सोमवार, 20 अगस्त 2012

मुंबईत मोर्चा काढणारच

मुंबईत मोर्चा काढणारच
- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, August 21, 2012 AT 12:09 AM (IST)

मुंबई - 'पोलिसांची परवानगी मिळो अथवा न मिळो उद्या (ता. 21) आझाद मैदानातील हिंसाचाराच्या विरोधातील मनसेचा मोर्चा निघणार म्हणजे निघणारच,' असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) सरकारला दिले. "मोगलाईप्रमाणे कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविण्याचा प्रयत्न केल्यास झालेल्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी,' असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, राज यांच्या इशाऱ्यानंतर रात्री आठ वाजता पोलिसांनी आझाद मैदानावरील सभेस परवानगी दिली; मात्र गिरगाव ते आझाद मैदान या मोर्चाला परवानगी नाकारली.

मनसेच्या मोर्चासाठी आझाद मैदानात व्यासपीठ उभारणीचे काम सुरू असल्याचे ठाकरे यांनी "कृष्णकुंज'वर पत्रकार परिषदेत सांगितले. रझा अकादमीने आझाद मैदानात आयोजित केलेल्या निदर्शनात हिंसाचार झाला. त्याचा निषेध करण्यासाठी मनसेने गिरगाव ते आझाद मैदान या मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मनसेने पोलिसांची परवानगी मागितली होती.

गिरगाव चौपाटीवर कोणताही कार्यक्रम घेण्यास न्यायालयाची मनाई असल्याचा दावा पोलिसांनी केला असला, तरी "आपण न्यायालयाचा निर्णय वाचलेला आहे, या निर्णयात चौपाटीवर "गॅदरिंग' करण्यास मनाई आहे. आपण येथे "गॅदरिंग' करण्यासाठी जमणार नसून, अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी जमा होणार आहोत,' असे ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास परिमंडळ एकचे उपायुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आझाद मैदानात मनसेला सभा घेण्यास परवानगी दिली असल्याचे सहपोलिस आयुक्‍त (कायदा व सुव्यवस्था) रजनीश शेठ यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत सांगितले. ही परवानगी देताना मनसेला नव्याने अर्ज करण्यास पोलिसांनी सांगितले होते. मनसेच्या अर्जावर सोमवारी रात्री निर्णय झाला आणि त्यांना सभा घेण्यास परवानगी देण्यात आली. या सभेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त असेल. सभेला सुमारे एक लाख मनसैनिक अपेक्षित असल्याचे मनसेच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आल्याचे समजते.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें