संख्या वाढत आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मनसे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत.''
- परशुराम उपरकर, मनसे नेते

मंगलवार, 3 सितंबर 2013

आता नाटक पुरे, ब्ल्यू प्रिंट दाखवाच


नाशिक - महापालिका निवडणुकीत विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचे दाखवीत नाशिककरांकडून मतांचा जोगवा मागणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सत्ता येऊन दीड वर्ष उलटल्याने आतातरी ब्ल्यू प्रिंट खुली करावी, अशी अपेक्षा नाशिककर श्री. ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या निमित्ताने करीत आहेत.

ठाकरे यांच्या दौऱ्यात प्रथमच विकासकामांच्या उद्‌घाटनाचा धडाका राहणार असला तरी नाशिकसाठी ठोस असे काहीतरी काम दिसावे, अशी अपेक्षा आहे.
महापालिका निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विकासाच्या नावावर नाशिककरांकडे मते मागितली होती. नाशिककरांनी मनसेच्या पदरात भरभरून मते टाकलीही, परंतु गेल्या दीड वर्षात महापालिकेचा कारभार पाहता अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज ठाकरे महिन्या-दोन महिन्यांनी नाशिक दौऱ्यावर येतात, महापालिका आयुक्तांची भेट घेऊन लवाजम्यासह परततात. नाशिककर मात्र आज, उद्या राज ठाकरे आपल्या पदरात काहीतरी पाडतील, या भोळ्याभाबड्या अपेक्षेने पाहतात, हा आजवरचा अनुभव आहे. परंतु आता ठोस कामे दाखवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांच्या विकासकामांचे उद्‌घाटन होणार आहे. परंतु नाशिकसाठी काहीतरी ठोस असे काम दिसले पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

नाशिकचे प्रथम महापौर (स्व.) शांतारामबापू वावरे यांनी तरण तलाव व पालिका मुख्यालयाची इमारत उभारली, (स्व.) पंडितराव खैरे महापौर असताना गंगापूर धरणातून थेट पाइपलाइन योजना मंजूर झाली. माजी महापौर प्रकाश मते यांच्या कार्यकाळात घंटागाडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. डॉ. शोभा बच्छाव यांच्या कार्यकाळात दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी करण्यात आली. दशरथ पाटील यांच्या कार्यकाळात गोदाघाट प्रकल्पाला प्रारंभ झाला. त्यांच्याच कार्यकाळात सिंहस्थाचे व्यवस्थित नियोजन होऊन विकासकामे झाली. बाळासाहेब सानप यांच्या कार्यकाळात स्मारकांचा विकास झाला. विनायक पांडे महापौर असताना साडेतीन हजार कोटी रुपयांची नेहरू पुनरुत्थान योजना अमलात आली. सत्तेवर असलेल्या प्रत्येक महापौरांकडून शहरासाठी ठोस असे काम केले आहे. परंतु मनसेकडून आतापर्यंत अपेक्षाभंगच झाल्याचा नाशिककरांचा अनुभव आहे. राज ठाकरे यांनी निवडणुकीत विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचे आश्‍वासन दिले होते. दीड वर्ष झाले तरी ती प्रिंट अजून उघडलेलीच नाही. आताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ठाकरे काहीतरी घोषणा करतील, या आशेवर नाशिककर आहेत.

या समस्यांचे काय?
-शहरात कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे. घंटागाडीचा ठेका देऊनही नियमित गाड्या येत नाहीत. शहराची नियमित साफसफाई होत नाही. महापौर ठोस निर्णय घेत नाहीत. सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधकच अधिक प्रबळ दिसतात. भूसंपादनाच्या प्रक्रियेत बिल्डरांना दिले जाणारे झुकते माप, रस्त्यांची झालेली चाळण, गोदावरी प्रदूषण, मनसेच्या नगरसेवकांमधील बेबनावामुळे विकासावर झालेला परिणाम, सदस्यांची होत नसलेली कामे, वाढती अतिक्रमणे, महापालिकेत वाढत्या ठेकेदारीतून होणारे वाद.

बुधवार, 28 अगस्त 2013

विधान परिषद निवडणुकीत मनसे तटस्थ

मुंबई - विधान परिषदेच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तटस्थ राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज "कृष्णकुंज' या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

विधान परिषद निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात बोलताना सर्वच पक्षाच्या आमदारांनी सद्‌सदविवेक बुद्धीला स्मरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र आज धनंजय मुंडे यांनी अचानक "कृष्णकुंज'वर धाव घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. नंतर लगेच ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना झटका बसला असून त्यांची ही भूमिका राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांची आजची भेट राजकीय नव्हती तर केवळ सदिच्छा भेट होती, असे त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या हंडीसाठी मनसेचे आतापासूनच थर

गुरुवार, 29 ऑगस्ट 2013 - 03:00 AM

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडीचा मुहूर्त साधत येत्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे थर रचायला सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर, दक्षिण-मध्य मुंबईतून आदित्य शिरोडकर आणि ईशान्य मुंबईतून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी देण्यावर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्‍कामोर्तब केले आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीच्या निमित्ताने या उमेदवारांना घराघरात नेण्याचा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

लोकसभेच्या उमेदवारांवरून अन्य पक्षांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. मनसेने नांदगावकर, शिरोडकर आणि नलावडे यांच्या नावावर पसंतीची मोहोर उठवत युतीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याची चर्चा करणाऱ्या भाजपचे तोंड बंद केले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून सणांची पर्वणी साधली जाणार आहे. या मतदारसंघामध्ये मनसेने यापूर्वीच पाय रोवले आहेत. राज यांनीही तेथेच लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर घाई करण्यापेक्षा आतापासूनच उमेदवारांचा मतदारांशी संवाद वाढावा यासाठी रणनीती आखली आहे.

लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राज यांनी बोलावलेल्या बैठकीला नितीन सरदेसाई, राजन शिरोडकर, रीटा गुप्ता; तसेच या मतदारसंघांतील विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली असून आदित्य शिरोडकर यांनी दहीहंडीच्या निमित्ताने टी-शर्ट वगैरे वाटप करीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या तीन मतदारसंघापैकी दोन कॉंग्रेसकडे; तर एक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे.

तिसऱ्या थरातून मुसंडीची तयारी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईमध्ये मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दिना पाटील निवडून आले. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला 32.60 टक्‍के, भाजपला 32.15 टक्‍के आणि मनसेला 29.79 टक्‍के मते मिळाली. दक्षिण-मध्य मुंबईतही मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती (येथे कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले). दक्षिण मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावरील मनसे यांच्यामध्ये मतांची थेट विभागणी झाल्याने कॉंग्रेसचे मिलिंद देवरा यांना लाभ झाला. आता मात्र दक्षिण मुंबईतील शिवसेनेचा गड हलविण्यासाठी मनसेने तेथे अधिक ताकद लावण्याचे ठरवले आहे. एकंदर या तिन्ही मतदारसंघांत सध्या तिसऱ्या थरावर असलेल्या मनसेची विजयाचे दही चाखण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

धनंजय मुंडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आज (बुधवार) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

बीड जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मुंडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. धनंजय मुंडे हे वडिल पंडित अण्णा मुंडे यांच्यासह काही महिन्यांपूर्वी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी नुकताच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला आहे.