सोमवार, 16 जुलाई 2012

दुरावलेली मने आली जवळ

दुरावलेली मने आली जवळ
Monday, July 16, 2012

मुंबई - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाने राजकारणातील कडवट नात्याऐवजी रक्ताचे नातेच श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले. उद्धव यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याचे कळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा कार्यक्रम सोडून अलिबागहून थेट हॉस्पिटल गाठले. आपल्या बंधूची भेट घेत त्यांना प्रकृती सांभाळण्याचा प्रेमळ सल्ला दिला. दुपारी अर्धा तास झालेल्या संवादानंतर सायंकाळी राज यांनी स्वतः सारथ्य करीत उद्धव यांना मातोश्रीवर सोडून आपले बंधुप्रेम दाखविले.

दोन दिवसांपूर्वीच उद्धव यांनी सोमवारी नियमित तपासणीसाठी लीलावतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज पहाटेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सकाळी रश्‍मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांना तातडीने हास्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर डॉ. अजित देसाई, डॉ. मॅथ्यू, डॉ. मेनन यांनी उपचार सुरू केले. हृदयविकाराची निश्‍चिती होण्यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेल्या उद्धव यांची अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफीच्या अहवालानंतर अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला जाणार आहे.

उद्धव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे कळताच मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे, रवींद्र वायकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सुरवातीच्या काळात नेत्यांकडून अथवा हॉस्पिटलकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने उपस्थित शिवसैनिकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, शिवसेना नेत्यांनी उद्धव यांची अँजिओग्राफी झाली असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितल्यानंतरच उपस्थित शिवसैनिकांचा जीव भांड्यात पडला.

मनसेच्या राज्यस्तरीय तीनदिवसीय शिबिराला अलिबाग येथील हॉटेल रेडिसन्समध्ये आजपासून सुरवात होणार होती. त्याला उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या राज यांना उद्धव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे कळताच, त्यांनी तत्काळ मुंबईकडे धाव घेतली. दुपारी राज हॉस्पिटलमध्ये पोचले. अतिदक्षता विभागात उद्धव यांच्याबरोबर त्यांनी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे तीन आमदार उपस्थित होते.

डॉक्‍टरांकडून त्यांनी उद्धव यांच्या उपचाराबाबतची माहिती घेतली त्यानंतर राज हॉस्पिटलमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट सायंकाळी पुन्हा हॉस्पिटल गाठले. उद्धव यांना आपल्या गाडीत पुढे बसवून स्वतः गाडी चालवीत राज यांनी त्यांना मातोश्रीवर सोडले. उद्धव यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

अडचणीच्या काळातील "बंधुप्रेम' राजकारणाच्या सारीपाटावर एकमेकांचे तोंड पाहण्यास तयार नसलेल्या या दोन्ही भावांमधील अडचणीच्या काळातील "बंधुप्रेम' केवळ शिवसैनिक अथवा मनसैनिकांमध्येच नाही, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरला.

सकाळी 9.30
उद्धव ठाकरे रुग्णालयात
राज ठाकरे अलिबाग येथील कार्यक्रमासाठी रवाना

सकाळी 11
उद्धव यांच्या प्रकृतीची माहिती कळाल्यानंतर राज दौरा अर्धवट सोडून मुंबईत आगमन

दुपारी 1.30
राज ठाकरे यांच्या आई कुंदाताई, बहिण जयजयवंती लिलावती रुग्णालयात

दुपारी 1.45
राज आणि शर्मिला ठाकरे लिलावती रुग्णालयात; मनसेचे तीन आमदारही बरोबर

दुपारी 2.00
ठाकरे कुटुंबीयांची रुग्णालयात सुमारे 45 मिनीटे चर्चा

दुपारी 2.45
राज ठाकरे यांचा रुग्णालयातून बाळासाहेब ठाकरे यांना फोन

सायंकाळी 5.00
राज-उद्धव लिलावतीमधून मातोश्रीकडे रवाना

रात्री 8.00
गोपिनाथ मुंडे-विनोद तावडे यांची उद्धव यांच्याशी भेटकोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें